विरोधात निघालेल्यांना ‘सिस्टिम’ कशी झुकवते हे IAS शहा फैसल यांच्या स्टोरी वरून कळतं

शहा फैसल काश्मीर खोऱ्यातून UPSC टॉप करणारा पहिला विद्यार्थी. २०१० मध्ये ही बातमी आली अवघ्या देशात हे नाव माहित झालं होतं. ही बातमी येयच्या  बरोबर १९ वर्षांपूर्वी  दहशतवाद्यांनी शहा फैझलच्या  वडिलांची काश्मीर हत्या केली होती. 

दहशतवाद्यांना घरात आश्रय देण्यास कुटुंबाने नकार दिल्यामुळेच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

 शहा फैसल, त्यांची आई  बहिणींसमोर त्यांचा वडिलांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासूनच काश्मीरमधील दहशतवाद, हिंसाचार संपवण्यासाठी काम करण्याचं शहा फैसल ठरवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी सुरवातीला भारतीय प्रशसकीय सेवेचा ऑप्शन निवडला होता. देशात टॉप करून त्यांनी आपण निवडलेला मार्ग बरोबरच असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र त्यांचा हा मार्ग जितका त्यानं वाटलं तितका सोपा निघाला नाही.

आज शहा फैसल चर्चेत आहेत कारण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून बहाल झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातुन मागे घेतली आहे.

एप्रिल महिन्यातच शहा फैसल यांना केंद्र सरकारने पुन्हा नोकरीत घेतले होते.

फैसल यांनी  जानेवारी 2019 मध्ये “काश्मीरमधील वाढलेल्या हत्या” आणि केंद्राकडून या हत्या थांबवण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याच्या निषेधार्थ IAS च्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही महिन्यांनंतर त्यांनी जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट हा राजकीय पक्ष सुरू केला.

संविधानाच्या कलम ३७० अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या  केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २३ याचिकाकर्त्यांपैकी फैसल हे एक होते . 

मात्र 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने ३७० ची तरतूद रद्द केल्यानंतर फैसल हा अनेक काश्मिरी राजकारण्यांपैकी एक होते ज्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये फैसलवर कठोर असा पब्लिक सेफ्टी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सोशल मीडिया पोस्ट आणि लेखांद्वारे “सॉफ्ट सेपरेटिझम” पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पब्लिक सेफ्टी ऍक्टनुसार आरोपीला तीन महिन्यांपर्यंत चौकशीशिवाय ताब्यात ठेवता येते.

”काश्मिरी जनतेला राजकीय अधिकार पुन्हा मिळवून देण्यासाठी काश्मीरला दीर्घ, शाश्वत, अहिंसक राजकीय जनआंदोलनाची गरज आहे.”

कलम 370 रद्द केल्याने मुख्य प्रवाह संपला आहे. त्यामुळे तुम्ही आता एकतर सरकारचे हस्तक आहात किंवा फुटीरतावादी आहात.”

मात्र एवढी टोकाची भूमिका शहा फैसल सरकारच्या सेवेत राहूनच घेत होते. त्याचबरोबर देशात वाढलेला हिंदू मुस्लिम वाद, केंद्र सरकारचे काश्मिरी अतिरेक्यांबद्दलचे धोरण यावर शहा फैसल  उघडपणे टीका करत होते.

मात्र सरकारने शहा फैसल यांनी राजीनामा दिला असला तरी तो मंजूर केला नव्हता.त्यामुळे शहा फैसल यांची ही वक्तव्ये त्यांनी सरकारी सेवेत असताना केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अखेर जून २०२० मध्ये शहा फैसल यांना जेलमधून सोडण्यात आलं. मात्र त्यानंतरही लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

काश्मीरसाठी राजकारणात येऊन काहीतरी करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या शहा फैसल यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. याकाळात बहुतेक आपला आदर्शवाद आपल्या अंगलट आल्याची त्यांची भावना झाली होती.

त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये जेलमधून बाहेर आल्यानंतर शहा फैसल यांचे विचार एकदमच बदलले. जेलमधून बाहेर आल्या आल्या त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला.

राजकारण सोडल्यानंतर काही दिवसांनी शहा फैसल यांनी सरकारसाठी काम करण्यास आपण  प्रतिकूल नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांच्या  J&K अधिकाऱ्यांच्या  पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेला यादीत समावेश करण्यात आला. 

आता शहा फैसल यांनी आपले विचार पूर्णपणे बदलले होते.

 नोकरीत येण्यासाठी त्यांनी सरकारचं कौतुक करण्याचा सपाटाच लावला होता. त्यांचे जवळपास प्रत्येक ट्विट भाजपच्या भूमिकेचं समर्थन  करणारं होतं. 

“काश्मिरी पंडितांच पलायन ही आपल्या इतिहासातील सगळ्यात मोठा डाग आहे. जानेवारीच्या त्या भयंकर रात्रीच्या आठवणी न्याय मिळेपर्यंत कायम आहेत.” हे त्यांचं पिन केलेलं ट्विट आहे.

2 ऑगस्ट रोजी शहा फैसल यांनी आपला ट्विटर डिस्प्ले फोटो भारतीय ध्वजाचा बदलला आणि ट्विट केले: “आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अहवानाला प्रतिसाद देत मी माझ्या सोशल मीडिया खात्यांचा डीपी तिरंगा असा बदलला आहे. मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रध्वजाबद्दल तुमचे प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलून तिरंगा करा. #”

मात्र शहा फैसल यांच्या या ट्विटबद्दल आता आश्चर्य वाटणं कमी झालं होतं.

ते गेल्या दोन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटला रिट्विट करत होते. पाकिस्तानमधील ईशनिंदा हिंसा, अफगाणिस्तानच्या तालिबानच्या ताब्यात, काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी मारल्या गेलेल्या हिंदू स्थलांतरित कामगारांसाठी निधी उभारने हीच शहा फैसल यांच्या ट्विटचे विषय होते.

शहा फैसल यांच्या  सरकारधार्जिणे म्हणजेच भाजपधार्जिणे  यांच्या ट्वीट करण्याला अखेर यश आलं आणि शहा फैझल याना सरकारने नोकरीमध्ये पुन्हा पोस्टिंग दिली. 

यावर्षी एप्रिल महिन्यात शहा फैझल नोकरीमध्ये पून्हा रुजू झाले. त्यांना पुन्हा नोकरीमध्ये घेण्याच्या निर्णयाबद्दल मंत्री  जितेंद्र सिंह यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी शहा फैझल यांचं “हृदयपरिवर्तन” झालं आहे असं सिंह म्हणाले.

अवघ्या आठ महिन्यात सिस्टिम बदलायला निघालेला माणूस सिस्टमपुढे झुकला होता. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.