माजी मुख्यमंत्र्यांच्या एका पोस्टमुळे काँग्रेस हायकमांडचं टेन्शन वाढलयं

सध्या काँग्रेसचे बुरे दिन सुरू आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण रोज कोणत्या ना कोणत्या राज्यात आपापल्या नेत्यांमधलाचं नवीन  वाद पक्षासमोर उभा राहतो. आताही हा वाद समोर आलायं उत्तराखंड मधून.

उत्तराखंडमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे दिग्गज नेता हरीश रावत पक्षावर नाराज आहेत. त्यांनी याआधीचं ट्विट करून काँग्रेस संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि राजकीय मैदानातून सन्यास घेत असल्याचे संकेत दिले आहेत.

इंटरनेट मीडियावर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी बुधवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की,

निवडणुकीचा समुद्र पार करायचाय.  मात्र बऱ्याच ठिकाणी सहकाराचा हात पुढे करण्याऐवजी संघटनात्मक बांधणी एकतर मागे फिरत आहे किंवा नकारात्मक भूमिका घेत आहे.

उत्तराखंड काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे.

माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.  राज्यसभा सदस्य प्रदीप टमटा, जागेश्वरचे आमदार आणि माजी उपाध्यक्ष गोविंद सिंग कुंजवाल आणि धारचुलाचे आमदार हरीश धामी उघडपणे माजी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उतरले आहेत.

हरीश रावत हे काँग्रेस कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत पसंतीचे असल्याचे तिघांचेही म्हणणे आहे.  त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने त्यांना  चेहरा जाहीर करावा.  एवढचं नाही तर हरीश रावत जिथे जातील तिथे आम्ही सगळे जाऊ, असाही सुर या नेत्यांनी लावून धरलायं.

माजी सभापती व आमदार गोविंदसिंह कुंजवाल म्हणाले की,

निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष असल्याने पक्षाचे सर्व कार्यक्रम हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली व्हायला हवे होते.  मात्र काहींनी स्वतंत्र मोर्चे, कार्यक्रम सुरू केले, त्यामुळे वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे.  ज्यांना काँग्रेसची सत्ता नको आहे, हे  त्यांचेच कारनामे आहेत, असे माझे मत आहे.  उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांच्यापेक्षा मोठा नेता कोणी नाही, असे जनतेने आणि सगळ्या सर्वेक्षणांनी म्हटलयं.  त्यांच्यात राज्याविषयी नाराजी आहे.  ते दुसऱ्या पक्षात गेला तर आपण सगळे एकत्र जाऊ.

त्याचवेळी आमदार धामी म्हणाले की, रावत यांना मुख्यमंत्री केलं नाही तर वेगळ्या रांगेत उभे राहणाऱ्यांमध्ये ते सगळ्यात आधी असतील.

आता तसं पाहिलं तर या वादाला काही कारणचं नाहीये. कारण काँग्रेस हायकमांडने ७२ वर्षीय हरीश रावत यांची निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या जवळचे मानले जाणारे गोदियाल यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीची कमान सोपवण्यात आली आहे.

त्याचवेळी रावत यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे प्रीतम सिंह यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.  रावत यांच्या इच्छेनुसार उत्तराखंडमधील काँग्रेस निवडणुकीसाठी ही टीम तयार करण्यात आल्याचे मानले जात आहे.  असे असतानाही हरीश रावत आता संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

त्यामुळे आता रावत यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर आणि महत्त्वाचं म्हणजे नेतेमंडळींच्या व्यक्तव्यानंतर  एवढे तरी स्पष्ट होतेय की उत्तराखंडाच्या राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळणार आहे.

हे हा वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.