आई पोरासाठी काय करु शकते हे कल्याण भेळचा ब्रॅण्ड पाहून कळतं… 

आईने सुरवात केलेला आणि पोराने मोठ्ठा केलेला ब्रॅण्ड म्हणजेच कल्याण भेळ...

जेव्हा जेव्हा पुण्यात कल्याण भेळचं दुकान पहायचो तेव्हा तेव्हा वाटायचं की ही भेळ कल्याण मध्ये प्रसिद्ध असणारं. कल्याण मधून पुण्यात येवून माणसाने जम बसवला असणारं. भारी यासाठी वाटायचं की एका गावात येवून दूसऱ्या गावाच्या नावाने धंदा करणं हा खरच रिस्की शॉट असणार. कोणतरी बिगशॉट माणूस असणार म्हणूनच इतकी रिस्क घेतली असले. 

पण जेव्हा कल्याण भेळची स्टोरी समजली तेव्हा खरं सांगतो डोक्याच्या फ्यूजा उडल्या. कारण कल्याण भेळ आणि कल्याण शहर यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नव्हता. 

कल्याण भेळ पक्की पुणेकर निघाली…!

जेव्हा कल्याण भेळबद्दल माहिती घेतली तेव्हाचं ठरवलं यावर आपण लेख लिहायचा. ब्रॅण्ड किती भारी आहे, किती शुन्यातून उभारला आहे वगैरे म्हणून नाही तर आईसाठी… 

सुरवात करुया KGF च्या पिक्चरपासून. या पिक्चरमध्ये एक डॉयलॉग आहे, 

इस दुनिया मैं सबसे बडा योद्धा मॉं होती हैं…! 

इथूनच या स्टोरीला सुरवात होते. मुक्ताबाई कोंढरे आणि श्रीहरी कोंढरे हे नवरा बायको. पोटाची खळगी भरायसाठी हे दोघेही मुळशी तालुक्यातल्या कोंढुर गावातून पुण्यात आले. श्रीहरी सुरवातीला मालधक्यावर काम करु लागले.

पुढे हेच हमालकाम मार्केट यार्डातील गुळ बाजारात सुरू झाले. या दांपत्याला चार मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव रमेश. त्याच्या मागे एक बहिण आणि दोन भाऊ. पुण्यातल्या २६ नंबरच्या शाळेत जेमतेम चौथी पास झाला आणि कामाला लागला. तो गुढाच्या ठेपा पोत्यात भरून त्याला टाके मारण्याचे काम करु लागला. 

या सगळ्या पोटाची खळगी भरण्याच्या उद्योगात मुक्ताबाई देखील मागे नव्हत्या.

त्यांनी घरोघरी जावून धुणीभांडी करण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर दारोदारी जावून त्या भाजीपाला विकू लागल्या. काहीही करुन चार पैसे मिळवायचे आणि संसार शिवायचा हे काम मुक्ताबाई करायच्या. 

रमेशला गुळाची ढेप शिवण्याचे सहा पैसे मिळायचे. श्रीहरी यांना दिवसभर हमाली करुन जेमतेमचं पैसे मिळायचे. तेव्हा मुक्ताबाई दिवसभर भाजी विकत होत्या. शेवटी शेवटी दिवसभर उन्हातान्हात फिरून चार पैसेच हातात पडत असतं. 

तेव्हा काहीतरी बैठ काम सुर करावं म्हणून व्यवसाय करण्याचं निश्चित केलं. त्यासाठी एका ठिकाणी बसूनच टोपलीतून सुकी भेळ विकण्यास सुरवात केली. टिंबर मार्केटच्या रस्त्यावर असणाऱ्या कल्याण सोसायटीच्या बाहेर बसून हा व्यवसाय सुरू करण्यात आला.

हिरवी मिरची, पुदिना, शेंगदाणे टाकलेली सुकी भेळ फेमस होवू लागली आणि बघता बघता दिवसाचा धंदा हा पाच पन्नास रुपायांच्या घरात पोहचू लागला. आजवर पैशाच्या भावात व्यवहार करणाऱ्या घरात रुपयांच गणित पडू लागलं. लोक वाढू लागले आणि आईने मदतीला म्हणून रमेशला बोलावून घेतलं. 

आई आणि रमेश दोघे मिळून भेळचा व्यवसाय करु लागले. 

कल्याण सोसायटीच्या बाहेर असणारी टोपलीतून विकली जाणारी भेळ म्हणजे कल्याण भेळ. माणसं आजकाल जेवढा मोठ्ठा बॅनर लावतात त्याहून कमी जागेत हा व्यवसाय होता. साहजिक आपल्या व्यवसायाला एखादं नाव ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच लोकांनीच कल्याण भेळ अस नामकरण केलं. 

हळुहळु भेळ सोबत, रगडा, पाणीपुरी अशा पदार्थांची मागणी होवू लागली आणि रमेशने छोटी हातगाडी बनवून घेतली. कल्याण भेळचा बोर्ड लागणारी पहिली जागा म्हणजे ही हातगाडीचं. हातगाडीवरून पुढे हा व्यवसाय टेम्पोमध्ये आला. 

जपलेली चव पाहून ग्राहक वाढू लागले. बिबवेवाडी-कोंढवा या भागातल्या लोकांना तर हक्काचा गाडा म्हणजे कल्याण भेळ झाला. व्यवसाय वाढत गेला तेव्हा बिबवेवाडी कल्याण रोडवरच कल्याण भेळचं पहिलं आऊलेट उभारलं. 

ग्राहकांची तिथेही गर्दी होवू लागली. त्यानंतर जिथे टोपली घेवून भेळ विकायचे त्याच समोर कल्याण भेळची दुसरी शाखा निघाली. रमेश कोंढरे यांनी आईने संसारासाठी सुरू केलेल्या व्यवसायाचा ब्रॅण्ड उभारला. 

हळुहळु हा ब्रॅण्ड इन्स्टंट पॅकमध्ये देखील आला. आज पुण्यात सात ते आठ आऊटलेट कल्याण भेळने उभारले. आमची कुठेही शाखा नाही हा वेडेपणा रमेश यांनी जपला नाही, त्यांना कष्टाने उद्योग उभारला पण यामागे त्यांची आई होती हे ते कधीही विसरले नाहीत हेच देखील तितकच खरं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.