अमेरिकेचा व्हिजा मिळवण्यासाठी सुरेखा पुणेकरांना अधिकाऱ्यांसमोर लावणी सादर करावी लागली होती.

संपूर्ण भारत देशात कला प्रकारातील सगळ्यात जास्त विविधता ही महाराष्ट्रात आढळते. लावणी, पोवाडा, लोकगीते, कीर्तन, दशावतार, वासुदेव, पिंगळा, कुडमुडे जोशी, गारुडी, दरवेशी असे अनेक कलाप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही लावणी म्हणल्यावर विषयच संपला.

ढोलकी फडाचा तमाशा असुदे किंवा संगीत बारी असू दे एकदा का ढोलकीचा तोडा डोक्यात घुमायला लागला की माणूस तमाशा संपेपर्यंत जागेवरून उठत नाही. लावणी म्हणल्यावर अनेक दिग्गज नावं आपल्या समोर येतात पद्मश्री विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, मंगला बनसोडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि बऱ्याच उत्तम लावणी सादर करणाऱ्या कलाकार.

उभ्या महाराष्ट्रात लावणीला जगभर वेटेज मिळवून देण्याचं काम केलं ते म्हणजे सुरेखा पुणेकर यांनी.

या रावजी तुम्ही बसा भावजी
कशी मी राखू तुमची मर्जी…

असो किंवा

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा

त्यातलीच अजून एक म्हणजे

झाल्या तिन्ही सांजा करून शिंणगार साजा
वाट पाहते मी गं येणार साजन माझा

अशा एकापेक्षा एक बेहद्द सरस लावण्या सुरेखा पुणेकरांनी महाराष्ट्राला ऐकवल्या आणि त्यावर अनेक रसिक झिंगलेसुद्धा. लावणी कलाप्रकाराला सुगीचे दिवस सुरेखा पुणेकरांनी आणले. अनेक भले भले राजकारणी, उद्योगपती, सामान्य जनता सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचे डाय हार्ड फॅन आहेत. पण महाराष्ट्राला आपल्या घुंगरांचा नाद लावून त्यावर डोलायला लावणाऱ्या सुरेखा पुणेकरांना एकदा व्हिजा मिळवायला मोठी अडचण आली होती आणि तीही अडचण त्यांच्या लावणीमुळेचं उभी राहिली आणि लावणीमुळेच सुटली.

अमेरिकेमध्ये मराठी मंडळाचं अधिवेशन होतं. सलग 3 वर्षांपासून म्हणजे 2001 तिथली अधिकारी मंडळी सुरेखा पुणेकरांना तिकडे लावणी सादर करण्यासाठी बोलावत होते. 2003 साली सुरेखा पुणेकरांनी ठरवलं की आपण अमेरिकेला जाऊया. त्यावेळी अमेरिकेचा व्हीजा मिळवण्यासाठी कौन्सिलेटमध्ये सुरेखा पुणेकर गेल्या त्यावेळी त्यांच्यासोबत सुरेश भट होते. ज्यावेळी सुरेखा पुणेकर व्हीजा घ्यायला त्या अधिकाऱ्याकडे गेल्या तेव्हा त्यांनी काय मेकअप वैगरे केलेला नव्हता अंगावर चांगली भारीतली साडी होती.

जेव्हा ती तिथं गेल्या आणि त्यांनी व्हीजा मागितला तेव्हा तो अधिकारी म्हणाला कौन है ये ? सुरेखा पुणेकरांनी उत्तर दिलं की मै ही सुरेखा पुणेकर हुं..मै अमेरिका जा रही हुं लावणी सादर करने..तेव्हा तो अधिकारी म्हणाला की आप नहीं हो सुरेखा पुणेकर, त्यांना लावणी सादर करताना मी पाहिलंय, त्यांचं या रावजी ,बसा भावजी मी स्वतः ऐकलंय, त्या अशा दिसत नाही. एखादी भांडेवाली बाई दिसता तुम्ही.

अशा बिकट प्रसंगावेळी सुरेखा पुणेकरांनी त्या भर कौन्सिलेट मध्ये त्या अधिकाऱ्यासमोर आपली ओळख त्याला पटावी म्हणून लावणीचं एक कडवं म्हणून दाखवलं. तो अधिकारी इम्प्रेस झाला आणि टाळ्या वाजवून त्याने सुरेखा पुणेकरांना दाद दिली आणि व्हीजा देऊ केला. अशा या गमतीदार प्रसंगातून सुरेखा पुणेकर गेल्या खऱ्या, लावणीने अडचण निर्माण केली आणि तीच अडचण लावणीने सोडवली असा हा किस्सा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.