गावसकर यांनी सांगितलेल्या एका सिक्रेटने इंझमामला जगातला सर्वात खतरनाक बॅट्समन बनवलं.

अस म्हणतात की भारत पाकिस्तान मॅचमध्ये क्रिकेटमॅच ज्या त्वेषाने खेळली जाते एवढी इर्षा, एवढा जुनून दुसऱ्या कोणत्याच मॅचमध्ये, दुसऱ्या कोणत्याच खेळात दिसत नाही. अगदी एखाद महायुद्ध खेळल्याप्रमाणे हे सामने खेळले जात.

पण गंमत म्हणजे जेवढी इर्षा मैदानात असायची त्याच्या अगदी उलट वातावरण सामना संपल्यावर असायचं. दोन्ही देश सख्खे शेजारी. भाषा सेम, खाणे-पिणे,पेहराव,संस्कृती सेम. आजकाल खेळातही राजकारण आलं आहे. पण तो काळ वेगळा होता. खेळाडू मॅच संपल्यावर एकमेकांच्या रूममध्ये जाऊन गप्पा

मारायचे. घरून आलेला डब्बा शेअर व्हायचा. आपल्या खेळात कोणती सुधारणा करता येईल या बद्दल डिस्कशन व्हायचं. विरुद्ध टीमचा सिनियर खेळाडू सुद्धा आपल्या मोठ्या भावाप्रमाणे समजला जायचा.

ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

नुकतेच १९९२ सालचे वर्ल्ड कप झाले होते. पाकिस्तानने इम्रान खानच्या अनुभवी नेतृत्वाखाली तो वर्ल्डकप खिशात टाकला होता. या वर्ल्डकपमध्ये वसिम आणि इम्रानने हवा केलीच होती पण या वर्ल्डकपच सरप्राईज पकेज ठरला गोल गुब्ब्या इंझमाम उल हक.

यापूर्वी त्याच कोणी नाव सुद्धा ऐकल नव्हत. वर्ल्डकपचे सुरवातीचे सामने तो फेलच गेला होता मात्र जसा जसा वर्ल्डकप मध्ये रंग भरत गेला तसा तसा इंझमाम खुलत गेला. नॉक आउट, सेमीफायनल, फायनल यात त्याने केलेला खेळ बघितला तर वर्ल्डकप जिंकण्यात इम्रान खानचा हुकुमाचा एक्का म्हणजे इंझमामच ठरला.

अगदी लहान वयात इंझमाम पाकिस्तानचा हिरो बनला.

त्याच्या बेदरकार बॅटिंगचं जगभरात कौतुक होत होतं. इंझमाम त्यामुळे आणखी थोडासा फुगला. व्हिव्ह रिचर्डस वगैरेचा रेकोर्ड मोडू शकणारा म्हणून त्याला ओळखू लागले. पाकिस्तानची या पुढची सिरीज होती इंग्लंड.

इंझमाम पहिल्यांदाच कसोटी खेळणार होता. इंग्लंडमध्ये देखील जाण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव होता, तिथल्या विकेट्स कशा असतात, नेमक कस खेळावं लागत याचा त्याला कसलाच अंदाज नव्हता. खऱ्या अर्थाने त्याची ही पहिली टेस्ट होणार होती.

वर्ल्डकप मध्ये केलेल्या कामगिरीच्या आत्मविश्वासावर इंझमाम खेळायला उतरला. पहिल्या कसोटीत त्याला एकदाच बॅटिंग मिळाली त्यात त्याने नाबाद ८ धावा केल्या. हाय स्कोरिंग झालेली ही मॅच ड्रॉ झाली.

पण तिथून पुढेचे तीन सामने मात्र इंझीसाठी दुःखद स्वप्न असणारे होते. 

तेव्हा इंग्लंडच्या टीममध्ये ख्रिस लुईस आणि डेव्हन माल्कम नावाचे दोन आग ओकणारे फास्टर बॉलर होते. त्यांनी इंझमामला बाउन्सरवर बाउन्सर मारून बेजार केलं. तस पाकिस्तानमध्ये नेतस मध्ये वसिम,वकार, इम्रान खान यांना खेळलेल्या इंझमामला आपण शॉर्ट पीच बॉल सहज खेळू शकतो असा विश्वास होता पण इंग्लंडमध्ये या ओव्हर कॉन्फीडन्सचे तुकडे तुकडे झाले.

इंग्लंडमधील हवामान, तिथले पीच हे पाकिस्तानपेक्षा खूप वेगळे असतात. माल्कमने इंझमामला दुसऱ्या कसोटीत झिरोवर आउट काढले. त्यावेळी त्यांच्याही लक्षात आले कि याला शॉर्टपीच बॉलवर खेळता येत नाही आहे. इंझीच्या कामगिरीला त्या मॅच पासून गळती लागली.

तब्बल चार कसोटी खेळून इंझमामने फक्त १३ च्या सरासरीने तीस चाळीस धावा काढल्या.

इंझमाम खूप निराश झाला. वर्ल्डकपनंतर त्याचा गुरु इम्रान खान रिटायर झाल्यामुळे त्याला मार्गदर्शन करायला कोणी नव्हत. नवा कप्तान जावेद मियांदाद त्याला आपला स्पर्धक समजत असल्यामुळे तो काही सल्ला देईल अस वाटत नव्हत.

इंझमामला वाटल आता अपल करीयर संपल. 

कोणताही नवा खेळाडू सलग चार कसोटीत फेल गेला तर त्याला परत चान्स मिळत नाही शिवाय टीममध्ये असलेल्या शत्रूंमुळे हे अस होण्याची शक्यता जास्त होती. इंझमामला अगदी असाह्य झाल्यासारख वाटत होत. टेस्ट मधल्या कामगिरीचा परिणाम वन डे मध्ये सुद्धा दिसू लागला होता.

अशातच एकदा एक प्रदर्शनीय सामना भरवण्यात आला होता आणि जगभरातले नवे जुने खेळाडू यासाठी एकत्र आले होते. यात भारताचे खेळाडू देखील होते. त्यातच होता द ग्रेट बॅट्समन सुनील गावसकर.

सुनील गावसकर रिटायर होऊन बरेच वर्षे झाले होते पण चॅरीटी मॅच असल्यामुळे तो देखील सहभागी झाला होता.

इंझमाम अगदी लहानपणापासून सुनील गावसकर यांचा खूप मोठा फन होता. त्यांना खेळताना बघणे हे त्याच स्वप्न होत आणि आज त्यांच्या बरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायची संधी त्याला मिळाली होती. इंझमामने या संधीचा फायदा उठवायचं ठरवलं.

मॅच संपल्यावर सगळे खेळाडू गप्पा मारत बसले होते. इंझीने धाडस गोळा केलं आणि सुनील गावसकर यांना एक मदत हवी होती अस म्हणाला. सुनील गावसकर यांनी त्याला काय म्हणून विचारलं. इंझमाम म्हणाला,

“सनी भाई मुझे शॉर्ट बॉल पे प्रॉब्लेम हो रही है.”

सुनील गावसकर आपल्या स्टाईलमध्ये हसले. इंझमामला वाटल कि आता हे मोठ लेक्चर देणार, हँड टेक्निक, फुटवर्क, हेड पोजिशन याबद्दल सांगणार पण गावसकर यांनी या पैकी काहीही सांगितल नाही. त्यांनी एकच सल्ला दिला.

“तुझ्या टेक्निकमध्ये काहीही दोष नाही. प्रॉब्लेम मानसिक आहे. तू शॉर्ट बॉल बद्दल जरा जास्तच विचार करतोस आणि त्याची भीती बसल्यामुळे आउट होतोस. आता पुढच्या मॅचपासून बॉलर कोणता बॉल टाकणार आहे याचा विचार करू नको, जसा बॉल येईल त्याला नॅचरल रिअक्ट हो.”

इंझमामला हा छोटासा सल्ला ऐकून खूप आश्चर्य वाटलं.

पण सिनियर खेळाडूंनी सांगितल आहे त्यामुळे त्याच पालन करायचं ठरवलं. हे खूप अवघड होत पण नेट्स मध्ये खेळताना इंझमामने प्रचंड मेहनत घेतली. गंमत म्हणजे याचा त्याला फायदा झाला.

इंझमाम म्हणतो ही गोष्ट झाली १९९२ मध्ये आणि मी रिटायर झालो २००८ मध्ये. या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत सनी भाई यांनी सांगितलेलं ते एक वाक्य मनाशी कोरून ठेवल आणि यामुळे मला परत बाउन्सर व शॉर्ट बॉल खेळण्यास अडचण आली नाही.

करीयर संपून जाण्याची वेळ आलेला इंझमाम  सुनील गावसकर यांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक ठरला. नुकताच झालेल्या सुनील गावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंझमामने आपल्या युट्युब चॅनलवर हा किस्सा सांगितला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.