गुलाबराव पाटील अन् सुषमा अंधारे एकमेकांवर टीका करतायत, पण विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांमधील नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप केले आहेत. काही नेत्यांमध्ये टीका करण्यावरून तुंबळ स्पर्धा रंगलेली दिसते. यातीलच एक वाक् युद्ध काल जळगाव जिल्ह्यात रंगलं होतं.
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये हे वाक् युद्ध रंगलं होतं.
काल १ नोव्हेंबरला सुषमा अंधारे यांची धरणगावात सभा होणार होती. तर जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे चोपडा मतदारसंघातील धानोरा गावात पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर माध्यमांनी गुलाबराव पाटील यांना सुषमा अंधारे यांच्या सभेबद्दल प्रश्न विचारला.
तेव्हा माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले होते की,
“हे बघा ते ३ महिन्यांआधी पक्षात आलेलं बाळ आहे. त्यांच बोलणं आपण सर्वजण ऐकतोच. त्यांनी निव्वळ बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेबांवर केलेल्या टीकांच्या क्लिपा ऐकवल्या तर सर्व कळेल. या बाईने हिंदू धर्मातील देवतांवर किती भयानक टीका केली आहे, हिंदू धर्मावर काय बोलल्या आहेत या क्लिपा दाखवाव्यात.”
अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे जळगावात पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना अंधारे यांनी सुद्धा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या टीकेचा आणि पाळधीमध्ये काढण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांचा हवाला देऊन गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.
त्या म्हणाल्या की, “मग बाळ केस ओढतं, बाळ मोठ्या भावाच्या गालावर चापट्या मारतं, बाळ गालगुच्चे घेतं. गुलाबरावांनी असे चिल्लरचाळे करू नयेत. ये डर मुझे अच्छा लगा, मी या सगळ्या गोष्टी एंजॉय करते. तुम्ही बॅनर पळवू शकाल पण तुम्ही शिवसैनिक पळवू शकणार आहात का? ”
अशी टीका सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली होती.
यासोबतच धरणगावच्या सभेमध्ये सुद्धा सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर छंदीफंदी शायर अशी टीका केली आणि धरणगावमध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा मुद्दा मांडला होता.
परंतु सुषमा अंधारे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये रंगलेलं वाक् युद्ध एवढ्या टीकांपुरतच मर्यादित नाही.
कारण सध्याच्या घडीला सुषमा अंधारे या ठाकरे गटातील सभा गाजवणाऱ्या फायरब्रँड नेत्या समजल्या जातात तर गुलाबराव पाटील हे शिंदे गटातील सभा गाजवणारे फायरब्रँड नेते मानले जातात. मुंबईत झालेल्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच भाषण गाजवलं होतं तर गुलाबराव पाटील यांनी बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याच भाषण गाजवलं होतं.
या दोन गटांचे दमदार नेते काल जळगाव जिल्ह्यात समोरासमोर आले होते. सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त महाराष्ट्रात सभा घेत आहेत. तर गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येणारे आमदार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
यातच सुषमा अंधारे यांनी सभा घेतलेलं धरणगाव गुलाबराव पाटलांसाठी फार महत्वाचं आहे.
कारण गुलाबराव पाटील हे याच धरणगावजवळच्या पाळधी गावचे आहेत. त्यामुळे थेट गुलाबराव पाटील यांच्या होम ग्राउंडमध्ये जाऊन सुषमा अंधारे यांनी केली टीका केल्यामुळे याला बरचं महत्व आहे. गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघांमधून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
मात्र मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढवली, पण गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटलांचा पराभव केला होता. परंतु २०१४ मध्ये गुलाबराव पाटलांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात विजय मिळवला आणि आजतागायत तो मतदारसंघ राखून ठेवला आहे.
मात्र मंत्री झाल्यापासून गुलाबराव पाटील हे सातत्याने टीकेचे धनी बनत आहेत.
एकीकडे धरणगावला होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल विरोधकांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात रान उठावलंय तर दुसरीकडे शिंदे गटातलेच आमदार चिमणराव पाटील यांनी सुद्धा गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती.
गुलाबराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाला पाणीपुरवठ्यासाठी निधी देतात असा आरोप चिमणराव पाटील यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी गुलाबराव हे राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत आहेत अशी टीका सुद्धा चिमणराव पाटील यांनी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर चिमणराव पाटलांच्या टीकेचा सूर मावळला, परंतु आता सुषमा अंधारे यांनी टीकेचा मोर्चा हातात घेतला आहे.
आंबेडकरी चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्त्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या आंबेडकरी चळवळ, संविधान या विषयक भाषणांची नेहमी चर्चा होत असते. २०१९ मध्ये त्यांच्या गणराज्य संघ संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अंधारे यांचं नाव होतं. त्यांच्या संघटनेनं महाविकास आघाडी सरकारलाही पाठिंबा दिला होता.
राजकीय वर्तुळात येण्याआधी त्यांनी राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. यशदा प्रशिक्षण संस्थेत अंधारे या समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक होत्या. वर्षभर त्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीच्या संपादक होत्या. तसंच भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या माध्यमातूनही त्या सक्रिय असतात.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक असताना सुषमा अंधारे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर परखड टीका केली होती.
कित्येक वेळा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेखही केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळीत लागलेल्या पोस्टरवर टीका करताना बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत, ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी, केहनेवालो के पोतासाहब आदित्यजी अब लुंगी पेहेनके लुंगी डान्स कर रहे है,’ असं वक्तव्य केलं होतं.
तर ‘महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही’ असं त्या उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाल्या होत्या.
पण शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबातील सदस्यांवर टीका करणे बंद केलं आहे. आता त्या शिंदे गटातील आमदारांवर स्वतःच्या खुमासदार शैलीत टीका करत आहेत.
बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेची बांधणी करणं आणि बंडखोर आमदारांना पाडणं असे दोन आव्हान आहेत. यात सुषमा अंधारे यांचे फायरब्रँड भाषण आणि दलित, बहुजन, मुस्लिम समाजात असलेलाल त्यांचा प्रभाव, या सगळ्यामुळे शिंदे गटातील आमदारांना धक्का देण्याचं काम सुषमा अंधारे यांनी सुरु केलंय.
शिंदे गटात गेलेल्या गुलाबराव पाटील, शहाजीबापू पाटील, शंभूराज देसाई, अब्दुल सत्ता या आक्रमक भाषाशैली असलेल्या नेत्यांवर टीका करण्याच्या दिशेने सुषमा अंधारे यशस्वी पाऊल टाकत आहेत असं सांगितलं जातंय.
आता गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेनंतर महाप्रबोधन यात्रेत अंधारे कुणाला लक्ष्य करतात, बहुजन समाजात असलेली त्यांची लोकप्रियता शिवसेनेच्या मतपेटीत दिसणार का? आणि त्यांच्या हातातलं शिवबंधन सेनेला फायद्याचं ठरणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
हे ही वाच भिडू
- नाव महाप्रबोधनच का? नेतृत्व सुषमा अंधारेंकडेच का?
- शिक्षणासाठी 51 रु घेऊन घरातून निघून गेलेल्या सुषमा अंधारे आज सेनेच्या उपनेत्या आहेत…
- उद्धव ठाकरेंवर टीका ते शिवसेना प्रवेशातच उपनेतेपद, सुषमा अंधारे कोण आहेत ?