मुंडेंच्या मृत्यूनंतरची पोटनिवडणूक रजनी पाटलांच्या पतींमुळे बिनविरोध होऊ शकली नाही…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकच चर्चा चालू होती. राज्यसभा खासदारकीचं इलेक्शनच काय होणार ? काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. आता हि एक निवडणूक म्हणजे गेल्या काही वर्षात झालेल्या सगळ्या राजकारणाचे उट्टे काढण्याची संधी समजली जात आहे.

काँग्रेसने रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,

“आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”

पण याच्या उलट भाजपने विरोधी पक्षातर्फे संजय उपाध्याय यांची उमेदवारी जाहीर केली. या सगळ्या मागे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न, भाजपच्या निलंबित झालेल्या १२ आमदारांचा प्रश्न असे अनेक प्रश्न अशा अनेक गोष्टींचं राजकारण सुरु होतं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत होतं.

एकूणच या निवडणुकीच्या पडद्या आड बरच राजकारण घडत असल्याचं चित्र पाहायला मिळतं होतं. आज या संपूर्ण चर्चेवर पडदा पडला. भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली. रजनीताई पाटील बिनविरोध निवडून येणार हे नक्की झालं.

काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राची आजवरची परंपरा पाळली गेली म्हणून आनंद साजरा केला.

पण या निमित्ताने प्रश्न विचारला जातोय,

खरंच महाराष्ट्रात एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते का?

या प्रश्नाचं उत्तर नाही असच आहे. आणि हि परंपरा काँग्रेसनेच मोडली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हि परंपरा मोडणारे होते अशोक पाटील. आपल्या रजनीताई पाटलांचे पती.

आज सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या सर्वात विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पाटील एकेकाळी शंकरराव चव्हाण यांच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जायच्या.  गदर चळवळीचे संस्थापक आणि 1915 लाहोर येथे मृत्यूदंड झालेले हुतात्मा गणेश पिंगळे यांच्या रजनी पाटील नात तर क्रांतीवीर आत्माराम बापू पाटील त्यांचे वडिल. आत्माराम बापू पाटलांनी १९३७ मध्ये सातारा मतदार संघातून देशात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवल्याचा इतिहास आहे. गोवा मुक्तीसंग्रामातील सहभामुळे त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला.

रजनीताई पाटलांचे लग्न बीडच्या अशोक पाटील यांच्याशी झालं. अशोक पाटील हे विद्यार्थी, युवक चळवळीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते. शंकरराव चव्हाणांशी त्यांचे चांगले संबंध होते. युवक काँग्रेसमध्ये केलेल्या कार्याची पावती म्हणून अशोक पाटील यांना १९८५ मध्ये चौसाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. 

अशोक पाटीलच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधुन झाली. त्यावेळी अटीतटीच्या १९८५ निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. पुढे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात अशोक पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम, युवक व क्रीडा खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. ते शंकररराव चव्हाण यांचे खंदे समर्थक तर होतेच शिवाय माजी पंतप्रधान (कै.) राजीव गांधी यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंध राहिलेले होते.

नव्वदचं दशक उजाडलं तोपर्यंत बीडच राजकारण प्रचंड बदललं होतं. चाळीस वर्षांपूर्वी शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके, बाबूराव आडसकर, केशरकाकू क्षीरसागर, पंडितराव दौंड यांनी कुशल राजकारणातून सत्तास्थाने काबीज केलेली होती. परंतु आता भाजपचे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी आणि काँग्रेसमध्ये अशोक पाटील या युवा नेत्यांचा उदय झाला.

विशेषतः गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवत बीडमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरात भाजपचे आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याला सुरवात केली होती.  

१९९१ साली राजीव गांधी यांचे निधन झाले. सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्यास इन्कार केला. काँग्रेसमध्ये नरसिंहराव, शरद पवार अशा नेत्यांचा वरचष्मा वाढला. यातूनच ठिकठकाणी काँग्रेसमध्ये गटातटामध्ये वाढ झाली. बीडमध्ये होत असलेल्या संघर्षाला कंटाळून अशोक पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

१९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नामुळे चक्क रजनी पाटील यांना भाजपची उमेदवारी  मिळाली. केशरकाकू क्षीरसागर यांना हरवून त्या निवडून देखील आल्या. वाजपेयी सरकार वेळी रजनी पाटील भाजपच्या खासदार होत्या. पण पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 

पुढच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं. सोनिया गांधींचं राजकरणात आगमन झालं होतं. भाजपच्या खासदार असल्या तरी रजनी ताई पाटील यांची नाळ काँग्रेसशी जोडली गेली होती. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी शंकरराव चव्हाण यांच्या सल्ल्याने त्या काँग्रेसमध्ये परतल्या. सोनिया गांधी यांच्या पर्यंत त्यांची ख्याती पोहचली.

संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व, गांधी घराण्याशी असलेले चांगले संबंध या बाबींमुळे रजनी पाटील यांना महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचं अध्यक्षपद अशी अनेक महत्वाची पदे मिळाली.

यातूनच विलासरावांच्या मृत्यू नंतर रिक्त झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेवर रजनी पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर झाली. भाजपने उमेदवार ने दिल्याने त्या बिनविरोध निवडून देखील आल्या. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे हे शक्य झालं.

पुढच्या दोन वर्षातच दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. गोपीनाथजी तेव्हा केंद्रात मोदी सरकारमध्ये  ग्रामविकास मंत्री होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर बीड च्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका घ्याव्या लागणार होत्या.

भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. 

महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे तिथे विरोधकांनी उमदेवार न उभं करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला नाही. पण त्याकाळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फुटली होती आणि दोन्ही पक्ष वेगळे वेगळे लढती होते. यातूनच काँग्रेसतर्फे अशोक पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अशोक पाटील तेव्हा बीडमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे चांगले मित्र म्हणून देखील ओळखले जायचे. तरीही मुंडे यांच्या मृत्यूनंतर अशोक पाटील यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणे हे अनेकांना रुचले नाही. याचा परिणाम मतदानात देखील दिसला.

प्रीतम मुंडे यांनी अशोक पाटील यांचा जवळपास ७ लाख मतांनी पराभव केला. बीडची जनता मुंडेंच्या कन्येच्या पाठीशी उभी ठामपणे राहिली. 

आता राजीव सातव यांच्या निधनानंतर रजनीताई पाटील यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरु झाली आहे तेव्हा आजही बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या पोटनिवडणुकीची आठवण काढली जाते आणि तेव्हा कुठे गेली होती महाराष्ट्राची उज्वल परंपरा असा प्रश्न देखील विचारला जातोय.

हे ही वाच भिडू.

    

 

Leave A Reply

Your email address will not be published.