राणेंच्या पाठीमागं सावलीसारखे दिसणारे जठार, कधीकाळी त्यांच्या विरोधात लढले होते…

सध्या राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष तसा जुनाच. त्यातच विधानभवनाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना हिणवलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं.

कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात नितेश राणेंचं नाव आलं आणि शिवसेनेनं त्यांच्या अटकेची मागणी लाऊन धरली. यावरुन शिवसेना कार्यकर्ते आणि नितेश राणे समर्थक यांच्यात पोस्टरबाजीही झाली. 

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात भाजपनं घसघशीत यश मिळवलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

या सगळ्या दिवसांमध्ये राणे पिता-पुत्रांसोबतच आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे माजी आमदार प्रमोद जठार.

राणेंवर होणाऱ्या टीकांचा खरपूस समाचार घेणारे, शिवसेना नेत्यांवर टीका करण्यात आघाडीवर असणारे, सिंधूदुर्ग भाजपचे माजी अध्यक्ष प्रमोद जठार नेमके आहेत तरी कोण?

जठार हे भाजपचे रत्नागिरी-सिंधूदुर्ग भागातले महत्त्वाचे नेते आहेत. कोकणात पक्षवाढीसाठी त्यांचं मोठं योगदान असल्याचं बोललं जातं. २००९ मध्ये कणकवली मतदार संघातून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या जठार यांनी ५७,६५१ मतं मिळवली.  तर  दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या रविंद्र पाठक यांना ५७,६१७ मतं मिळाली. अवघ्या ३४ मतांच्या फरकानं जठार यांनी विजय नोंदवला.

राणे विरुद्ध जठार

पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच २०१४ मध्ये, त्यांचा सामना झाला काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेल्या नितेश राणे यांच्याशी. राणे यांनी ७४,७१५ मतं मिळवली, तर ४८,७३६ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुढे मात्र राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि नारायण राणे आणि नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच नितेश राणे कणकवली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झालं. जठार बंड करणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

मात्र जठार यांनीच भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अनेक कठीण प्रसंगात राणेंना साथ दिली. त्यांच्याबद्दलचे दोन किस्से चांगलेच चर्चेत आले, ते म्हणजे त्यांनी दिलेला राजीनामा आणि नारायण राणेंची छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केलेली तुलना.

राजीनामानाट्य

जठार सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष असतानाच, नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ‘राजकीय वादांमुळं नाणार प्रकल्प रद्द झाला आणि कोकणवासियांच्या कित्येक पिढ्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत पुरेशी माहिती घेतली नाही. कित्येकांच्या रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिला आहे, यामुळे आपण राजीनामा देणार आहोत.’ अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र फडणवीस यांनी तो राजीनामा फाडला आणि राजन तेली यांच्या खिशात टाकला. पुढे जाऊन तेली जिल्हाध्यक्ष बनले.

राणेंची तुलना

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्यांना अटकही झाली. यावेळी बोलताना जठार म्हणाले होते, ‘याच संगमेश्वरमधून छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली आणि औरंगजेबाचं सरकार संपलं होतं. त्यामुळे या सरकारचं थडगं महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजप राहणार नाही.’ त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर भरपूर टीका झाली आणि गुन्हेही दाखल झाले.

आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारल्यानंतरही, जठार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. या टीकेला शिवसैनिक कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल. सोबतच नितेश राणे यांच्यावर अटकेची तलवार अजूनही टांगती असल्यानं, नारायण राणेंचं टेन्शन संपलेलं नाही. या प्रसंगातही कधीकाळी नितेश यांच्याकडून पराभूत झालेले जठार, राणेंसोबत खंबीरपणे उभे आहेत, हे विशेष.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.