वाचा आणि थंड बसा.

मराठे लढतात आणि तहात हरतात असा प्रकार हमखास बघायला मिळतो. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढणारे अण्णा हजारे देशाचे नेतृत्व करतील अशी वेळ आली होती. पण त्यांनी कच खाल्ली. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेव बाबा यांनी त्या चळवळीचा पुरेपूर फायदा करून घेतला. अण्णा हजारे यांनी सरकार बदलताच मौन धारण केल्यामुळे यांच्या वाट्याला मात्र बदनामी आली.

शरद पवार यांनी दिल्लीत वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न मराठी नेत्यांच्या पुरेशा पाठींब्याअभावी तोकडे पडले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे  यांनाही साईड लाईन होण्याचा अनुभव आला. जो आज नितीन गडकरी घेताहेत.

लढाईत कमी न पडणारी मराठी माणसं विजय जवळ येताच मागे का पडतात?

देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला एवढी मानहानी का यावी? भाजपकडे विद्वान आणि आक्रमक चेहरे कमी आहेत. त्यातलं सगळ्यात प्रभावी नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. रुपया एवढा पडत असताना, महागाई आणि आर्थिक संकट वाढत असताना अर्थशास्त्राचा अभ्यास असणारा नेता गरजेचा होणार हे स्पष्ट आहे. आणि या शोधात देवेंद्र फडणवीस हे प्रभावी नाव आहे. ही भीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहेच.

त्यामुळे शिवसेनेने एवढे आव्हान देऊनही भाजपने अडीच वर्ष कळ काढली. त्यानंतरही जो सत्ताबदल केला त्यात देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापले जातील याची सोय केली. मराठी माणसाच्या बाबतीत हे सातत्याने होत आलं.

महादजी शिंदेना दिल्लीचा कारभार करायची संधी आली. पण त्यांचीही स्थानिक राजकारणात कोंडी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहून देशातले प्रभावी नेते झाले. लोकसभेत सगळ्या खासदारांच्या प्रश्नांना आणि शंकांना अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरं देत गाजू लागले. पण शेवटी त्यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आणली गेली.

तीच गोष्ट अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामणराव देशमुख यांची. त्यांनी बाणेदारपणे राजीनामा दिला. पण तशी वेळ आली नसती आणि ते दिल्लीत राहिले असते तर?

यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतही आपण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं अभिमानाने म्हणतो. पण यशवंतराव चव्हाण यांच्यावर दिल्लीतल्या राजकारण्यांनी केवढे वाईट आरोप केले. आणि शेवटी शेवटी तर ते एकाकी पडतील अशी वेळ आणली. कॉंग्रेसच्या काळात मनात येईल त्याला मुख्यमंत्री केलं गेलं. ज्येष्ठ नेत्यांचा अपमान झाला. पण कोण चवताळून उठलं? नितीन गडकरी यांचे पंख छाटले गेले. कुणी निषेध तरी केला का? 

या सगळ्या गोष्टी अर्थातच मराठी नेत्यांची सोबत असल्याने झाल्या. मराठी नेते आपल्या माणसाचे पाय ओढायला जोमाने पुढे आले. एकाच विमानाने दिल्लीला जाणारे नेते एकमेकांच्या कागाळ्या करायला जायचे. आजही जातात. राजकारणात हे सगळं चालू असतं.

पण नेतृत्व मिळवायची एखादीच वेळ असते. निदान त्यावेळी तरी अवसानघातकी वागू नये.

महाराष्ट्रात यापूर्वीही खुपदा बंडखोरी झाली. पण यावेळी झालं तेवढं हसं झालं नाही. यावेळी कोण जिंकलं हे कुणाला सांगता येणार नाही. पण मराठी माणसाचा पराभव झाला हे मात्र नक्की. 

एकतर महाराष्ट्रातले आमदार खासदार इडीला प्रचंड घाबरतात हे दिल्लीच्या लक्षात आलं. इडीला घाबरणारी माणसं किती नैतिक आणि स्वच्छ असतील हे सहज लक्षात येतं. दुसरी गोष्ट हिंदुत्व आणी मराठी माणसाचा विचार या गोष्टी महाराष्ट्रात तोंडी लावण्यापुरत्या आहेत हे सुद्धा अधोरेखित झालं. 

उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे किंवा संजय शिरसाठ यांच्यावर शिवसेनेत अन्याय झाला असं म्हणण्यासारखा दुसरा विनोद नाही. त्यांच्यामुळे कितीतरी वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कितीतरी शिवसैनिकांवर अन्याय झाला हे मात्र सत्य आहे. 

या बंडामुळे शरद पवार जादुगार नाहीत हे सिध्द झालं ते बरं झालं. नाहीतर महाराष्ट्रात जे काही होतं ते शरद पवारच घडवून आणतात अशी एक अंधश्रद्धा फोफावतच चालली होती. उदयनराजेंचा पराभव ते भाजपात गेल्याने झाला. शरद पवार पावसात भिजल्याने नाही. 

खूप लोकांना असं वाटतं की शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेली हे चूक झालं…

पण पश्चिम बंगालच्या ममताताई काँग्रेससोबत गेल्या असत्या तर आज कुठे असत्या? आणि उत्तर प्रदेशच्या मायावती बीजेपीसोबत गेल्यावर आज कुठे आहेत? प्रादेशिक पक्षांना आपलं अस्तिव दाखवत रहावं लागतं. प्रमोद महाजन आणि गडकरींना दरवेळी शिवसेनेशी युती करताना बाळासाहेब ठाकरेंची किती मनधरणी करावी लागायची हे विसरता कामा नये. 

एकनाथ शिंदे यांचं सरकार आलंय. पण त्यांनाही मनातून आनंद झालेला नसणार. शिवसेना फुटणे ही कुठल्याही शिवसैनिकाला आनंद होण्यासारखी गोष्ट नाही. 

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणं ही त्यांची नाही, मराठी माणसासाठी नामुष्की आहे. हे राज्यातलं पहिलं सरकार आहे जे आल्याचा कुठल्याही पक्षाला किंवा कार्यकर्त्याला आनंद झालेला नाही. 

हे सरकार आल्याने कुणाचाही विजय झालेला नाही. एक मात्र नक्की की, हा मराठी माणसाचा पराभव आहे. मराठी माणूस एकेकाळी शिवाजी महाराजांच्या शिवसेनेकडे आशेने बघायचा. आज ती शिवसेना मुंबई आणि ठाण्यात विभागलीय. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असे दोन गट झालेत. 

आता फक्त आपण या फुटीची झलक पाहिलीय. महानगरपालिकेच्या निवडणुकीत किळसवाणी फाटाफूट पहायला मिळेल. मराठी माणसं एकमेकांचे किती धिंडवडे काढतात हे दिल्ली आनंदाने बघणार आहे. 

एक सांगू शकतो की शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आनंदी नसणार. पण किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह नक्कीच मजेत असतील. लढवय्या म्हणून ओळखला जाणारा मराठी माणूस आता फक्त एकमेकात भांडणारा म्हणून ओळखला जाईल. 

उत्तर प्रदेशात अयोध्येचं मंदीर होतं. ते राजकारणात उपयोगी पडलं. महाराष्ट्रात मंदिराचा वापर करता आला नाही. महाराष्ट्राचं मोठं श्रद्धास्थान उपयोगी आलं. छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या नावाने सुरु असलेली शिवसेना उध्वस्त झाली. 

शिवसेना सुरु झाली तेव्हा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जात होती. परप्रांतीय कसे आपल्या नोकऱ्या आणि मोक्याच्या जागा बळकवतात याची यादी दिली जायची आणि त्याचं शीर्षक असायचं, वाचा आणि थंड बसा. 

आजही ते शीर्षकच समर्पक आहे. वाचा आणि थंड बसा.

 

हे ही वाच भिडू:

 

5 Comments
  1. AM says

    Baised reporting ahe bhidu tumchi…… Jar shivsena futicha dukha Eknath Shinden pasun Devendra F. paryant zal asel tar he rajkaran kelach kashala….. Vyaktigat swaarth ahe pratekacha yaat. Tyamule ya rajkarnyanchya karanila marathi mansachi pravruti bolu naka. Ani je delhi madhe Marathi netyanbarobar zala tas bakichya pradeshatil lokan barobar pan zal ahe. Jo nisthur ahe to rajakarani mhanun udyala yenar he satya ahe ani tasach ghadnar.

  2. Javed Shikalgar says

    Superbb bol bhidu. Asech Marathi mansanvar honare anyay adhorekhit krt ja. Marathi manus zopet ahe.tyana jage kra. Te aplyach lokanche pay odhanyat vyast astat.tyana jage kra. Dhanyavad

  3. Kedar Kulkarni says

    Jatinmadhe adakal ki hech hot…
    Maharashtra jatiywadatun baaher aala pahije

  4. Sagar Popat Thanage says

    Tumacha vacha Ani gapp basa lekh,,, shivsena sponsor ahe ase janvate

  5. Akshay Patil says

    Are Bhidu, Ashaveli samanya Marathi mansane Kay karayala have, Yavar ekhada Lekha lihina.

Leave A Reply

Your email address will not be published.