बैठ्या लावणीची सम्राज्ञी म्हणून कायम गुलाबबाई संगमनेरकरच ओळखल्या जातील…

बैठकीची लावणी म्हणजे त्यांच्या जीव की प्राण. त्यांनी अनेक मराठी, हिंदी सिनेमात लावणी सादरी केलीये. खरं त्यांना बैठकीची लावणीसाठी ओळखलं जात होते. अशा ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे आज वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. 

गुलाबबाई संगमनेरकर यांनी गेली अनेकवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अभिनेते यशवंत दत्त यांच्या सारखे चाहते त्यांना लाभले होते. गुलाबबाई यांचे मूळ आडनाव हे थोरात होते. पण त्यांचा जन्म संगमेनरचा असल्याने त्यांनी तमाशा परंपरे प्रमाणे संनमनेर आडनाव लावले. 

गुलाबबाई यांचा जन्म १९३३ सालचा.

दयाराम मोरे वडील तर शिवडाबाई उर्फ शांताबाई त्यांच्या आई होत्या. त्यांची आई सुद्धा तमाशातील उत्तम कलाकार म्हणून ओळखल्या जायच्या. दगडोबा साळी यांच्या तमाशात शिवडाबाई यांनी अनेक वर्षे काम केले होते. आपला लोककलेचा वारसा लेकीने पुढे चालवावा म्हणून त्यांनी मुलगी गुलाबबाईला  लहानपणापासून लावणी शिकवायला सुरुवात केली.

तिसऱ्या वर्गात असतांना गुलाबबाईंना त्यांच्या आईने लावणी शिकायला पाठवायचे ठरवले. लावणी क्षेत्रात त्यावेळी राधाबाई बुधगावकर हे नाव गाजत होते. त्यांच्या संगीत पार्टीचा नाशिकला मुक्काम असताना शिवडाबाईंनी यांनी त्यांना लावणीचे धडे घ्यायला पाठवले. मात्र त्यांना इथे जास्त काही शिकता आले नाही.

खूप कष्टाने त्या लावणी कला शिकल्या. त्यासाठी अनेक लावणी कलावंतांच्या फडात पडेल ते कामही केलं. त्यात गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर यांच्यासारख्या अस्सल कलावंताचा समावेश होता. 

खान्देशमधील आनंदराव महाजन यांच्या तमाशात गुलाबबाई यांनी बरीच वर्षे काम केले. हा काळ तात्यांचा उमेदीचा होता.  पुढे तमाशासम्राट तुकाराम खेडकर यांच्या पार्टीमध्ये काम केल्यानंतर गुलाबबाईंनी स्वत:ची संगीतबारी सुरू केली.

गुलाबबाईंनी बैठकीच्या लावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रच ओळखलं जातं असली तरीही तब्बल पस्तीसेक वर्षं त्यांच्याकडे खानदेशच्या लावणीकलेचं अनभिषिक्त सम्राज्ञीपद होतं. त्या खान्देशातील त्यांच्या पार्टीचा गावामध्ये कधी आठ दिवस, तर कधी महिनाभरही मुक्काम असायचा. त्यामुळे गुलाबबाई खानदेशात गेल्या आणि तिथल्याच झाल्या असेही म्हटले जाऊ लागले.

कालांतराने पुण्याच्या प्रसिद्ध आर्यभूषण थिएटरमध्ये काम केले.

प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यामध्ये गुलाबबाई यांनी पार्श्वगायन केले. बहीण मीरा हिच्यासमवेत आर्यभूषण थिएटरमध्ये ‘गुलाब-मीरा संगमनेरकर’ या नावाने स्वतंत्र पार्टी सुरू केली. 

भारतरत्न लता मंगेशकर गायलेल्या लावण्यांपैकी ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाबबाईंनी आपल्या खास अदाकारी कराव्यात अशी इच्छाच खुद्द लतादीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनी शब्द पाळत लावणीवर ठसकेदार अदाकारी सादर केली. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई यांनी गायलेल्या बऱ्याच लावण्या आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित केल्या जायच्या.

यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर दिल्लीमध्ये सादर झालेला लावण्यांचा कार्यक्रम, लता मंगेशकर यांच्या ‘आजोळची गाणी’ या अल्बममध्ये ‘राजसा जवळी जरा बसा..’ या लतादीदींच्या स्वरातील लावणीला गुलाबबाई यांची अदा नेहमी लक्षात राहिलं, तशीच ‘रज्जो’ या पिक्चर मध्ये कंगना राणावत सोबत केलेल्या लावणी बद्दल त्यांना आठवणीत ठेवलं जाईल. 

 २०१८ – १९ मध्ये  राज्य शासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना सन्मानित करण्यात आले होते. कलेला आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या गुलाबबाई संगमनेरकर यांना विनम्र अभिवादन.

हे ही वाच भिडू   

 

Leave A Reply

Your email address will not be published.