FTII च्या विद्यार्थ्याने बनवलेला “चंपारण मटण” चित्रपट थेट “ऑस्कर”मध्ये गेला आहे

“ऑस्कर”,सिनेमा जगातला एक ग्लॅमरस सोहळा. अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांसाठी एक ड्रीम डेस्टिनेशन. एखाद्या चित्रपटाला किंवा कलाकाराला ऑस्कर दिला जातो म्हणजे तो चित्रपट आणि तो कलाकार भारी असतो हे समीकरण आहेच. त्यामुळे त्याचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायला नको आणि यंदा Oscar’s student academy award सेमीफायनलच्या रेस मध्ये भारताच्या “चंपारण मटण” या चित्रपटाने आपली जागा बनवली आहे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधल्या रंजन कुमार या विद्यार्थ्याने याचं दिग्दर्शन केलं आहे. सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ऑस्करच्या स्टुडंट अकॅडमी अवॉर्डसाठी सेमीफायनल मध्ये गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

सुरुवातीला Oscar’s student academy award कोणाला दिला जातो, ते पाहू.
Oscar’s student academy award म्हणजे ऑस्करच. ऑस्कर अवॉर्ड अर्थात अकॅडमी अवॉर्ड. हा अमेरिकेतला अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या मोशन अकॅडमीकडून दिला जाणारा पुरस्कार आहे. जगभरातल्या चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो तसाच ऑस्करच्या स्टुडंट अकॅडमी अवॉर्ड हा जगभरातल्या वेगवेगळ्या फिल्म मेकिंग कॉलेज किंवा विद्यापीठाकडून सादर केलेल्या चित्रपटांना दिला जातो. हा पुरस्कार १९७२ पासून दिला जात आहे. यात सहभागी होणारे चित्रपट ४० मिनिटं किंवा त्याहून कमी वेळ चालणारे असले पाहिजेत. ऑस्करचा स्टुडंट अकॅडमी पुरस्कार हा चार वेगवेगळ्या विभागांमध्ये दिला जातो. एक म्हणजे नॅरेटिव्ह, दुसरं ॲनिमेशन, तिसरं अल्टरनेटीव्ह किंवा एक्स्प्रिमेंटल आणि चौथा विभाग आहे डोक्युमेंट्री. यासाठी दरवर्षी जगभरातून हजारोने लघुचित्रपट यात भाग घेतात. त्यातून भारतातला चित्रपट सेमीफायनल पर्यंत पोहोचला ही भारतासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.

चित्रपटाच्या कलाकार आणि चित्रीकरणाबद्दल जाणून घेऊ,
पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचे शिक्षण घेत असलेल्या रंजन उमा कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पंचायत वेब सिरीज मधून सहज अभिनयामुळे फेमस झालेला विकास म्हणजेच चंदन रॉय आणि मुझ्झफरपुरची फलक खान हे दोघं ‘चंपारण मटण’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. खरंतर FTII चित्रपट बनवायला पैसे देतं, पण रंजन कुमारने त्यावर अजून १ लाखाचं कर्ज काढून फक्त ४ लाखात हा चित्रपट बनवला आहे. चित्रपट मुझ्झफरपुरच्या ‘बज्जिका’ या बोलीभाषेतला असल्यामुळे मुझ्झफरपुरचे आणि बिहारचे अजून १० लोकल कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत. ‘चंपारण मटण’ चित्रपट हा रंजन कुमारचा लास्ट सेमिस्टरचा २४ मिनिटांचा एक प्रोजेक्ट आहे आणि तो त्याने फक्त १२ दिवसांत बनवला आहे.

चित्रपटाचं महाराष्ट्र आणि बिहार कनेक्शन
चंपारण मटणचा दिग्दर्शक रंजन कुमार हा पुण्याच्या FTII चा विद्यार्थी. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण हे महाराष्ट्रात बारामतीमध्ये झालंय. पण रंजन कुमार हा मुळचा बिहारचा आणि या चित्रपटाचं कथानक सुद्धा बिहारमधलच आहे. तसच हा चित्रपट “बज्जिका” या बोलीभाषेत आहे जी बिहारच्या वैशाली, मुजफ्फरपुर आणि बेगुसराय मध्ये बोलली जाते. त्यामुळे यात काम करणारे सगळे कलाकार हे बिहारचेच आहेत.

चंपारण चित्रपटाचा ऑस्करच्या सेमीफायनल पर्यंतचा प्रवास
‘चंपारण मटन’ या चित्रपटाने ऑस्करच्या स्टुडंट अकॅडमी पुरस्काराच्या फिल्म नॅरेटिव्ह प्रकारात सेमीफायनल गाठली आहे. या श्रेणीसाठी जगभरातून २४०० हून अधिक चित्रपट पोहोचले होते पण चंपारण मटण सेमीफायनल पर्यंत टॉप १७ चित्रपटांमध्ये पोहोचला आहे. यावर्षी FTII चे एकूण तीन चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते, मात्र त्यात फक्त ‘चंपारण मटण’ची निवड झाली. ऑक्टोबरपर्यंत हा पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचं कथानक हे बेरोजगारीवर भाष्य करणारी आहे.

‘चंपारण मटण’ ही बिहारचा राम आणि त्याची बायको मुन्नी यांची गोष्ट आहे. राम एक साधारण आणि गरीब मुलगा असतो आणि मुन्नी चंपारण मधली एक श्रीमंत मुलगी असते. दोघं प्रेमात पडून लग्न करतात. त्यानंतर मुन्नी गरोदर राहते पण कोविडमुळे रामची नोकरी जाते आणि त्यांचं आयुष्य अजून कठीण होतं. एकदा रामच्या गरोदर बायकोची म्हणजे मुन्नीची चंपारण मटण खायची खूप इच्छा होते.
चंपारण मटण हे बिहारमधल्या चंपारण भागात खास पद्धतीने मातीच्या भांड्यात मंद आचेवर शिजवलेलं मटण.

इथे वरण भात खाण्यासाठी सुद्धा दोघांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि असं असताना ८०० रुपये किलोने मिळणार मटण कसं आणायचं असा प्रश्न रामला पडतो. पण तो त्याच्या बायकोच्या प्रेमापोटी मटणासाठी लागणारे ८०० रुपये गोळा करण्यासाठी काय काय करतो यावर चित्रपटाचं कथानक फिरतं.

यापूर्वी ऑस्करमध्ये ए. आर. रेहेमान, RRR मधल्या नाटू नाटू या गाण्याने आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्यूमेंट्रीने ऑस्कर जिंकून भारताची मान उंचावली आहे आणि आता “चंपारण मटण” हा लघुचित्रपट भारतासाठी ऑस्कर आणतोय की नाही हे काही महिन्यातच कळेल. पण “चंपारण मटण” चित्रपट सेमीफायनल मध्ये गेला आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.