गहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात इथूनच झाली आहे…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गांधी परिवाराचे विश्वासू उमेदवार म्हणून अशोक गहलोत यांची निवड झाली तेव्हा राजस्थानमध्ये राजकीय राडा सुरु झाला. कारण काँग्रेस पक्षाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे एकच पद असू शकत. त्यामुळे अशोक गहलोत यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे गरजेचे होते.

गहलोत यांनी जर राजीनामा दिला तर मुख्यमंत्री पदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडेल हे जवजवळ ठरलेलंच होत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडायची नाही आणि वरून अध्यक्षपद मिळवायचं यासाठी गहलोत यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली होती.

सगळ्या राड्यानंतर निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांची एन्ट्री झाली आणि निवडणूक पार पडली. हळूहळू गहलोत आणि पायलट यांच्यात असलेल्या वादावर पडदा पडला असं सांगितलं जात होत. पण गहलोत यांनी पायलट यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

अशोक गहलोत यांनी माध्यमांशी बोलतांना सचिन पायलट यांना थेट ‘गद्दार’ म्हटलंय.

“एक गद्दार मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हायकमांड सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवू शकत नाही. ज्या व्यक्तीला १० आमदारांचा पाठींबा नाही, ज्याने यापूर्वी बंडखोरी केली आहे, तो गद्दार आहे. २०२० मध्ये पायलट स्वतःच्या समर्थक आमदारांसोबत दिल्लीला गेले होते, त्यांची बंडखोरी यशस्वी झाली नाही म्हणून त्यांना स्वतःच उपमुख्यमंत्रीपद गमवावं लागल होत.”

सचिन पायलट भारत जोडो यात्रेत आहेत आणि काही दिवसानंतर ही यात्रा राजस्थानमध्ये येणार असतांना, गहलोत यांनी २०२० चा पायलट यांचा प्रसंग पुन्हा उकरून काढला आहे. जेव्हा पायलट यांच्यावर काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपमध्ये जाणार असल्याचे आरोप लागले होते. या टाईमींगमुळे राजस्थान काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नाही असं म्हटलं जातंय.

पण हे प्रकरण एवढ्यापुरत मर्यादित नाही, हे समजून घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरचा घटनाक्रम समजून घ्यावा लागेल.

जेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गहलोत यांनी शक्तीप्रदर्शन केलं तेव्हा ते कॉंग्रेसच्या हायकमांडला तालावर नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे पुरेसं स्पष्ट झाल होत. गहलोत यांच्या या पावलामुळे काँग्रेस  हायकमांड गहलोत यांच्यावर खप्पामर्जी झालं होतं. परंतु अजय माकन यांनी गहलोत आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांवर कारवीची मागणी करून सुद्धा यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.

जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे जयपूरला पोहोचले होते तेव्हा गहलोत आणि त्यांच्या समर्थकांनी खरगे यांची भेट घेतली नव्हती. यानंतर सचिन पायलट यांनी सुद्धा गहलोत यांच्या समर्थकांनी केलेल्या शिस्तभंगावर कारवाईची मागणी केली होती, तसेच यापुढे काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. तरीसुद्धा हायकमांडने गेहलोत यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

उलट गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देऊन त्यांची ताकद वाढवली आहे.

एकीकडे अजय माकन यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष देण्यात यावा अशी मागणी पायलट हायकमांडकडे करत आहेत. कारण अजय माकन यांच्या नसण्यामुळे राजस्थान कॉंग्रेसच्या अंतर्गत कलहात गेहलोत यांना फायदा होईल असण सांगितलं जात आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष देण्याच्या जागी कॉंग्रेस हायकमांड गेहलोत यांची ताकद वाढवतच चालली आहे.

याच समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आव्हान कॉंग्रेस नेतृत्वासमोर आहे.

कारण काँग्रेससमोर गुजरातची निवडणूक जिंकण्याच जस आव्हान आहे, त्यापेक्षा मोठ आव्हान हे लोकसभा निवडणुकीच्या आधी असलेल्या तीन राज्यांच्या निवडणुकांच असणार आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये असलेली भाजपची सत्ता खेचण्याच आव्हान तर काँग्रेसपुढे आहेच, पण त्यापेक्षा मोठ आव्हान हे राजस्थान आणि छत्तीसगढमधील सत्ता टिकवून ठेवण्याच आहे. यात छत्तीसगढ काँग्रेसमध्ये भूपेश बघेल याचं वर्चस्व आणि कॉंग्रेसची मजबूत स्थिती तिथे कॉंग्रेसला तारणारी ठरेल. परंतु राजस्थानमधील अंतर्गत कलहाचा फटका कॉंग्रेसला बसेल असं सांगितलं जात आहे.

कारण कॉंग्रेसच्या या अंतर्गत कलहात भाजप स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे असं सांगितलं जातंय.

गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका केल्यामुळे पायलट भाजपमध्ये येतील का? किंवा पायलट यांना भाजप समर्थन देत आहे का? असे प्रश्न जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना माध्यमांनी विचारले होते. तेव्हा सतीश पुनिया यांनी पायलट यांना कोणतही समर्थन नसल्याच सांगितलं आहे.

पण कॉंग्रेस स्वतःच्या अंतर्गत कलहामुळे पडेल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून कॉंग्रेसच्या या काळाचा फायदा घेण्यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कॉंग्रेसला स्वतःच्या अंतर्गत कळला आधी थांबवाव लागेल असं विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे.

हे हे वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.