जाधव साहेब सासऱ्यांच जावुदे वो पण वडलांच्या नावाकडे तर एकदा बघा..
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा.
अशी म्हण आपल्याकडे आहे. आत्ता ही म्हण आहे की अन्य काही याच्यात आपण नको जायला पण मुद्दा महत्वाचा आहे हे समजून घ्यायला पाहीजे. तर मुद्दा असा आहे की पुत्र असा असावा की ज्याचा तिन्ही त्रिभूवनात झेंडा असला पाहीजे. म्हणजे काय तर टॉम क्रुझ टाईपमध्ये पोरगं व्हावं..
आपल्याकडे काहीही झालं तर बापाचे दाखले दिले जातात.
माणसांच सगळ आयुष्य बापाने कमवलेली इज्जत सांभाळण्यात जातं. म्हणजे शेतीचा एखादा तुकडा विकायचा म्हणलं तरी आरं काय बापानं कमावलेलं उधळतो का म्हणून लगेच गावातले चारचौघ विचारायला येतात.
पोरानं बापापेक्षा मोठ्ठ नाव कमावणं हे कम्प्लसरी असतय नायतर मग त्या पोराचं आयुष्य फॉल धरलं जातं. इतकं फॉल की थेट आज्जा आणि नातवाची तुलना माणसं करु लागतात. पोराचा जन्म झाल्ता का नाय हे सुद्धा कोण विचारात घेत नाय..
आत्ता हर्षवर्धन जाधवांच नेमक काय चाललय याच्या खोलात आपण शिरायला नको. ते त्यांचे आणि ह्यांचे कार्यकर्ते बघुन घेतील.
आपण बघुया हर्षवर्धन जाधवांच्या वडिलांच्या माहितीकडे. जाधवांचे वडिल कसे होते..
हर्षवर्धन जाधव यांच्या वडिलांच नाव रायभान जाधव. रायभान जाधव हे सनदी अधिकारी होते. ते काही काळ माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यकही होते. मात्र पुढे त्यांच्याच सांगण्यावरूनच शासकीय सेवेतील अधिकार पदाची नोकरी सोडून रायभान जाधव राजकारणात आले.
पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवली. पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला, पण दुसऱ्यांदा ते निवडून आले. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर रायभान जाधव यांनी जनसंपर्क वाढवला.
त्यानंतर २ जून १९८० मध्ये ते काँग्रेस (अर्स) कडून कन्नड विधानसभेला उभे राहिले.
मराठवाडा आणि खानदेशाच्या सीमेवर येणार कन्नड मतदारसंघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या ३ भूप्रदेश भागात मोडला जातो. त्यामुळे जिंकायला अवघड असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक. मात्र तरीही इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध जवळपास ११ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.
विधानसभेत रायभान जाधव हे कन्नडचे आमदार होते, परंतु लोकांच्या समस्या मांडताना ते आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित नव्हते. त्याबाहेर अर्थसंकल्प, शेती, तंत्रज्ञान, बॉम्बे हाय गॅस, मराठवाडा आणि कोकण या प्रदेशात असलेल्या पोटेन्शिअलकडे होणारे दुर्लक्ष, मुंबईचे व्यवस्थापन अशा चौफेर विषयावर ते बोलायचे.
त्यांना प्रशासनाचा अनुभव, नियमांची जाण आणि राज्यातील प्रश्नांचा अभ्यास यामुळे एखाद्या विषयावर ते बोलायला उभे राहिले, तर सभागृह गांभीर्याने त्यांचे ऐकत असे.
शंकरराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून ते सर्वाना परिचित होते, मात्र एकदा जायकवाडी प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची अंदाजित तरतूद असताना सरकारने फक्त ५० कोटीच जाहीर केले, तेव्हा ते सभागृहात सरकारवर तुटून पडले होते.
शंकरराव चव्हाण हे जायकवाडी प्रकल्पाचे जनक होते. त्यांनी आपल्यालाही तेवढीच तळमळ आहे, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून तरतूद करावी लागते, असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याच्या अनुशेष भरून काढला जात नाही, याबाबत देखील त्यांनी आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केले.
१९८५ ते १९९० या पंचवार्षिकमध्ये काही कारणास्तव ते निवडणुकीपासून दूर राहिले. मात्र या दरम्यान ते कन्नड कारखान्याच्या माध्यमातून कार्यरत होते.
५ वर्षाच्या गॅप नंतर १९९० मध्ये ‘महाराष्ट्र इंदिरा काँग्रेस’ हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभा केला. निवडणुकीत पुन्हा उभं राहून राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन सीटिंग आमदार किशोर पाटील यांना पराभूत करत विधानसभेत गेले.
आमदार म्हणून केलेल्या कामाव्यतिरिक्त, अनेक संस्था आणि व्यक्ती यांच्याशी जाधव यांचा संबंध आला.
एखादी संस्था मिळवून त्यातून आपला राजकीय मोठेपणा वाढविण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये माणसाचा विकास करण्याची किती शक्ती असते, त्यातून लोकांच जीवनमान सुधारू शकत असं त्यांचं म्हणणं होत.
शंकरराव चव्हाणांनी संस्थापक असलेल्या ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा देखील मोलाचा वाट होता. ही संस्था त्यांच्याच कल्पनेतून उभी राहिली. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, सहकारी साखर कारखाना, जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मूलभूत स्वरूपाचे काम केले.
अखिल भारतीय सत्यशोधक समाज या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
नुसते नावापुरते अध्यक्षपद न ठेवता त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाची खंडित झालेली अधिवेशने परत सुरू केली आणि बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप कसे बदलायचे याबद्दल देखील सांगितले.
जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे रायभान जाधव यांची एक आठवण सांगताना म्हणतात,
जायकवाडीचे पाणी कसे वरच्या भागात रोखले जात आहे, त्यासाठी राज्याचे नेतृत्व कसे जबाबदार आहे, याचा सखोल अभ्यास रायभान जाधव यांनी केलेला होता. त्या संदर्भात रायभान जाधव यांनी बरीच कागदपत्रेही जमा केलेली होती. ती सर्व माहिती ते मला पुराव्यानिशी देणार होते.
औरंगाबादच्या खडकेश्वर परिसरातल्या त्यांच्या घरी आमच्या प्रदीर्घ भेटीही त्या संदर्भात झालेल्या होत्या पण, मृत्यूने अचानक गाठल्यामुळे ती पुराव्याची कागदपत्रे मला मिळाली नाहीत.
‘महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या काळात पाण्याच्याभोवती फिरेल आणि ते करताना राजकारणी सर्व मर्यादा ओलांडतील, सभ्यता आणि शिष्टाचार विसरतील’,
असे रायभान जाधव नेहमी म्हणत.
मात्र १९९७ मध्ये त्यांचे पदावर असतानाच त्यांचं अकाली निधन झाले. जवळपास साडेबारा वर्षं त्यांनी आमदार म्हणून कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
मोठा मुलगा धैर्यशील जाधव यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत परंपरा पुढे चालू ठेवली, तर धाकटा मुलगा हर्षवर्धन यांनी दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुका जिंकल्या. २००९ आणि २०१४ अशा विधानसभा जिंकून त्यांनी कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतरचा लेटस्ट इतिहास तर तुम्हाला वरचेवर वाचायला मिळतच असतो.
हे ही वाच भिडू
- खरंच बेंगलोरच्या मराठाहळ्ळीचा इतिहास कानडी लोक बदलत आहेत काय ?
- जीवावर बेतणारा हल्ला झाला तरिही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..