पाच मार्कांनी बोर्डावरचं नाव हुकलं होतं, तिथे आज पदसिद्ध चेअरमन म्हणून नाव झळकतय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परिक्षा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. परिक्षांच्या ऐवजी अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थांना मार्क्स देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कालच बारावीच्या परिक्षा देखील रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

भविष्याचा विचार करुन अनेक मुलं टेन्शनमध्ये आली. परिक्षेचा अभ्यास करणं, चांगले मार्क्स मिळवणं ही भविष्याची शिदोरी असते. आपल्या स्वप्नांवर कोरोनामुळे पाणी फिरणार म्हणून अनेक मुलं नैराश्यच्या गर्तेत देखील ढकलली जावू शकतात.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड लिहतात, 

राज्या पाच मार्कांनी बोर्डावरचं नाव हुकलं तुझं. २००३ साली अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील नवोदय विद्यालय दहावी चा निकाल लागला, त्यावेळी माझ्या मित्राला एक रुपयाचा कॉईन बॉक्स मधून फोन केला आणि त्याने निकाल सांगितला की,
“राजा तुझं पाच मार्काने बोर्ड वरचे नाव हुकलं तिसरा आलास”
खरं तर तिसरा क्रमांक आल्याचा आनंद होताच परंतु आता बोर्डावर नाव राहणार नाही याचं थोडसं दुःख ही वाटत होतं. पहिला आलेला विद्यार्थी पेक्षा फक्त ५ मार्क कमी मिळाले आणि माझा तिसरा क्रमांक आला.
जरी वर्गात गणित आणि विज्ञान मध्ये १०० पैकी ९५ गुण दोन्ही विषयात मिळाले परंतु इतर तीन विषयात अक्षर खराब असल्यामुळे आणि इंग्रजी व्यवस्थित येत नसल्यामुळे माझं टॉपर्स बोर्ड वरती नाव आता येणार नव्हतं. ६ वी ला प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याच हे नकळत स्वप्न होतं की आपलं नाव या शाळेच्या Toppers बोर्ड वरती कोरल जावं, खरंतर बालमनात छोट्या छोटया काही गोष्टी कायम घर करुन जातात त्यातलीच ही बोर्डावरची गोष्ट होती.
खरतर जेव्हाही प्राचार्यांच्या ऑफिस बाहेरून जायचो नकळत बाहेर लिहिलेल्या दरवर्षीच्या टॉपर्स बोर्ड वर नजर जायची. आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये रात्री नाईट स्टडी करत असताना जेव्हाही अभ्यासापासून ब्रेक घ्यायचा असेल तेव्हा सर्व मित्र त्या बोर्डाजवळ जाऊन बऱ्याच वेळ कोणाचा नंबर लागेल यावर चर्चा रंगायची.
पण मला ही स्वप्नातही कल्पना नव्हती की आपलं नाव हे प्राचार्याच्या केबिन मधील बोर्डावर एक दिवस लिहिलं जाईल कारण प्राचार्यांच्या ऑफिसच्या मध्ये सुद्धा एक महत्त्वाचा बोर्ड असतो तो म्हणजे शाळेमधील चेअरमनचा आणि नवोदय विद्यालयाचा पदसिद्ध चेअरमन हा त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतो. …
बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर (आंबा-परतूर) जालना येथे नवोदय विद्यालयात माझं ते बोर्डावर नाव लिहिल्या जाण्याचे स्वप्न पूर्ण झालं आणि निकाल लागल्यानंतर जेव्हा आम्ही शाळेत मार्कशीट घ्यायला गेलो तेव्हा बराच वेळ मी त्या बोर्डाकडे पाहत होतो, अक्कलकुवा नवोदय मधील ते स्वप्न पूर्ण झाल्याचं मनस्वी आनंद वाटत होतं.
परंतु ज्या शाळेत शिकलो त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करायला मिळेल व त्याच नवोदय मधील शिक्षकांसोबत चेअरमन म्हणून काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हत.
आज हे सर्व लिहिण्याचा खरतर मानस हा होता यावर्षी बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे मुले प्रचंड निराश आणि पुढे काय करावे या द्विधा मनस्थितीत आहे, खरंतर जेव्हा जीवन जगण्याचा व आयुष्याचा प्रश्न येतो तर इतर सर्व गोष्टी ह्या दुय्यम होऊन जातात.
विद्यार्थीदशेत दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा हे आयुष्यातील एक खूप मोठं टर्निंग पॉईंट असत आणि त्या परीक्षेतील उत्कंठता, निकालाचा दिवस, परीक्षेमधील अनुभव याची शिदोरीही कायमस्वरूपी राहते, कधी आपल्याला अपयश मिळतं तर कधी इच्छेप्रमाणे होत नाही, परंतु मित्रांनो आयुष्याचा विस्तार हा खूप मोठा आहे जर आपण एखादी गोष्ट Sinceraly करत राहिलो तर कधी कधी आयुष्यात अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगल्या गोष्टी हे नकळत आपल्याला मिळत असतात.
म्हणून या कठीण काळात सुद्धा आपली स्वप्न ही पेटत ठेवा, चांगल्या सवयींची जोड ठेवा, चांगली पुस्तक वाचा, चांगले विचारांची शिदोरी आपल्याजवळ बाळगा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य हे चांगले जपा.
आशा करूया की लवकरच सर्व काही पूर्ववत होईल आणि परत शाळेची घंटा वाजेल. कारण एखाद्यावेळी शाळेतल्या बोर्डावर नाव येणार नसेल परंतु नियतीने जर ठरवलं तर परिश्रमाच्या जोरावर आपण तिथल्या चेअरमनच्या बोर्डावर नाव कोरू शकतो. म्हणून सकारात्मक विचार बाळगा आणि ह्या कठीण प्रसंगाला आपण सर्वांनी धीराने सामना करूया.
  •  IAS राजेंद्र भारूड

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.