तुर्कीमध्ये ऑपरेशन दोस्त कसं पार पडलं?
तुर्कीमध्ये भूकंप झाला… पत्त्यांच्या घरासारख्या इमारती कोसळल्या… तसे व्हिडीओज जगभर व्हायरल झाले… मृत्यूमुखी पडलेल्यांचा मोठा आकडा समोर येत होता. त्यावेळी भारताने तुर्कीला मदत करायची ठरवलं आणि सुरू झालं ‘ऑपरेशन दोस्त.’
भारताकडून रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ सह इंडियन आर्मीचे जवान, एअर फोर्स या पथकांमध्ये होते.
या सर्व पथकांचं पंतप्रधान मोदींकडून कौतूक करण्यात आलं. तर, भारत हा देश सदैव लोकांच्या मदतीसाठी तयार असेल असंही पंतप्रधान म्हणाले. हे ऑपरेशन उभं कसं राहिलं? त्यानंतर ते प्रत्यक्षात कसं उतरलं आणि भारताच्या रेस्क्यू टीम्सने बाकी देशांच्या टीम्सपेक्षा वेगळी कामगिरी कशी केली? हे सगळं बघुया.
हे ऑपरेशन करायचं आहे… तुर्कीमध्ये आपली रेस्क्यू टीम पाठवायची आहे हा निर्णय कसा झाला या बद्धल भारताचे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिलीये…
“भूकंपाच्या बातम्या आल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला याबाबत आमचं मत विचारलं आणि काही मिनीटांच्या चर्चेत लगेचच अॅक्शन घ्यायला सांगितलं. यानंतर फक्त ४८ तासांत टीम तयार केली गेली आणि ती टीम तुर्कीला पाठवून ऑपरेशन दोस्त पार पाडण्यात आलं.”
या सगळ्यात अडचण अशी होती की, टीम निवडल्यानंतर त्यापैकी बऱ्याच जणांकडे पासपोर्ट नव्हते आणि लवकरात लवकर या टीम्सचं तुर्कीकडे रवाना होणं गरजेचं होतं. त्यामुळे रातोरात परराष्ट्र मंत्रालयाने आपलं कार्यालय उघडून पासपोर्ट्स तयार करून दिले. तर, दुसरीकडे दिल्लीत असलेल्या तुर्की एम्बॅसीने त्यांना वेळेत व्हिजा मिळेल याचीही काळजी घेतली होती.
सगळ्या टेक्निकल गोष्टी पार पडल्या आणि भारतातून ७ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजताच्या आसपास पहिली टीम तुर्कीच्या दिशेने रवाना झाली.
भारताच्या या ऑपरेशन दोस्त साठी फक्त रेस्क्यूअर्स आणि रेस्क्यू साठी लागणारी उपकरणंच नाही तर, संरक्षण मंत्रालयाकडून गाड्यासुद्धा पाठवण्यात आल्या होत्या अशी माहिती एनडीआऱएफचे डायरेक्टर जनरल अतूल कारवाल यांनी दिली.
गाड्या पाठवण्यामागचं कारण असं होतं की, या कठीण काळात तुर्कीमधल्या प्रशासनावर आणखी ताण द्यायचा नव्हता… त्यामुळे भारताने स्वत:च्या गाड्यासुद्धा पाठवल्या. त्याचा फायदाही झालाच. झालं असं की, भारताची टीम तुर्कीमध्ये पोहोचली तेव्हा काही देशांच्या टीम्स तुर्कीमध्ये पोहोचल्या होत्या, पण कामाला सुरूवात झाली नव्हती. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे वाहनं नव्हती आणि तुर्की प्रशासन त्यांच्यासाठी वाहनं अरेंज करण्याच्या तयारीत होतं.
त्यामुळं भारतातून रेस्क्यू टीम्ससह गाड्यासुद्धा पाठवणं हे ऑपरेशन दोस्तसाठी फार महत्त्वाचं ठरलं.
या ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय सैन्याच्या मेडिकल टीमने ३० बेडचं हॉस्पिटल उभं केलं जे २४ तास सुरू होतं. जवळपास ४,००० लोकांवर उपचार या हॉस्पिटलमध्ये देण्यात आले असं वृत्तही आहे.
तर, एनडीआरएफच्या टीमकडून बेरेन आणि मिराय या दोन लहान मुलींना जिवीत अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. यासाठी जवळपास ८४ तास ऑपरेशन सुरू होतं. तर, जवळपास ८५ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. अशी माहिती एनडीआरएफचे डायरेक्टर जनरल अतूल कारवल यांनी दिलीये.
भारतातून तुर्कीला गेलेल्या टीममध्ये आपल्या १८ महिन्यांच्या जुळ्या मुलांना मागे ठेऊन जाणाऱ्या ३२ वर्षीय सुषमा यादव होत्या. तर, घरी फोन केल्यावर पहिल्या रिंगमध्ये फोन कसा उचलला गेला हे सांगणाऱ्या शिवानी अग्रवालसुद्धा होत्या.
आपली नाती मागं ठेऊन तुर्कीमधल्या भीषण परिस्थितीत तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी गेलेल्या या जवानांना तिकडे आपुलकी जाणवली.
डिप्युटी कमांडंट दीपक तलवार हे या ऑपरेशनमध्ये होते. झालं असं की, या ऑपरेशन दरम्यान त्यांनी अहमद नावाच्या एका व्यक्तीच्या परिवारातल्या लोकांचे मृतदेह हे ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर अहमद हा त्यांचा ऋणी झाला.
अहमदला कुठून तरी समजलं की, दीपक तलवार हे शाकाहारी आहेत. हे समजल्यानंतर त्याने काय केलं? तर, जिथे जिथे दीपक तलवार रेस्क्यू ऑपरेशनसाठी जात होते तिथे तिथे जाऊन हा अहमद त्यांच्यासाठी सफरचंद, टोमॅटो असं जे काही त्याला शक्य होत होतं ते नेऊन देत होता.
हे फक्त एक उदाहरण झालं जे माध्यमांमध्ये आलंय. याशिवाय, अशा अनेक घटना घडल्यात ज्यातून हे लक्षात येतं की, भारतातून गेलेल्या रेस्क्यू टीममध्ये आणि तिथल्या स्थानिकांमध्ये एक आपुलकी आणि बाँड तयार झालाय. असं एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
या ऑपरेशन दोस्तसाठी तुर्कीमध्ये गेलेल्या टीम्स भारतात परत आल्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संस्कृतीचा दाखला दिलाय. ते म्हणाले,
“वसुधैव कुटूंबकम ही आपली संंस्कृती आहे. तुर्की असो किंवा सीरिया आपल्या टीम्सने उत्तम कामगिरी करताना या सर्व संस्कृतीचं दर्शन घडवलंय. आपण संपुर्ण जगाकडे एक परिवार म्हणून पाहतो.”
हे ही वाच भिडू:
- तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाचा अंदाज आधीच आला होता?
- भूकंपानंतर उध्वस्त शहरं पुन्हा कशी उभी राहतात हे सांगतं मोदींचं ‘भुज’ मधलं ‘गुजरात मॉडेल’
- भुकंपानंतर ढिगाऱ्याखाली माणूस जिवंत कसा राहतो?