कन्नड कोकिळा गंगुबाई हनगळ यांच्या आवाजामुळे मराठीत भावगीतांच्या कॅसेटची विक्री होऊ लागली.
भारतात संगीताचा पाया हा शास्त्रीय संगीत मानला जातो. शास्त्रीय संगीताची वर्षानुवर्षे साधना करून लोकं यात पारंगत होतात. शास्त्रीय संगीत हि एकप्रकारची भक्ती आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशी बडी मंडळी यात पारंगत होती. याच मोठ्या मंडळींच्या काळात एका स्त्री शास्त्रीय गायिकेने आपल्या आवाजाच्या जोरावर आपला एक वेगळा चाहता वर्ग तयार केला होता.
गंगुबाई हनगळ. शास्त्रीय संगीत रसिक या नावाशी परिचित असतीलच, कन्नड कोकिळा म्हणून गंगुबाई हनगळ या शास्त्रीय संगीतात लोकप्रिय होत्या.
त्यांचा आधीचा काळ जरा खडतर होता तरीही त्यावर मात करून गंगुबाई हनगळ यांनी नव्या पिढीला एक नवीन आयाम घालून दिला. किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका म्हणून त्यांनी विशेष नावलौकिक मिळवला. गंगुबाई या गाण्याच्या क्षेत्रात कशा आल्या आणि त्यांची एकूण वाटचाल आपण जाणून घेऊया.
५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे गंगुबाई हनगळ यांचा जन्म झाला. त्यांची आई या कर्नाटकी पद्धतीची गाणी गात असे. त्यामुळे गंगुबाईंना सहाजिकच गाण्याची आवड निर्माण झाली. पण गंगुबाई या उत्तर हिंदुस्थानी संगीत जास्त ऐकत असे. मुलीचा कल बघून गंगुबाईंच्या आईने जास्त मेहनत घेऊन मुलीचं करियर घडवण्यासाठी कष्ट घेतले.
गंगुबाई यांचं पाळण्यातील नाव गांधारी असं होतं. त्यांच्या आईचं नाव गंगव्वा त्यावरून गंगू आणि पुढे ब्रिटिशांच्या त्रासाला वैतागून त्यांचे पूर्वज हनगळ गावी राहायला आल्याने त्यांनी गावाचं नाव आडनाव म्हणून वापरायला सुरवात केली.
वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल,कलाम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.
हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८ मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली. अनेक संगीत परिषदा त्यांनी गाजवल्या.
वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. पुढे गंगुबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रात घालवलं. खयाल हा प्रकार त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला.
तरुण वयात अगदी टिपेला पोहोचणारा गंगुबाई यांचा आवाज घशाच्या विकारावरील आजाराने पुरुषी झाला. हा खरतर खूप मोठा बाका प्रसंग गंगुबाईंवर ओढवला होता. पण यावर सुद्धा त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आपला एक वेगळा स्वतंत्र बाज निर्माण केला. अनेक लकबी आणि हरकती त्यांच्या पुरुषी आवाजात असायच्या ज्या इतर कुणालाही जमत नव्हत्या.
प्रामुख्याने त्या गमकाच्या अंगाने गायच्या, इतर स्त्री गायिका या अंगाने गात नसत. कानावर एक हात दाबून ठेवून आणि दुसरा हात पुढे करून गाण्याची त्यांनी एक वेगळी स्टाईल होती. गाताना चेहऱ्यावरील विविध हावभाव आणि मुद्राभिनय यामुळे गाण्याला अधिकच चांगले रूप येत असे त्यामुळे गंगुबाई यांच्या गायनाला कायम गर्दी असे.
१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती.
या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की,
“जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी यांची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे.”
भारत सरकारने गंगूबाई हनगळ यांना पदमभूषण व पदमविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता.
१९९२ ते १९९४ या काळात गंगुबाई कर्नाटक विधान सभेच्या सदस्या होत्या. २१ जुलै २००९ रोजी गंगुबाई हनगळ यांचं निधन झालं. गंगुबाईंच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात खूप मोठं नुकसान झालं.
हे हि वाच भिडू :
- भारतीय शास्त्रीय संगीताची भाषा एका मराठी माणसाने ठरवली होती.
- सातासमुद्रापार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घेऊन जाण्याचा मान जातो तो पलुसकरांना..!
- रुक्मीणी बाईने देवदासींच्या नाचाला बनवलं “भरतनाट्यम”
- सिनेमात संगीत देतो म्हणून पोरी नकार द्यायच्या, टेलर आहे म्हणून सांगितलं आणि लग्न ठरलं..