पहिल्याच निवडणुकीत धुरळा उडवणारे, मनसेचे १३ आमदार सध्या काय करतात..?

साधारण २००६-०७ ची गोष्ट असेल, कित्येक पोरांच्या फोनची रिंगटोनला राज ठाकरेंचं भाषण होतं. मग ते “छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यावर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं ना, तो मराठी” हे वाक्य असेल किंवा “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुयात” हे वाक्य असेल. राज ठाकरेंच्या भाषणानं लोकांच्या मनावर गारुड केलं होतं.

२००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. शिवसेना-भाजप युती आणि सत्तेत असल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तगडं आव्हान २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर होतं. राज ठाकरेंनी सभा गाजवल्या, वातावरण निर्मिती केली, पण त्यांना यश मिळणार का यापुढं प्रश्नचिन्ह होतं.

निवडणुका पार पडल्या, निकाल हाती आले आणि सगळ्यांना धक्का देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार निवडून आले. मनसेचा धडाका इतका मोठा होता, की मुंबईत शिवसेनेपेक्षा जास्त जागा मनसेच्या आल्या.

त्यांच्या या विजयामुळं शिवसेना आणि भाजपला अनेक जागांवर बॅकफूटला जावं लागलं. आधीच्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या १७ जागा कमी आल्या, तर भाजपच्या ८.

 त्यानंतर मात्र राज ठाकरेंच्या मनसेला करिष्मा दाखवता आला नाही आणि २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला.

पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २००९ मध्ये प्रचंड यश मिळवून देणारे, हे १३ आमदार सध्या आहेत तरी कुठं..?

१) हर्षवर्धन जाधव

२००९ मध्ये कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव निवडून आले. त्यांचा सामना झाला अपक्ष उभ्या राहिलेल्या उदयसिंह राजपूत यांच्याशी. घासून झालेल्या या लढतीत, जाधवांनी ४ हजार १०७ मतांनी निसटता विजय मिळवला होता. २०१४ च्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा याच मतदार संघातून आमदार झाले, पण यावेळी त्यांचा पक्ष होता शिवसेना.

पुढं २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून औरंगाबादमधून लोकसभा लढवली, त्यांना मिळालेल्या मतांचा परिणाम शिवसेनेवर झाला आणि सेनेचा उमेदवार पडला. पुढं त्यांनी शिव स्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. पण २०२० मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला. त्यानंतर आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

असं असलं तरी आपल्या वक्तव्यांमुळं हर्षवर्धन जाधव चर्चेत असतातच.

२) उत्तमराव ढिकळे

२००९ च्या निवडणुकीत मनसेला नाशिक जिल्ह्यात चांगलं यश मिळालं होतं. नाशिक पूर्व मधून उत्तमराव ढिकले यांनी भाजपच्या बाळासाहेब सानप यांचा १८ हजार मतांनी पराभव केला होता. ढिकले हे नाशिकच्या राजकारणातलं मोठं नाव, नगरसेवक, महापौर, खासदार आणि मग आमदार अशी पदं त्यांनी भूषवली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी उभं न राहण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवानं २०१५ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र राहुल ढिकले, सध्या याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत.

३) वसंत गीते

वसंत गीते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. २००९ मध्ये त्यांनी नाशिक मध्यमधून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा तब्बल ३१ हजार मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीतही वसंत गीते मनसेकडूनच रिंगणात उतरले होते. मात्र भाजपच्या देवयानी फरांदे यांच्याकडून त्यांचा २८ हजार मतांनी पराभव झाला.

२०१५ मध्ये त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये काही काळ काम केल्यानंतर वसंत गीतेंनी २०२१ मध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. थोडक्यात त्यांचा प्रवास शिवसेना-मनसे-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा राहिला.

४) नितीन भोसले

नाशिक पश्चिममधून नितीन भोसलेंनी २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाना महालेंचा पराभव केला होता. भोसलेंकडे मनसेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. २०१४ आणि २०१९ मध्येही ते मनसेच्या तिकिटावर उभे राहिले, मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नाशिकमध्ये मनसेला खिंडार पडलेलं असलं, तरी नितीन भोसलेंनी पक्षाची साथ सोडली नाही.

५) रमेश रतन पाटील

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंचा पराभव करुन रमेश पाटील यांनी बाजी मारली होती. २००९ पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या राज्य कमिटीचे ते सदस्यही होते. मात्र निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. २००९ प्रमाणेच २०१४ मध्येही ते मनसेचे उमेदवार होते मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर त्यांनी काही काळ भाजपमध्ये काम केलं, २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस प्रवेश केल्याच्या बातम्या आल्या. सध्या मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील, हे रमेश पाटील यांचे धाकटे बंधू आहेत.

६) प्रकाश भोईर

अटीतटीच्या लढाईत कल्याण पश्चिममधून शिवसेनेच्या राजेंद्र देवळकर यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. कल्याणमध्ये मनसेनं आपलं वर्चस्व काहीप्रमाणात अबाधित ठेवलं आहे, त्यात भोईर यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.

७) मंगेश सांगळे

विक्रोळीतून २००९ ची निवडणूक जिंकलेले मंगेश सांगळे, २०१४ ला पुन्हा मनसेकडूनच उमेदवार होते. मात्र शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी त्यांचा २५ हजार मतांनी पराभव केला. पुढे २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महानगरपालिका निवडणूकही लढवली, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

८) शिशिर शिंदे

बाळासाहेबांचे जवळचे शिवसैनिक असणारे शिशिर शिंदे राज ठाकरे यांच्यासोबत अगदी सुरुवातीच्या काळापासून होते. राज यांनी शिवसेना सोडली, तेव्हा शिशिर शिंदेही बाहेर पडले. २००९ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी भांडुप वेस्टमधून ३० हजार मतांनी विजय मिळवला.

२०१४ मध्येही ते मनसेच्या तिकिटावर लढले, मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुढं २०१८ मध्ये त्यांनी मनसेला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर सध्या त्यांच्याकडे शिवसेना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

९) राम कदम

विधानसभेत निवडून गेल्यानंतर शपथविधीवेळी समजावादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मनसे आमदारांनी मारहाण केल्यामुळं राम कदम यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांनी घाटकोपर पश्चिममधून पूनम महाजन यांचा २६ हजारांच्या फरकानं पराभव केला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘मनसेमध्ये माझ्यावर अन्याय होतोय, नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीनं मी प्रभावित झालो आहे,’ अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. सध्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार का याची चर्चा सुरू आहे.

१०) प्रवीण दरेकर

मनसेमधून भाजपमध्ये गेलेलं आणखी एक नाव म्हणजे प्रवीण दरेकर. २००९ मध्ये मागाठाणेमधून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता. २०१४ मध्येही दरेकर पुन्हा मनसेच्या तिकिटावर लढले, मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं. त्यानंतर दरेकरांनी मनसे सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

२०१६ मध्ये ते भाजपकडून विधानपरिषदेवर निवडून गेले, त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारीही देण्यात आली. मुंबै बँक प्रकरणात दरेकरांची चौकशीही चांगलीच गाजली.

 सध्या नव्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार का आणि सरकार बदलल्यावर त्यांच्या चौकशीचं काय होणार, याची चर्चा आहे.

११) बाळा नांदगावकर

राज ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत म्हणून बाळा नांदगावकर ओळखले जातात. १९९५ मध्ये छगन भुजबळांचा पराभव केल्यानं त्यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं होतं. पुढे राज शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाही नांदगावकर त्यांच्या सोबत होते. २००९ मध्ये त्यांनी शिवडीमधून शिवसेनेच्या दगडू सपकाळ यांचा ६ हजार मतांनी पराभव केला होता.

२०१४ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्यासमोर ते मोठ्या फरकानं पराभूत झाले. मनसेच्या १६ वर्षांच्या प्रवासात जे काही चढउतार आले, त्यात बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची साथ सोडली नाही.

आजही राज यांच्यानंतरचं मनसेतलं नेतृत्व म्हणून बाळा नांदगावकर यांच्याकडे पाहिलं जातं.

१२) नितीन सरदेसाई

मनसेच्या स्थापनेच्याही आधीपासून राज ठाकरेंसोबत असणारं आणखी एक नाव म्हणजे नितीन सरदेसाई. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या माहीममधून सरदेसाईंनी सदा सरवणकर आणि आदेश बांदेकर यांना पराभवाचा धक्का दिला होता. २०१४ मध्ये मात्र सरवणकर शिवसेनेत आले आणि सरदेसाईंचा पराभव झाला. सध्या सरदेसाई हे पक्षाचे सरचिटणीस आहेत. मध्यंतरी त्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती.

१३) रमेश वांजळे

मनसेच्या पहिल्या फळीतलं सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे रमेश वांजळे. पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीच्या विकास दांगट यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. गळ्यात, हातात असलेलं सोनं, अंगठी आणि लॉकेटमध्ये असलेला राज ठाकरेंचा फोटो यामुळं रमेश वांजळे यांना गोल्डमॅन अशी ओळख मिळाली होती.

सगळ्या महाराष्ट्रात ते लोकप्रिय झाले होते. २०११ मध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. त्यांचे कुटुंबीय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

तर ही होती राज ठाकरेंची पहिली फळी, ज्यांनी पहिल्याच निवडणुकीत धुरळा उडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बूस्टर मिळवून दिला होता. यातलं कुणी आता भाजपमध्ये आहे तर कुणी शिवसेनेत, मात्र काही जण असेही आहेत ज्यांनी राज ठाकरेंची साथ सोडलेली नाही. त्यांच्याच जोरावर मनसेच्या गोटात, एका आमदारावरुन पुन्हा भरारी घेण्याचा विश्वास आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.