शहिदाच्या कुटूंबियांना अखेरपर्यंत माहित नव्हतं कि आपल्याला मदत करणारा फिल्मस्टार आहे

एखादा २६/११ सारखा मानवनिर्मित हल्ला होतो. निरपराध माणसं मृत्युमुखी पडतात. आपण हळहळतो.
दहशतवादाच्या नावे बोटं मोडतो. साधारण पुढचे ६ महिने किंवा निदान एक वर्ष तरी आपल्याला ती कटू
घटना आठवत राहते. त्यावेळी टीव्ही वर पाहिलेलं ते फुटेज मन भंजाळून सोडतं.

काही काळ गेला की ती घटना आपल्या आठवणीतून पुसट होते. आणि जेव्हा त्या दुर्दैवी घटनेचा दिवस वर्षभराने पुन्हा येतो, तेव्हा पुन्हा काही क्षण सर्व आठवतं. उद्याचा दिवस उजाडला की मागचं पुन्हा धूसर होतं. परंतु त्या हल्ल्यात कोणाचे नातेवाईक, मित्र – मैत्रीण बळी गेले असतील तर मात्र त्यांच्यासाठी ती एक न भरणारी जखम असते.

२६/११ च्या हल्लात एका कुटुंबाने घरातला कर्ता पुरुष गमावला. परंतु बॉलिवुड मधील एका अभिनेत्याने
शेवटपर्यंत स्वतःचं नाव कळू न देता, या कुटुंबाला मदत केली. हा अभिनेता म्हणजे फारुक शेख.

फारुक शेख कलाकाराच्या पलीकडे माणूस म्हणून किती ग्रेट होते, याची ओळख करून देणारा हा किस्सा.

ही गोष्ट सुरू होते २६ / ११ च्या त्या भयाण रात्रीपासून. दहशतवाद्यांनी मुंबईत ताज हॉटेल मध्ये बेछूट
गोळीबार केला होता. ताज हॉटेल मध्ये राजन कांबळे नावाचे गृहस्थ देखभाल विभागात काम करत होते.
ताज मध्ये आतंकवादी चौफेर अंधाधुंद गोळीबार करत होते. राजन कांबळे यांच्या सोबत त्यावेळी ताज
हॉटेल मध्ये असणारे अनेक पाहुणे होते. सर्वांची भीतीने गाळण उडाली होती.

पाहुण्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी राजन कांबळे यांनी स्वतःवर घेतली. ताज मधील अतिथींना सुरक्षित स्थळी हलवताना दहशतवाद्यांनी केलेल्या फायरींग मध्ये राजन कांबळे यांना गोळी लागली. आणि ते गतप्राण झाले.

राजन कांबळे यांची पत्नी श्रुती कांबळे यांना हा मोठा धक्का होता.

नवऱ्याचं छत्र अचानक हरपलं. पदरी दोन मुलं होती. त्यामुळे घराचा संपूर्ण डोलारा आता श्रुती कांबळे यांच्यावर येऊन पडला. दुःख मोठं होतं. मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या श्रुती कांबळेंना स्वत:ला सावरायचं होतं. हा हल्ला झाल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २००८ मध्ये इंडीयन एक्स्प्रेस या न्यूज पेपरने एक आर्टिकल केलं. या आर्टिकल मध्ये नवऱ्यामागे श्रुती कांबळे आणि त्यांच्या दोन मुलांची कशी ओढाताण होत आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता.

ही स्टोरी फारुक शेख यांच्या वाचण्यात आली. फारुक शेख यांनी इंडीयन एक्स्प्रेस मध्ये फोन लावला.
श्रुती कांबळे यांच्या दोन मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी फारुक शेख यांनी घेतली.

परंतु त्यांची एकच अट होती की, मदत करताना त्यांचं नाव बाहेर येणार नाही. त्यांची ओळख ही निनावी राहील.

ज्या जगात सेलिब्रिटी आयुष्यात घडलेल्या छोट्याशा गोष्टीची सुद्धा बातमी करतात, त्या जगात फारुक शेख यांना स्वतःचं नाव बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं.

सर्व बोलणी झाल्यानंतर इंडीयन एक्स्प्रेस कडून फारुक शेख यांना फोन यायचा. श्रुती कांबळे यांच्या
मुलांचं जेव्हा नवं शैक्षणिक वर्ष सुरू व्हायचं, तेव्हा संपूर्ण खर्चाचा अंदाज घेऊन इंडियन एक्स्प्रेस ठराविक रकमेचा आकडा फारुक शेख यांना सांगायचे. फारुक शेख मग कांबळे यांच्या नावाने त्या रकमेचा चेक तयार करायचे. त्यांनी कधीही दिलेले पैसे खर्च कसे केले, असा प्रश्न विचारला नाही.

सलग पाच वर्ष फारुक शेख कांबळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेत होते. कांबळे कुटुंबाला मात्र ५ वर्ष ही मदत नेमकी कोण करतंय याची कल्पनाच नव्हती.

जेव्हा कांबळे कुटुंबाला याविषयी कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. २०१३ रोजी फारुक शेख काळाच्या पडद्याआड गेले. आणि ते गेल्यानंतर इतकी वर्ष मदत करणारा अनामिक व्यक्ती फारुक शेख आहे, हे श्रुती कांबळे आणि त्यांच्या मुलांना लक्षात आलं.

फारूक शेख यांना भेटून मनापासून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता आली नाही, ही खंत श्रुती कांबळेंना आहे. त्यांचा छोटा मुलगा अथर्व शालेय शिक्षण घेत आहे. तर रोहन या मोठ्या मुलाला बाबांचा आदर्श मनात ठेवून ताज हॉटेल मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे.

असं उदाहरण पाहिलं, की फारुक शेख सारख्या महान कलाकाराविषयी आदर द्विगुणित होतो. भारतीय
सिनेसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही हृदयात माणुसकीचा ओलावा जपणारी फारुक शेख सारखी कलाकार माणसं सापडणं, हे केवळ दुर्मिळ.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.