अशी आहेत इतिहासातील प्रसिद्ध, १२ मावळ ; हा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. आशा दोन उपशाखांच्या मधून सामन्यात:एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्यांना मावळ किंवा खोरी म्हणत. त्यामुळे या प्रांतात वाहणाऱ्या नद्या, उपनद्या, किल्ल्यांच्या अथवा गावांच्या नावावरून हा प्रदेश ओळखला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना हे बारा मावळ एकत्र करून केली.
या डोंगराळ मावळ प्रांतची सिमा दक्षिणेकडे रायरेश्वराचे पठार ते उत्तरेकडे राजमाची किल्ला परिसर, पश्चिमेकडे अभेद्य जावळीचे खोरे, कोकण प्रदेश आणि पूर्वेकडे सपाट पुणे परगणा अशी आहे. या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत .
या मावळांनी सुभान मंगळ लढाई, प्रतापगड रणसंग्राम, सुरतेची लुट, पावनखिंड रणसंग्राम, शाहिस्तेखानावरील छापा, अशा अनेक इतिहास प्रसिद्ध प्रसंगात पराक्रम गाजवला आहे. आशा या लढाऊ भागाची भौगोलिक माहिती.
१. रोहिड खोरे
रोहिड खोरे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे. त्यात एकूण ४२ गावं आहेत. तर रोहिडा किल्ला हे या खोऱ्याचं मुख्य ठिकाण होतं. या खोऱ्यातील देशमुखी खोपडे आणि जेधे या दोन घराण्यात विभागली होती. कान्होजी जेधे यांच्याकडे भोर तरफ भागाची देशमुखी होती, तर उत्रोली तरफ भागाची देशमुखी खोपडे यांच्याकडे होती. आशा रोहिडे खोऱ्याच्या दोन तरफ झाल्या होत्या.
कान्होजी जेधेंची राजनिष्ठा अभंग असल्याचा प्रत्यय अफजल खान वध प्रसंगी आला होता. अनेक देशमुख खानाला जावून मिळत असताताना कान्होजींनी शिवरायांना भक्कम पाठिंबा दिला. शिवरायांच्या दरबारात पहिले पान होते, म्हणजे कोणतीही मोहीम आली तरी पहिले पत्र जेधेंना पाठवले जायचे.
२. हिरडस मावळ
हिरडोशी या गावावरून या मावळाला हिरडस मावळ असे म्हटले जायचे. या मावळात एकूण ५३ गावे होती. त्यातील काही काही भाग हा निरा नदीच्या खोऱ्यात येतो. हिरडस मावळची देशमुखी ही बांदल घराण्याकडे होती.
यातील ५३ गावापैकी फक्त शिंद या गावच्या नावामागे कसबा ही उपाधी होती. तर इतर गावच्या मागं मौजा ही उपाधी लावलेली असायची. त्यावरून शिंद हे त्या मावळाचे मुख्य ठिकाण होते. ही सर्व गावं सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात.
३. वेळवंड खोरे
हे खोरं वसलं आहे ते वेळवंडी नदीच्या खोऱ्यात. एकूण ३३ गाव या खोऱ्यात होती. वेळवंडी नदी गुंजण मावळात उगम पावते आणि पुढे वेळवंड खोऱ्यातुन वाहत जावून रोहिड्या खोऱ्यातील नीरा नदीस मिळते.
हर्णस, पसुरे, करंदीकांबरे, तळे मशिवली, लव्हेरी, जोगवडी आदी ऐतिहासिक गावे या खोऱ्यात आहेत. त्यातील हर्णस हे खोऱ्याचं मुख्य केंद्र होते. तर या मावळची देशमुखी होती सरदार बाबाजी धुमाळ यांच्याकडे. “डोहर” यांना “आढळराव” असा किताब होता.
४. गुंजन मावळ
हे मावळ गुंजवणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. गुंजवणी नदी याच मावळात उगम पावते आणि पुढे नीरा नदीस जावून मिळते. जवळपास ८१ गावं या खोऱ्यात होती. खोऱ्याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे.
गुंजन मावळातील गावापैकी काही गावे सध्याच्या भोर तालुक्यात येतात. आणि काही वेल्हा तालुक्यात मोडतात. या मावळातील मुख्य गाव आंबवणे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही देखील याच खोऱ्यात येते.
इथली देशमुखी होती सिलिंबकर घराण्याकडे. ते शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याच्या उपक्रमात पहिल्यापासून सहभागी होते. महाराजांच्या खास घरोब्यातील देशमुख म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मराठेशाहीच्या अखेरपर्यंत या घरातील पुरुषांनी कर्तबगारी गाजवली.
५. कानद खोरे
हे मावळ कानंदी नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. कानंदी नदी याच खोऱ्यात उगम पावते आणि पुढे गुंजण मावळात गुंजवणी नदीस मिळते. या मावळाच मुख्य ठिकाण म्हणजे कानद. या मावळच्या सीमेवच स्वराज्यची मुहूर्तमेढ ज्या तोरणा किल्ल्यावर रोवली तो आहे.
या मावळची देशमुखी मरळ घराण्याकडे होती. झुंझारराव हा किताब त्यांना मिळाला होता. भट्टी, पाबे, विंझर, धानेप कोंढावळे, चापटे आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत.
६. मोसे खोरे
हे मावळ मोसे/मोशी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. ही नदी मोसे खोऱ्यातच पुढे मुठा नदीस मिळते. या मावळात ८२ गावे आहेत. त्यात तव, निगडे-मोसे, शिरकोली अशी ऐतिहासिक गावे आहेत. या भागात कुंभा, कावळ्या देव आदी घाट आहेत.
मोसे बुद्रुक हे या मावळच मुख्य ठिकाण. इथली देशमुखी होती पासलकर घराण्याकडे. यशवंतराव हा त्यांचा किताब होता.
७. मुठा खोरे :
मुठा खोरे हे मुठा नदीच्या उगमापासून काही अंतरावरच्या खोऱ्यात वसलं आहे. पुढे ही नदी मोसे खोऱ्यातुन व कर्यात मावळातून वाहत जाते आणि पुणे परगण्याच्या हवेली तरफेतील मुळा नदीस जावून मिळते.
आंदगाव, मुठा अशी ही एकूण १९ गावं या मावळात आहेत. या मावळात एकही किल्ला नाही. मारणे घराण्याकडे इथली देशमुखी होती. त्यांना गंभीरराव असा किताब होता.
८. पौड खोरे
हे मावळ मुळा नदीच्या उगमा पासूनच्या काही अंतरावरील खोऱ्यात वसलेले आहे. या मावळातील गावांची संख्या एकूण ८२ इतकी होती. पौड हे इथलं मुख्य ठिकाण असलं तरी पौड खोऱ्यात ३ तरफ होत्या. यात गिर्हे तरफ, तामणखोरे तरफ, कोर बारसे तरफ,
या मावळात घनगड व कोरीगड ( कुवरीगड ) हे दोन किल्ले होते. या मावळात ताम्हिणी घाट लेंडी घाट, वाघजाई घाट, गाढवलोट घाट आहेत. इथली देशमुखी होती ढमाले घराण्याकडे. आणि त्यांचा किताब होता राऊतराव.
९.पवन मावळ :
हे मावळ पवना नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. हि नदी पुढे मुळा आणि भीमा नदीला मिळते. या मावळात एकूण ८० गावे आहेत. या मावळात बेबड ओव्हळ, शिंदगाव आदी ऐतिहासिक गावे आहेत.
पवन मावळाच्या दोन तरफा आहेत. त्यापैकी शिंदे तरफेची देशमुखी शिंदेकडे होती. त्यांच्याकडे ३७ गावे आहेत. आणि घारे तरफेची देशमुखी ही भोपतराव घारे देशमुख यांच्याकडे होती. त्यांच्याकडे एकूण ४३ गावे आहेत.
या मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण , मोरवे ही गावे; पूर्वेला चांदखेड, बेबड वोहोळ तर दक्षिणेला दखणे, सावरगाव या पवन मावळच्या सीमा होत्या.
तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंत सचिवांच्या भोर संस्थानात होती.
१०. नाणे मावळ
हे मावळ इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. इंद्रायणी पुढे भीमा नदीला मिळते. या मावळा ८९ गावे आहेत. यात नाणे, टाकवे, कार्ले आदी ऐतिहासिक गावे आहेत. यातील नाणे हेच या मावळचे मुख्य केंद्र होते.
या मावळात बोरघाट व कुरंवडी आदी घाट आहेत. या मावळात राजमाची, लोहगड, विसापूर, असे अत्यन्त महत्वाचे किल्ले आहेत. इथली देशमुखी गरुड आणि दळवी या घराण्यांकडे होती.
११. खेडबारे मावळ
हे मावळ शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत. ही नदी सिहंगडच्या दक्षिणेस उगम पावते आणि सध्याच्या पुणे-सातारा रस्त्याच्या पश्चिमेस समांतर वाहत पुढे जावून गुंजवणी नदीस मिळते. गुंजवणी नदी पुढे नीरा नदीस मिळते.
या मावळात ४२ गावे आहेत. खेड शिवापूर, रांझे, कोंढाणपूर, कल्याण, कापूरहोळ आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत. तर खेड हे या मावळचे मुख्य ठिकाण, या मावळात सिंहगड किल्ला आहे.
इथली देशमुखी कोंडे या घराण्याकडे होती.
१२. कर्यात मावळ
ही पुणे परगण्याची एक तरफ आहे. कर्या म्हणजे खेडेगाव, कर्यात मावळ म्हणजे मावळची खेडी. या मावळात ३६ गावे होती. त्यापैकी १८ गावाची देशमुखी ही करंजावणे घराण्याकडे होती, आणि १८ गावची देशमुखी पायगुडे घराण्याकडे होती.
करंजावणे देशमुखांचा किताब “भालेराव” असा होता तर पायगुडे देशमुखांचा किताब “रवीराव”असा होता.
या मावळात खामगाव मावळ, आगळंबे, मांडवी, आदी ऐतिहासिक गावे आहेत. तसेच पुणे परगण्याच करेपठार, जेजुर , सासवड, पांगारी, नारायण पेठ आदी ऐतिहासिक गावी आहेत. पुरंदर किल्ला या परिसरात आहे.
हे हि वाच भिडू.
- छ. शिवाजी महाराज म्हणाले, शेतकऱ्याचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे
- छ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली होती
- छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती उदयनराजे. ही आहे छत्रपती घराण्याची वंशावळ !