महाराष्ट्राने नाही पण हरियाणावाल्यांनी सदाशिवराव भाऊंच स्मरण ठेवलंय

पानिपत म्हणजे मराठी इतिहासातली भळभळती जखम. १४ जानेवारी १७६१ रोजी पेशवे आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये आपल्याला सपाटून पराभव स्वीकारावा लागला. मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या युद्धात नामशेष झाल्या. खुद्द नानासाहेब पेशव्यांचा चिरंजीव विश्वासराव बंदुकीची गोळी लागून मारला गेला,

आणि मराठ्यांचा सेनापती सदाशिवराव भाऊ युद्धाच्या कोलाहलात गडप झाले.

सदाशिवराव म्हणजे थोरल्या बाजीरावांचा पुतण्या, चिमाजी अप्पांचा लेक. जात्याच हुशार होता . अस म्हणतात की बाजीरावांची मुलं नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्या पेक्षाही त्यांचं डोक राजकारभारात जास्त तल्लख होतं. आईवडील लवकर गेले त्यामुळे त्याच्या काकूने म्हणजेच बाजीरावाच्या बायकोने त्याचा संभाळ केला.

त्यांनी दौलतीचं शिक्षण साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या निगराणी खाली घेतलं. पुढे सखाराम बापू यांच्या नेतृत्वाखाली लढाईत भाग घेऊ लागले, तिथेही प्राविण्य मिळवल. लोक म्हणू लागले सदाशिवराव भाऊ घराण्याच नाव काढणार.

त्यांना पेशव्यांच कारभारीपण सोपवण्यात आल. तो काळ म्हणजे पेशवाईचा सुवर्णकाळ होता, राघोबादादाच्या नेतृत्वाखाली मराठी घोडे अटकेपार पेशावर पर्यंत धडक मारून आले होते,

शिंदे होळकर ही सरदार घराणी उत्तरेत मराठ्यांचा दबदबा कायम ठेवून होते. दिल्लीच्या बादशाहला देखील कोणते संकट आले, मदत हवी असेल तर मराठ्यांची याद येत असे.

तेव्हा तसेच झाले, अफगाणिस्तानचा क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली आपल प्रचंड पठाणी सैन्य घेऊन भारतावर आक्रमण करून आला. सदाशिवराव भाऊवर विश्वास वाढलेल्या नानासाहेब पेशव्यांनी राघोबादादांच्या ऐवजी भाऊंना मोहिमेवर पाठवलं. सोबत होळकरांच सैन्य होतं.हरयाणाच्या पानिपत क्षेत्रात तुंबळ युद्ध झालं.

सुरवातीला मराठे जिंकत होते मात्र विश्वासरावला गोळी लागल्यावर बेभान झालेले सदाशिवराव भाऊ थेट पठाणी सैन्यात घुसले आणि परत आलेच नाहीत .

सेनापतीच दिसेनासा झाल्यामुळे सैन्याचे धैर्य खचले, पळापळ सुरु झाली, गिल्चानी मराठ्यांना कापून काढले.

अनेक मोठ्या सरदाराना देखील पळून स्वतःचा जीव वाचवावा लागला. सैन्य व बाजारबुणगे धरून ५५ हजार जण मारले गेले, तेवढेच कायमचे जायबंदी झाले. ज्यांनी जीव वाचवून पळ काढला ते कायमचे देशोधडीला लागले.

या सगळ्या धामधुमीत सदाशिवराव भाऊंचं नेमकं काय झालं हे कळलंच नाही. अनेक इतिहासकारांची याबद्दल अनेक मतेमतांतरे आहेत.

पुण्यातदेखील सदाशिवराव भाऊंच्या तोतयाचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं पण तो खोटा निघाला.

पानिपतपासून हरयाणातील रोहटक जिल्ह्यात सांघी नावाचे गाव आहे. तेथील ग्रामस्थ अत्यंत ठामपणे मानतात की, भाऊसाहेब लढाईनंतर जिवंत होते आणि ते या गावात येऊन राहिले होते. या गावात भाऊंच्या नावे अजूनही एक आश्रम आहे. आश्रमाचे नाव डेरा लाधीवाला.

येथेच श्री सिद्धबाबा सदाशिवराय अर्थात भाऊसाहेबांची गादी आहे.

ग्रामस्थांच्या समजुतीनुसार भाऊंनी येथे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली.

१७६४ मध्ये पठाणांच्या हल्ल्यातून गावाला वाचविण्यासाठी तरुणांची एकजूट करून त्यांना युद्धकला शिकविली आणि पठाणांचा पराभव केला.

आजही भाऊंचा मठ २० एकर जागेवर पसरलेला आहे. अनेक लोककल्याणाची कामे तिथे चालतात. येथेच भाऊसाहेबांनी समाधी घेतली.

समाधीच्या दिवशी अजूनही येथे जत्रा भरते. भाऊसाहेबांनी शिकविलेली शक्ती उपासना म्हणून कुस्तीचे फड भरविले जातात. गावातली तरुणाई या भाऊंच्या गादीला आजही मानते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.