कितीही कट्टर राजकीय विरोधक असोत मामलेदार मिसळीवर प्रत्येकाचं एकमत होतं

मिसळ ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे तिसरं महायुद्ध होईल असं म्हणतात. मिसळ बनवण्याच्या नाना प्रकार आणि त्या त्या ठिकाणाचा खास लहेजा घेऊन मिसळ सगळीकडे तयार होते. कोल्हापूरचे लोक त्यांची मिसळ भारी म्हणतात, तर नाशिकचे त्यांची मिसळ भारी म्हणतात. काही काही जण पुण्याच्या मिसळीला देखील भारी म्हणतात.(असो) मिसळीचे वाद चालत राहतात, सोशल मीडियावर याच रणांगण चालू असतं.

पण एक मिसळ अशी आहे ठाकरे असो किंवा राणे कितीही मोठे राजकीय विरोधक तिच्या चवीवर एकमत करतात, तिला मिसळ सम्राट ही उपाधी देतात.

ठाण्याची मामलेदार मिसळ.

लालभडक तर्रीदार मामलेदार मिसळ एकदा खाल्ली की कोणीही असो तिचा फॅन होऊन जातो. विशेष म्हणजे या मिसळीला सत्तर वर्षांचा इतिहास आहे.

गोष्ट आहे स्वातंत्र्याच्याही आधीची. दूर कर्नाटकातल्या मुरुडेश्वर येथून एक गरीब कुटुंब कामाच्या शोधात ठाण्याला आलं. नरसिंह मुरुडेश्वर कुटुंबप्रमुख होते. ठाण्याच्या मामलेदार कचेरीच्या बाहेर त्यांनी एक छोटीशी जागा भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरु केलं.

त्यांची मिसळ काही दिवसातच लोकांना आवडली. मामलेदार कचेरीच्या बाहेर मिळणारी मिसळ म्हणून या कँटीनला लोक मामलेदार मिसळ म्हणून ओळखू लागले.

हे कँटीन सुरु झालं तेव्हा नरसिंह मुरुडेश्वर यांचा मुलगा म्हणजेच लक्ष्मण फक्त चार वर्षांचा होता. चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर नरसिंह मुरुडेश्वर यांनी जम बसवलाच होता इतक्यात अचानक त्यांचे अकाली निधन झाले. संसार उघड्यावर येण्याची वेळ आली.

पण नरसिंह मुरुडेश्वर यांच्या पत्नीने माघार घेतली नाही. आपल्या सात आठ वर्षाच्या लेकाला हाताशी घेऊन त्या माऊलीने परिथितीशी झुंजायला सुरवात केली. कँटीन सुरु ठेवलं. अशा रीतीने लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आयुष्य मिसळीशी जोडलं गेलं. कँटीन मध्ये काम करणाऱ्या इतर मुलांसोबत ते देखील भल्या पहाटे टेबल पुसण्यापासून इतर सर्व कामाला लागू लागले.

त्यांची आई मिरच्या कांडून त्यापासून मसाला तयार करत असे आणि कोळशाच्या शेगडीवर मिसळीची तर्री बनवली जाई. त्यांच्या हाताला असलेली खास चव मिसळीची कीर्ती सर्वदूर घेऊन गेली.

लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी आपल्या आईवडिलांनी सुरु केलेला चवीचा खास वारसा जपला. याच चवीच्या जोरावर त्यांनी मिसळ चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. आज जिथे काऊंटर टेबल आहे तेवढ्या १० बाय २० च्या छोटय़ा जागेत हे उपहारगृह सुरु झालं होतं. लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी मेहनतीने त्याला मोठं बनवलं.

उत्तरोत्तर प्रगती होत गेली. सुरवातीच्या काळी ठाणे आज आपण पाहतो तेवढं मोठं शहर नव्हतं. साठच्या दशकात एमआयडीसी आली आणि या गावाची वाढ सुरु झाली. बाहेरून येणाऱ्या लोकांची ठाण्यात ये जा सुरु झाली. त्यांनी या मामलेदार कँटीनच्या मिसळीचं कौतुक देखील ठाण्याच्या बाहेर पोहचवलं.

मामलेदारच्या बाहेर गर्दी कायमच दिसू लागली. अनेक जण पार्सल घेऊन जाणारे पण असायचे. प्रवासात जाताना अगदी परदेशवारीत ही मामलेदार मिसळ सोबत नेणारे कित्येक जण आहेत. 

लक्ष्मणमामा या नावाने ठाणेकरांचे लाडके बनलेल्या मुरुडेश्वर यांच्या मिसळीची कीर्ती राजकारण्यांमध्येही पसरली. यात राज ठाकरे, वसंत डावखरे, नारायण राणे यांचा समावेश होता. ठाण्याला सभेला आल्यावर राज ठाकरे यांच्यासाठी मामलेदार मिसळीचे पार्सल हमखास जाते. नारायण राणे तर अनेकदा पाचशे सहाशे मिसळीची ऑर्डर देऊन विधिमंडळात सगळ्या आमदार, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पार्सल नेत.

कितीही मोठे राजकीय विरोधक असोत त्यांचे मामलेदार मिसळीवर मात्र सहज एकमत व्हायचे. 

जेव्हा लक्ष्मण मुरुडेश्वर यांच्या उपहारगृहाची लीज संपली तेव्हा महसूलमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला होता. मिसळीच्या चवीवर अशी आत्मीयता त्यांच्या निर्माण झाली होती.

पुढे मुरुडेश्वर कुटुंबातील तिसरी पिढी या व्यवसायात आली, त्यांनी उपहारगृहाला झळाळी आणली, मामलेदारच्या फ्रॅन्चायजी देण्यास सुरवात केली, आधुनिकतेचा स्पर्श झाला, मामलेदार हा ब्रँड बनला मात्र मिसळीच्या चवीत कोणताही बदल होऊ दिला नाही.

म्हणूनच गेली सत्तर वर्षे मामलेदार मिसळ आपला दर्जा राखून आहे.    

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.