खरंच बेंगलोरच्या मराठाहळ्ळीचा इतिहास कानडी लोक बदलत आहेत काय ?

अख्ख्या भारताची संगणक क्षेत्राची राजधानी असा ही काही जण बंगळूरचा उल्लेख करतात. या मेट्रोसिटीच्या डेव्हलपमेंट बरोबर आसपासची खेडेगावं देखील बदलून गेली.

यातीलच एक गाव म्हणजे मराठाहळ्ळी उर्फ मारथहळ्ळी.

अगदी तीस चाळीस वर्षांपूर्वी जरी पाहिलं तर शांत निवांत असलेलं हे खेड आज बघितलं तर सिमेंटचे जंगल, अत्याधुनिक मॉल्स, ट्रॅफिकजॅममध्ये अडकलेली आयटी पब्लिक यासाठी ओळखलं जातं. जवळपास वीस वर्षांपूर्वी तयार झालेला आऊटर रिंग रोड या गावाचा नशीब पालटून गेला.

या मराठाहळ्ळीचा इतिहास मात्र मोठा आहे. अगदी बेंगलोरपेक्षाही जुना. इथं असलेलं सोमेश्वराचं मंदिर अकराव्या शतकात बांधलंय असं म्हणतात. चोल राजांनी कर्नाटकात अनेक सोमेश्वराची मंदिरे बांधली होती यातलंच एक हे मराठाहळ्ळीमधलं आहे.

यानंतरची इतिहासाची खूण म्हणजे इथे सापडलेला शिलालेख.

साधारण सोळाव्या शतकात विजयनगरच साम्राज्य भारतभर पसरलं होतं तेव्हा इथे कृष्णदेवरायाचा भाऊ वीरा नरसिंहराया राज्य करायचा. १५०८ सालचा तो शिलालेख तेलगूमध्ये लिहिलेला आहे. याचाच अर्थ पाचशे वर्षांपूर्वी या भागात कन्नड नाही तर तेलगू भाषा बोलली जात होती.

पुढे विजयनगर साम्राज्याला घरघर लागली आणि त्यांचे अनेक सरदार राजे झाले. असाच एक नायक केम्पेगौडा याने बेंडकळुरूला आपली राजधानी बनवली, हेच गाव म्हणजे आजचे बंगळूर.

केम्पेगौडाने स्थापन केलेले गाव शहर बनलं मराठ्यांच्या काळात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजीराजेंनी तिसऱ्या केम्पेगौडाचा पराभव केला. त्यांच्या या विजयामुळे कर्नाटकातला एक मोठा भाग आदिलशाहीला जोडला गेला. रणदुल्ला खानाने आदिलशहाच्या सांगण्यावरून हा भाग शहाजीराजांना जहागीर म्हणून दिला. यात बंगळूर,कोलार, होसकट, दोड्डबल्लापुरा आणि सिरा ही गावे येत होती.

शहाजी महाराजांनी बंगळूरला आपल्या जहागीरीची राजधानी बनवलं. 

शहाजीराजांनी बंगळूरच आपल्या राजधानीसाठी निवडण्यामागे एक कारण होतं. एक तर हे गाव छोटं असल तरी तिथे एक किल्ला होता. इथल वातावरण आल्हाददायक होतं. शिवाय हे गाव विजापूरपासून लांब अंतरावर होतं. आदिलशाहने तिकडची सगळी जबाबदारी शहाजी महाराजांवर सोपवली.

याचाच परिणाम असा झाला की बंगळूर व आसपासच्या भागावर शहाजी महाराजांच स्वतंत्र राज्य सुरु झाल.

शहाजी महाराजांनी बंगळूरचा खरा विकास घडवला. अनेक बागा उभारल्या. गावाची तटबंदी मजबूत केली. अनेक व्यापाऱ्यांना आणून वसवलं. मंदिरांचा जिर्णोध्दार केला. त्याच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्रातून ब्राम्हण मंडळींना बोलावून घेतलं. जागोजागी विहिरी बांधल्या. बंगळूरला एका राजधानीच स्वरूप आलं.

छ. शिवरायांच देखील इथे काही काळ वास्तव्य होतं. त्यांचं महाराणी सोयराबाईंशी लग्न बंगळुरूमध्येच लावून दिलं अस म्हणतात.

शहाजी महाराजांची राजधानी म्हणून अनेक मराठी कुटुंबे बंगळुरूला स्थलांतरित झाली. या नगरीच्या विकासात त्यांनी देखील हातभार लावला.

पुढे टिपू सुल्तानच राज्य सुरू झालं तेव्हा त्याने या बंगळुरूच्या मराठा कुटुंबाना जवळच्या खेडेगावात वसवलं. आजही या गावात अनेक मराठा कुटुंबे राहत असलेलं आपण पाहू शकतो.

शतकानुशतके तिथे राहत असलेल्या मराठ्यांमुळे या गावाचं नाव मराठ्यांच गाव म्हणजेच मराठाहळ्ळी अस पडलं अस सांगितलं जातं.

स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांची निर्मिती झाली मात्र बेळगाव, कारवार, बिदर या सीमाभागाच्या हक्कावरून दोन्ही राज्यात वाद सुरू झाला. कन्नडिगानी आपली भाषिक अस्मिता तीव्र केलेली आजही आपल्याला पहावयास मिळते.

याचाच फटका मराठाहळ्ळीला देखील बसला. या गावाचे नाव हे मराठाहळ्ळी नसून ते मारथहळ्ळी अस कन्नडभाषिकांचं म्हणणं आहे. या नावामागे देखील तीन स्टोरी सांगितल्या जातात.

सगळ्यात पहिली स्टोरी म्हणजे या गावात मारुतीचं एक जुनं मंदिर आहे. मारुतीचं गाव म्हणून मारुतहळ्ळी अस नाव मिळालं.

दुसरी तर प्रचंड फेमस स्टोरी आहे. सोलापूरच्या वालचंद यांनी चाळीसच्या दशकात हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी स्थापन केली आणि तिचे विमानतळ बंगळुरूच्या बाहेर उभे केले. स्वातंत्र्यानंतर या विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण करून तिचं नाव हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL) अस करण्यात आलं.

हाच HAL चा वालचंद यांनी बांधलेला विमानतळ मराठाहळ्ळीच्या अगदी जवळ आहे. इथेच भारतीय हवाईदलासाठी बनवलेल्या स्वदेशी मारुत विमानाचा तळ होता.

या मारुत विमानावरून गावाचं नाव मारथहळ्ळी पडलं अस कन्नड लोकांचं म्हणणं आहे.

काही जण छातीठोक पणे असही सांगतात की एकदा मारुत विमानाला अपघात झाला आणि ते जिथे कोसळलं ते गाव म्हणजे मारथहळ्ळी. आता असा अपघात खरच घडलाय का याचे पुरावे तरी सापडत नाही.

हे सोडून एक तिसरा अँगल ख्रिश्चन लोकांचा.

साधारण १८८४ साली बंगळूर मध्ये प्लेगची साथ आली होती. तेव्हा दोन फ्रेंच बहिणींनी गावाबाहेर म्हैसूरचा राजा चामराज वडियार याने दिलेल्या जागेवर एक हॉस्पिटल उभारले. या हॉस्पिटलचे नाव सेंट मार्था हॉस्पिटल. हे बंगळूरमधील सर्वात पहिल्या हॉस्पिटलपैकी एक. या हॉस्पिटलवाल्या मार्थावरून गावाचं नाव मारथहळ्ळी पडले असही काहीजणांच म्हणणं आहे.

पण सेंट मार्थाचं हॉस्पिटल बंगळुरू शहरात आहे, तिथून ३० किलोमीटरवर असलेल्या गावाचं नाव या हॉस्पिटलवरून कसे पडले याचे उत्तर मात्र मिळत नाही.

बंगळुरच्या मराठी लोकांचं म्हणणं आहे की भाषिक अस्मितेमुळे कन्नड लोक मुद्दामहून या गावाबद्दल वेगवेगळ्या कथा दंतकथा बनवत आहेत.

नावाची उत्पत्ती काहीही असो, गावाचं नाव मात्र मराठाहळ्ळी असंच आहे. याचा उच्चार सगळे आपआपल्या सोयीनुसार करतात. रिंग रोड झाल्यापासून मात्र हे शेतकऱ्यांच खेडेगाव एक आयटीहब बनले. प्लॉट पडले, सोसायटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मल्टिप्लेक्स उभे राहिले. कॉस्मोपोलिटीन लोकांच्या या गर्दीत या गावाचा खरा इतिहास मात्र कुठे तरी गडप झाला हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. पवन says

    रोचक इतिहास

Leave A Reply

Your email address will not be published.