उद्धव ठाकरेंवर टीका ते शिवसेना प्रवेशातच उपनेतेपद, सुषमा अंधारे कोण आहेत ?

शिवसेनेत झालेली बंडखोरी, त्यानंतर खासदारांपासून अत्यंत निष्ठावान समजल्या जाणाऱ्या शिवसैनिकांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हे शिवसेनेतलं आऊटगोइंग काय थांबलेलं नाही. पण दुसऱ्याच बाजूला शिवसेनेत इनकमिंग सुद्धा होत आहे, काही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, काही नवे कार्यकर्ते आणि काही इतर पक्षातले नेते सध्या शिवसेनेत येऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतायत.

या शिवसेनेत येणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये एक नाव चांगलंच गाजलंय, ते म्हणजे सुषमा अंधारे.

कधीकाळी शिवसेनेवर आणि विशेषतः उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी ‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेल,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलाय.

याआधीही त्यांचं नाव त्यांच्या भाषणांमुळं गाजत होतं, विधानसभा निवडणूकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या, आता शिवसेनेनं त्यांच्यावर थेट उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

सुषमा अंधारे  कोण आहेत ? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? आणि त्यांच्या शिवसेना प्रवेशामागचं राजकारण काय ? हेच जाणून घेऊयात.

आंबेडकरी चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्त्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी २००९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर २०१८ मध्ये गणराज्य संघ नावाची संघटना स्थापन करत त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं.

महाराष्ट्रभर त्यांच्या आंबेडकरी चळवळ, संविधान या विषयक भाषणांची चर्चा होत असते. २०१९ मध्ये त्यांच्या गणराज्य संघ संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अंधारे यांचं नाव होतं. महाविकास आघाडी सरकारलाही त्यांच्या संघटनेनं पाठिंबा दिला होता.

राजकीय वर्तुळात येण्याआधी त्यांनी राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. यशदा प्रशिक्षण संस्थेत अंधारे या समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक होत्या. वर्षभर त्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीच्या संपादक होत्या. तसंच भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या माध्यमातूनही त्या सक्रिय असतात.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक असताना सुषमा अंधारे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर परखड टीका केली.

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेखही केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळीत लागलेल्या पोस्टरवर टीका करताना बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत, ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी, केहनेवालो के पोतासाहब आदित्यजी अब लुंगी पेहेनके लुंगी डान्स कर रहे है,’ असं वक्तव्य केलं होतं.

तर ‘महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही’ असं त्या उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाल्या होत्या.

पण फक्त राजकीय व्यासपीठावरच नाही, तर सामाजिक व्यासपीठावरुन त्यांनी केलेली भाषणंही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असतात.

अगदी दोनच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं पहिलं कारण सांगितलं जातं, ते म्हणजे 

राष्ट्रवादीवर असलेली नाराजी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा, विधानसभेवेळी केलेला जोरदार प्रचार यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर सुषमा अंधारेंना विधान परिषदेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती, मात्र अमोल मिटकरींना संधी मिळाल्यानं त्या नाराज होत्या, असं बोललं जातं.

दुसरं कारण म्हणजे भाजपच्या कडव्या विरोधक

राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी कायम भाजपवर टीका केली. “जगण्याचा मूलाधार असणारी संविधानिक चौकट मोडण्याचा पाशवी खेळ भाजप करत आहे,” असा आरोप त्यांनी शिवसेना प्रवेश करतानाही केला. भाजपला हटवण्याचा निर्धार त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवला होता आणि यासाठीच आपण राष्ट्रवादीसोबत आहोत, भाजपला रोखायचं असेल, तर सध्या तरी महाराष्ट्रात शरद पवार या नावाशिवाय इतर कुठलाच पर्याय नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

दोन आठवड्यापूर्वीच सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं कौतुक करणारी पोस्टही सोशल मीडियावर लिहिली होती. प्रवेशावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पण शिवसेनेनं त्यांना थेट उपनेते पदाची जबाबदारी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश आणि त्यांना मोठी जबाबदारी देणं शिवसेनेसाठी का महत्त्वाचं आहे, हे जाणून घेऊयात.

पहिला मुद्दा म्हणजे आंबेडकरी चळवळीतला चेहरा

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेना विरुद्ध दलित पँथर हा संघर्ष अनेकदा पेटला होता. पुढेही नामांतर किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक यावरुनही संघर्ष झालाच, मात्र बाळासाहेबांनीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची गरज आहे, असं जाहीर वक्तव्य केलं होतं. तेव्हा रामदास आठवले शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील झाले होते. अनेक ठिकाणी शिवसेना आणि आरपीआय एकत्र लढले, मात्र सेना-भाजप युती तुटल्यानंतर आठवले भाजपच्या साथीनं गेले. त्यामुळं शिवशक्ती-भीमशक्तीचा फॉर्म्युला परत एकदा अंमलात आणण्यासाठी शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला चेहरा असणाऱ्या सुषमा अंधारे महत्त्वाच्या ठरु शकतात.

राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात सरासरी १५ हजार दलित मतदार आहेत, तर राज्यातल्या लोकसभेच्या १५ जागांवर दलित मतदार महत्त्वाचे ठरतात, अशावेळी सुषमा अंधारे शिवसेनेसाठी महत्त्वाच्या ठरु शकतील.

दुसरा मुद्दा म्हणजे मुस्लिम आणि बहुजन वर्गात असलेली अंधारे यांची लोकप्रियता

उद्धव ठाकरेंसमोर दोन मोठी आव्हानं आहेत, ती म्हणजे शिवसेनेची बांधणी करणं आणि बंडखोर आमदारांना पाडणं. त्यामुळं भाजपला सामोरं जाताना अंधारे यांचा प्रभाव सेनेचा पाठिंबा भक्कम करतीलच पण सोबतच उद्धव ठाकरेंची शिवसेना मुस्लिमांची कडवी विरोधक नाही, असं नॅरेशनही शिवसेनेला त्यांच्या माध्यमातून सेट करता येईल.

गुलाबराव पाटील, शहाजीबापू पाटील अशी आक्रमक भाषाशैली असणारे नेते आता शिंदे गटात आहेत. तेव्हा स्टेजवरच्या भाषणातून लोकांना साद घालत या नेत्यांची कमी भरून काढण्यात सुषमा अंधारे यशस्वी ठरू शकतात, त्यामुळं त्यांना मोठी जबाबदारी देणं शिवसेनेला फायद्याचं ठरु शकतं, असं सांगितलं जातंय.

आता आगामी काळात शिवसेनेच्या स्टेजवरून अंधारे कुणाला लक्ष्य करतात, बहुजन समाजात असलेली त्यांची लोकप्रियता शिवसेनेच्या मतपेटीत दिसणार का आणि त्यांच्या हातातलं शिवबंधन सेनेला फायद्याचं ठरणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.