या सरसेनापतींनी सर्वप्रथम गुजरातला मराठ्यांच्या टापेखाली आणलं..

दाभाडे हे महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील. त्यांचे सुपुत्र येसाजी हे शिवाजी महाराजांच्या हुजुरी काम करीत होते.

महाराज आग्र्यास गेले होते तेव्हा येसाजींनी इकडे राजकुटुंबाची सेवा केली. त्यांचा थोरला मुलगा खंडेराव होय.

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने फितुरीचा वापर करून पकडले आणि हालहाल करून मारले. तेव्हा छञपतिपद त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराजांना मिळाले. स्वराज्यातील परिस्थिती गंभीर बनल्यावर प्रमुख सल्लागारांनी निर्णय घेतला की छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेतील जिंजी येथे सुरक्षित आसरा घ्यावा म्हणजे मुघलांशी लढा देणे सोपे होऊन जाईल.

राजाराम महाराज जिंजीला गेले तेव्हा दाभाड्यांचे खंडोजी आणि शिवाजी हे दोन्ही बंधू त्यांच्या सोबत आले. महाराजांच्या रक्षणासाठी त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. यामुळे खुश झालेल्या राजाराम महाराजांनी त्यांना दाभाडे हे गाव बक्षीस दिले.

जिंजीहून परत येताना छत्रपतींचा कबिला खंडेराव दाभाडे यांनी महत्प्रयत्नाने पन्हाळ्यास पोहोचविला. या कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांना सेनाखासखेल ही पदवी आणि काही गावे इनाम दिली.

राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले. अनेक मराठा सरदार त्यांचे छञपतिपद मान्य करून सातारा गादीच्या आश्रयाला आले. यात खंडेराव दाभाडे यांचाही समावेश होता.

छत्रपती शाहू महाराजांशी काही मतभेद झाल्यामुळे सरसेनापती चंद्रसेन जाधव ताराराणीच्या पक्षात जाऊन मिळाले.  त्यामुळे रिकाम्या झालेले सरसेनापतिपद शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ रोजी खंडेराव दाभाडे यांच्याकडे सुपूर्द केले आणि त्यांना चाकण, पारनेर येथे दोन मोठ्या जहागिऱ्या दिल्या.

मुघलांचा दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्धच्या मोहिमेची जबाबदारी शाहूमहाराजांनी खंडेराव दाभाडेंवर सोपविली. त्यांनी खानदेश गुजराथवर स्वार्‍या करून हुसेनचा रस्ता अडविला, तेव्हां त्यानें झुल्फिकारबेग यास मराठ्यांवर हल्ला करण्यास पाठवले. खंडेरावांनी झुल्फिकार खानाची सारी फौज अडचणींत गाठून कापून काढली.

छत्रपतींचे पेशवे बाळाजी विश्वनाथ व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचें सर्व बाबतीत एकमत असे. त्यामुळें बाळाजीपंतांनीं ठरविलेल्या राज्यव्यवस्थेस अमलांत आणण्याचें लष्करी काम खंडेराव दाभाडेंनी केलं. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वर्‍हाड व गुजराथ या तिन्ही प्रांतावर नजर ठेवण्याचं काम सरसेनापतींकडे सोपवण्यात आले होते.

खंडेराव दाभाडेंनी वसई ते सुरतपर्यंतचे कोंकण काबीज केले होतें. गुजरात मध्ये मराठ्यांचा दबदबा त्यांनीच निर्माण केला. मुघलांचे तेथील वर्चस्व पहिल्यांदा दाभाडेंनीच मोडून काढले.  

त्यांच्याबद्दल `बडे सरदार, मातबर, कामकरी हुषार होते’ असा उल्लेख शाहु म. बखर यात आढळतो. शाहूछत्रपतींची मर्जी त्यांच्यावर पुष्कळ होती. ते एकदा पोटशुळानें आजारी पडला असतां महाराजांनी स्वतः त्यांचा समाचार घेतला होता.

छत्रपतींचे मानसपुत्र फत्तेसिंग भोसल्यांच्या अधिपत्याखालीं कर्नाटकांत १७२५-२६ साली झालेल्या स्वारीत सेनापती हजर होते. पुढे वृद्धापकाळ आल्याने आणि नवे पेशवे बाजीराव यांनी स्वतःच मोहीम आपल्या हातात घेतल्यामुळे त्यांचा सहभाग हळूहळू कमी होत गेला. 

खंडेरावांच्या मृत्युनंतर शाहू महाराजांनी त्यांचे सुपुत्र त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. त्यांचे आणि पेशवे बाजीरावांचे विचार फारसे जमले नाहीत. दाभाड्यांचा आणि पेशव्यांचा मुख्य झगडा होता तो गुजरात प्रांताच्या मोकाशासंबंधी.

गुजरातेत सेनापती दाभाड्याची स्थापना झाली, तेव्हा शाहू महाराजांनी गुजरात प्रांताची निम्मी मोकासबाब चिमणाजी बल्लाळ याजकडे व निम्मी त्रिंबकराव दाभाडे याजकडे पाठवावी, असा ठराव करून दिला; परंतु पुढे सेनापतीनी तो पाळला नाही. गुजरातवरील निम्मा हक्क पेशव्यांनी कधीही सोडला नाही. त्यामुळे कलह निर्माण झाला.

पुढे या दोघांची लढाई देखील झाले. यात त्रिबंकराव दाभाडे मारले गेले. ही डभईची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच खंडेरावांच्या पत्नी रणरागिणी उमाबाईसाहेब चवताळून उठल्या. त्यांनी पेशव्याना धडा शिकवण्याचा मनसुबा रचला.

शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात पराक्रमी दोन सरदार घराणे आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत हे छत्रपती शाहुरायाना आवडले नाही. ते स्वतः बाजीरावला घेऊन तळेगावला आले. त्यांनी उमाबाईसाहेबांची समजूत काढली.

“आपला मुलगा समजून बाजीरावास माफ करावे आणि एक चित्ताने कारभार करावा”

असा आदेश महाराजांनी दिला.

सरसेनापती पद उमाबाईचां मधला मुलगा यशवंतराव दाभाडे यांना आणि सरखालखेल पद धाकटा मुलगा बाबुराव दाभाडे याला देण्यात आले. ही मुले अल्पवयीन असल्यामुळे सेनापतीपदाची जबाबदारी उमाबाईसाहेब यांच्यावर आली.

उमाबाई साहेब दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने हे पद सांभाळलं. त्या स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती ठरल्या. त्या मोहिमेवर स्वतः हजर असायच्या. त्यांच्या शौर्याने खुश होऊन शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू, पांढरी शाल, दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले. लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाईंचे स्वप्न पूर्ण झाले.

त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगावच्या सेनापती घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.