युवराज सिंगकडून ६ बॉल ६ सिक्स खाल्यानंतरही स्टुअर्ट ब्रॉड १७ वर्ष खेळला

स्टुअर्ट ब्रॉडचे नाव ऐकलं की भारतातील क्रिकेट प्रेमींना युवराज सिंगची आठवण येते. २००७ ला झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला केलेली फटकेबाजी कोणीच विसरू शकत नाही. ब्रॉडच्या ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारून युवराजने त्याचं स्वागत केलं होतं. त्यावेळी ब्रॉडनं नेमकंच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मॅचमध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराज यांच्यात जोरदार शाब्दीक वॉर झाले, त्यानंतर ब्रॉड युवराज सिंगसमोर बॉलिंगसाठी आला आणि त्याने आपला सगळा राग त्याच्यावर काढला. खरं म्हणजे ती मॅच आजही ऐतिहासिक मॅच म्हणून सगळ्यांनां माहीत आहे. ब्रॉडच्या आणि युवराजच्या क्रिकेट करिअरला खरी कलाटणी इथुनच तर मिळाली.

 इंग्लंडचा अनुभवी  गोलंदाज समजला जाणारा स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ओव्हल कसोटी मॅच त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच असणार आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये त्याने अनेक विक्रम केले आहेत. त्याने निवृत्तीची घोषणा करताना २००७ च्या मॅचचा प्रसंग सांगत त्या मॅचने माझ्या करिअरला खरी कलाटणी मिळाली असं तो म्हणालाय. 

पण ब्रॉडचं करिअर कसं होतं, हे पाहणंही इन्टरेस्टिंग आहे.

स्टुअर्ट ब्रॉडचं क्रिकेटमध्ये पदार्पण झालं २००६ मध्ये

स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या वडिलांप्रमाणेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र त्यानं फास्ट बॉलर बनायचा निर्णय घेतला. २००५ मध्ये तो इंग्लंडच्या अंडर-१९ टीमचा हिस्सा होत. अंडर-१९ मध्ये त्याची प्रभावी कामगिरी बघितल्यानंतर त्याची निवड २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये झाली. ब्रॉडवर दाखवलेला विश्वास सिद्ध करत त्यानं चांगली कामगिरी केली.

२००७ मध्ये भारताविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये त्याला टर्निंग पाँईंट मिळाला. जेव्हा त्यानं बोपारासोबत आठव्या विकेटसाठी 99 धावांची मोठी पार्टनरशिप करत इंग्लंडला दोन विकेटने विजय मिळवून दिला. यापूर्वी, त्याने भारतासोबतच्या मॅचमध्ये ५१ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या होत्या आणि यामुळे त्याला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच अवॉर्डही मिळालं होतं.

पण ब्रॉडचं नाव गाजलं, ते २००७ च्या वर्ल्डकपमुळे.

२००७ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. युवराजच्या त्या इनिंगची चर्चा जगभर झाली आणि सोबतच ब्रॉडचं करिअर संपल्याचीही.

पण ब्रॉडनं स्वतःवर विश्वास ठेवला आणि कमबॅक केलं, त्याचं कमबॅक गाजलं ते टेस्ट क्रिकेटमध्ये. 

स्टुअर्ट ब्रॉडने २००७ ला श्रीलंकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅच खेळण्याच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकर २००, जेम्स अँडरसन १८३*, रिकी पाँटिंग १८२, स्टीव्ह वॉ १६८ यांच्यानंतर सहाव्या नंबरवर आहे. ब्रॉडने आपल्या बॉलिंगची जादु दाखवत आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये १६७ मॅचमध्ये ६०२ विकेट्स घेतल्या आहेत.

तो कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेणारा जेम्स अँडरसननंतर इंग्लंडचा दुसरा फास्ट बॉलर आहे. तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पाचवा बॉलर आहे. स्टुअर्ट ब्रॉड हा असा बॉलर आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये किमान १० वेळा ६ बॅटरला आऊट केलंय. तर १२१ वनडे मॅचमध्ये १७८ विकेट्स आणि ५६ टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत.

बॅटींगबद्दल बोलायचं झाल्यास, स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये १८च्या स्ट्राईक रेटने ३६५६ रन्स केल्या आहेत.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून त्याने १ शतक आणि १३ अर्धशतकंही मारली आहेत. टेस्ट क्रिकेट बरोबर त्याने वनडेमध्ये ५२९ धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११८ धावा केल्या आहेत.

२००७ च्या टी२० मॅच नंतर युवराज आणि ब्रॉडचं नातं बनलं होत. ज्या ठिकाणी युवराजच्या बॅटींगचा उल्लेख यायचा त्या ठीकाणी ब्रॉडचं नाव यायचं. जेव्हा त्यानं निवृत्तीची घोषणा केली तेव्हा युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या सोबतचा खास फोटो पोस्ट करत ट्विट केलं.

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच असा मार खावा लागल्यानंतर मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होण्याची शक्यता असते. पण ब्रॉड खचला नाही. त्याने आपलं स्किल दाखवत, आपल्या बॉलिंगमधल्या चुका दूर करत एक चांगला क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सहा बॉलमध्ये सहा सिक्स ही गोष्ट डोक्यात ठेवत, चांगली कामगीरी करत त्यानं स्वत:ला सिध्द करत आज अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.