पूरग्रस्तांना मदत पाठवायची आहे? आधी हे वाचा..
कालपासून महाराष्ट्रात निसर्गाने रौद्ररूप धारण केलंय. अतिवृष्टीने सर्व विक्रम मोडले आहेत. या ढगफुटीमुळे चिपळूणसारखी गावे पाण्याखाली गेली. ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. कोल्हापूर व सांगली येथे देखील कृष्णा पंचगंगा सारख्या नद्यांना महापूर आला आहे. अद्याप पाऊस थांबलेला नाही. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचे एनडीआरएफच्या टीमसोबत युद्ध पातळीवर मदतीचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक नागरिक देखील खांदा लावून लढत आहेत. या पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
कित्येकांना मदत पाठवण्याची इच्छा आहे मात्र मदत कुठे व कशी पाठवायची हेच अनेकांना माहित नाही. मदत करताना कोणत्या गोष्टी पाठवाव्यात याच्या बद्दल देखील अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यासाठी आम्ही आमचे भिडू अमित मगदूम यांच्याशी संपर्क केला. त्यांनी २०१९ सालच्या सांगली कोल्हापूरच्या महापुरात मदत केली होती.
त्यांनी सांगितलं,
मदत योग्य हाती मिळणे सर्वात महत्वाचं आहे. सांगली, कोल्हापूर येथे गेल्या वेळी लोकांनी मदत पाठवली. पण अनेकजण पुण्या मुंबईवरून ट्र्क भरून सामान घेऊन आले मात्र त्यांनी हि मदत शहरात दिली आणि परत फिरले. कित्येकदा हि मदत चुकीच्या हातात दिली. गुंड व मवाल्यानी मधल्या मध्ये पुरग्रस्तांची मदत हडप केल्याचेही प्रकार पाहावयास मिळाले.
म्हणूनच मदत घेऊन येणाऱ्यांनी ग्रामीण भागात जाण्याची गरज आहे.
तुम्हाला योग्य प्रकारे मदत करायची असेल तर सगळ्यात पहिली गरज पिण्याचे पाणी व अन्न पदार्थाची आहे. हे अन्नपदार्थ कोरडे असावे व काही दिवस टिकतील असे असावे याची काळजी घेतली पाहिजे. बिस्किटे, चिवडा असे पदार्थ असतील तर उत्तमच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंथरून, कपडे व अंतर्वस्त्रे यांची या पूरग्रस्तांना सर्वाधिक गरज असणार आहे. त्यांची मदत देखील आपण पाठवू शकता.
मदत कशी पाठवावी. आम्ही खाली काही जिल्हा प्रशासनाचे नम्बर देत आहोत. त्यांना संपर्क केला तर मदत अधिकृतरित्या गरजवंतांना मिळू शकेल. या शिवाय तुम्ही स्वतः देखील पुरग्रस्तांच्या कॅम्पवर जाऊन मदत पोहचवू शकता. या कॅम्प मधल्या लोकांना जेवण कपडे औषधें व इतर जीवनावश्यक गोष्टींची आवश्यकता असते.
खरी मदत पूर ओसरल्यानंतर लागणार आहे. पाणी ओसरल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या घरी जाईल. घरी गेल्यानंतर फिनाईल पासून ते अंर्तवस्त्रांपर्यन्त प्रत्येक गोष्टीची गरज असेल.
पूरग्रस्त भागातील एखाद्या खेड्यात जाऊन तुम्ही तुमच्या हाताने योग्य घरापर्यन्त हे साहित्य पोहच करु शकता.
दूसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढचे दोन चार महिने कठिण असणार आहेत. अशा वेळी आपण इतक्या कष्टाने मदत गोळा करतो तर एका कुटूंबाचा महिन्याचा “किराणा माल” अशा प्रकारे साहित्याचा पिशव्या करा. जेणेकरुन चार जणांसाठी एक महिन्याच साहित्य अस साहित्याच सॉर्टिंग होवू शकेल. त्यानुसार पाणी ओसरल्यानंतर ज्या घरात साहित्य पोहचलं नाही अशा घराघरात, गावागावत जावू तुम्ही ती मदत देवू शकाल.
पूर ओसरण्यास सुरवात झाल्यावर घर धुणे, साफसफाई करणं आणि संपुर्ण संसार उभा करण महत्वाचं ठरणार आहे. आपण मदत पाठवण्यास गडबड करु नका. जी मदत असेल ती आपल्याकडे ठेवा. पूर ओसरल्यानंतर गावांची माहिती घ्या आणि प्रत्यक्ष गावात जा.
रायगड येथील जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्याशी बोल भिडूचा संपर्क झाला. त्यांनी महाड व पोलादपूर येथील पूरग्रस्त नागरिकांना खाद्यपदार्थ, पाणी बॉटल, बिस्किटे , दूध पॅकेट, कपडे चादर, बेडशीट, सतरंजी व इतर जीवनावश्यक पदार्थ तहसील कार्यालय माणगाव येथे पाठवावे असे आवाहन केले. तिथे संपर्क करण्यासाठी त्यांनी काही मोबाईल क्रमांक देखील दिले. ते खालील प्रमाणे,
मुंबई पुण्यातून ज्यांना कोकणात मदत पाठवायची असेल तर रस्ता कोणता?
सध्या वशिष्टी नदीच्या पुलाचा भाग पडला आहे आणि पर्यायी मार्ग असणारा उकताड मधील एन्रॉन ब्रिजदेखील खचला आहे. मुंबई गोवा महामार्ग देखील बंद आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात पोहचण्यासाठी फक्त पुणे-कराड-पाटण हा एकच पर्याय आहे.
चिपळूण रोडवरील पाणी ओसरत आहे. रोडवर मोठ्या प्रमाणात मलबा असल्यामुळे, गाड्यांची वाहतूक आणि मदत पोहचविणे अडचणीचे आहे. स्थानिक प्रशासन आणि स्नस्थांचे स्वयंसेवक याना संपर्क करून मदत पोहचवणे योग्य ठरेल.
मदत कार्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधायचा असेल तर संपर्क क्रमांक
सांगली कोल्हापूरला ज्यांना मदत पाठवायची असेल त्यांनी सर्वात आधी पुणे बेंगलोर महामार्ग खुले आहेत का याची खातरजमा करावी. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढचे ४८ तास अत्यंत महत्वाचे आहेत. कधीही परिस्थिती चिघळू शकते. सध्या तरी महामार्ग सुरु असला तरी प्रशासन कोणत्याही क्षणी बंद करू शकतो.
संपर्कासाठी जिल्हा संपर्क कार्यालयाचे क्रमांक.
हे ही वाचा भिडू.
- महापूरावेळी त्या बारा जणांनी मिळून दोन दिवसात अडीच हजार लोकांना वाचवलं.
- मध्यप्रदेशातून केलेला पाण्याचा विसर्ग विदर्भातील महापुराला जबाबदार आहे का ?
- तळीयेत काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून माणसं ढिगाऱ्याखाली होती, यंत्रणा आज पोहचलीय…