अमरसिंह यांचा एक फोन आला आणि डॉ.मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान पद वाचलं..

२१ जून २००८, पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार संजय बारू दुपारचे जेवण करून निवांत वामकुक्षी घेत होते. शनिवार असल्यामुळे कामाची काही विशेष गडबड नव्हती. अचानक  त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला.

समोरची व्यक्ती म्हणाले,

“मिस्टर बारू, एक निरोप आहे. माझे मित्र अमर सिंग कोलोरॅडोमधील एका हॉस्पिटलमध्ये आहेत. तुम्ही कृपया पंतप्रधानांना सांगा की अमेरिकेतील डॉक्टर्स खूप चांगले आहेत. ते अमर सिंग यांची चांगली काळजी घेत आहेत. ते स्वतः तिथे खूप खुश आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, अमेरिकन लोक इतके प्रेमळ आणि चांगले आहेत. आपले त्यांच्याशी चांगले संबंध राहिले पाहिजेत. “

फोन ठेवताना ती व्यक्ती म्हणाली की,

“तुम्ही हा निरोप त्यांना अगदी तातडीने दिलात तर खूप बरं होईल. कदाचित अमरसिंग यांची तब्येत झपाट्याने सुधारावी यासाठी पंतप्रधानाना अमर सिंग यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतील.”

सुरवातीला तर बारू यांना कळेचना कि हा असला कसला निरोप आहे? समाजवादी पक्षाचे नेते असलेल्या अमरसिंग यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्वतःला शुभेच्छा द्यायला का लावायचंय.

काही क्षणात त्यांच्या लक्षात आलं कि हा एक राजकीय निरोप आहे. या मागे गेल्या काही वर्षातला घटनाक्रम आहे.

त्याकाळात भारत सरकार आणि अमेरिकेचे जॉर्ज बुश सरकार यांच्यात एक ऐतिहासिक कराराची बोलणी सुरु होती. त्याच नाव अणुकरार.

दहा वर्षांपूर्वी वाजपेयींनी केलेल्या अणुचाचणी वेळी भारतावर विविध प्रकारची बंधने आणणाऱ्या अमेरिकेच्या पुलाखालून बरंच पाणी होतं. हीच अमेरिका भारताबरोबर अणू तंत्रज्ञान हस्तांतरण व इतर गोष्टींचा करार करण्यास उत्सुक झाली होती. त्यांनी त्यांच्या संसदेत हाईड नावाचा कायदा करून त्याला मान्यता देखील मिळवली होती. आता प्रश्न उरला होता आंतरराष्ट्रीय मान्यतेचा.

मात्र त्याच्याही आधी भारताच्या संसदेत अणुकरार पास होणे गरजेचे होते. पण तिथे या कराराला पाठिंबा मिळणे अत्यंत अवघड होतं.

तेव्हा भारतात डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान होते. हे अल्पमतातील सरकार होतं. मनमोहन सिंग यांच्या युपीएला अनेक छोट्या छोट्या पक्षांचा टेकू होता पण शिवाय डाव्या पक्षांनी दिलेल्या बाहेरून पाठिंब्यावर मनमोहन सिंग सरकारची नौका उभारली होती. या डाव्या पक्षांचा अमेरिकेबरोबरच्या कराराला प्रचंड मोठा विरोध होता. हा करार भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

जेव्हा लोकसभेत हा करार चर्चेला आला तेव्हा डाव्या पक्षांनी याचा निषेध करत मनमोहन सिंग याना दिलेला पाठिंबा काढून घेतला. सरकार अल्पमतात आलं. मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. अंतत्रराष्ट्रीय पातळीवर बोलणी झाली होती, आता करार होणे जाऊ द्या काँग्रेसचे सरकार कोसळते कि काय अशी वेळ आली होती.

डाव्या पक्षांनी म्हणे सोनिया गांधींना अट घातली होती कि एक तर हा अणुकरार मागे घ्या आणि सोबतच डॉ.मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावरून हटवा.

राजकीय वर्तुळात पॉलिटिकल मॅनेजर म्हणून ओळखले जाणारे अमरसिंग तेव्हा सांजवाडी पक्षात होते. राज्यसभा सदस्य असताना त्यांची आणि डॉ.मनमोहन सिंग यांची चांगली ओळख झाली होती. आपल्या नम्र आणि मिठास बोलण्याने त्यांनी पंतप्रधानांना जिंकले होते. दोन टोकाच्या स्वभावाच्या या व्यक्तींची मैत्री मात्र चांगली जुळली होती.

म्हणूनच जेव्हा डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारवर संकट कोसळलं तेव्हा संकटमोचक बनून अमरसिंग पुढे आले.

त्यादिवशी डॉ.मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाने अमरसिंग यांना तब्येतीची खबरबात विचारायला फोन लावला पण राजकीय स्थितीवरच त्यांच्या चर्चा झाल्या. असं सांगितलं जातं की अमरसिंग यांनी डावे पक्ष जर पाठिंबा काढून घेत असतील तर मुलायम सिंग यांच्या समाजवादी पार्टीला पाठिंबा द्यायला लावतो असं आश्वासन काँग्रेस पक्षाला दिल. पंतप्रधानांची आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांची गुप्त ठिकाणी बैठक देखील झाली.

अमरसिंग जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी मुलायम सिंग यांना एक पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि त्यात सांगितलं,

धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये फूट पडणं हे देशाच्या दृष्टीने हानिकारक आहे.

यातून स्पष्ट संदेश मिळत होता, समाजवादी पक्षाचे खासदार डाव्या पक्षांची साथ सोडून अणुकराराच्या बाबतीत काँग्रेस सोबत येण्यास तयार आहेत. इतकं करून अमरसिंग थांबले नाहीत तर त्यांनी मुलायम सिंग यादव यांना घेतलं आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याकडे गेले.

त्यांच्या सांगण्यावरून कलाम यांनी या अणुकराराला समर्थन देणारं निवेदन त्यांच्या हवाली केलं.

मुलायम सिंग यादव आता खुलेआम अणुकराराचे पाठीराखे बनले. त्यांनी अविश्वास ठरावावेळी मनमोहन सिंग यांना पाठिंबा तर दिलाच शिवाय असं म्हणतात की अमर सिंग यांनी भाजपचे तीन खासदार फोडून त्यांना देखील अणुकराराच्या बाजूने मतदान करायला लावलं. यावरून कॅश फॉर व्होट च्या घोटाळ्यात त्यांचं नाव आलं.

समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अमेरिकेसोबतचा अणुकरार यशस्वी पणे पार पडला. मनमोहन सिंग यांचं सरकार वाचलं.

पुढे संजय बारू एकदा सिंगापूर येथे गेले होते. तिथल्या हॉस्पिटलमध्ये अमर सिंग ऍडमिट होते. त्यांच्या भेटीसाठी संजय बारू त्या हॉस्पिटलमध्ये गेले. तर तिथे अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि परिवार अमरसिंग यांना भेटून त्यांच्या स्पेशल रूममधून बाहेर येत होता.

त्यांनी संजय बारू यांना विचारलं,

“मग हा अणुकरार अखेर कुणी साकार केला? तुमचं काय मत आहे ?”

संजय बारू काही बोलणार त्याच्या आधीच अमरसिंग म्हणाले,

“तुम्ही म्हणाल जॉर्ज बुश आणि मनमोहन सिंग. पण मी तुम्हाला सांगू? खरं तर जॉर्ज बुश आणि अमरसिंग.”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.