असं म्हणतात की पाकचे पंतप्रधान पिंकीच्या इशाऱ्यावर नाचत आहेत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमीच ह्या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी स्वतःच्याच देशातल्या महागाई वरून, कधी काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघाशी पडल्यामुळे  तर कधी देशांतर्गत राजकारणामुळं.

आताही पाकचे पंतप्रधान चर्चेत आहेत ते लष्करप्रमुख बाजवा यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या आयएसआय चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांची निवड झाली. आपल्याला ग्राह्य न धरता पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांची नियुक्ती केली, म्हणून इम्रान खान जरा जास्तच नाराज आहे. 

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठकांचा सत्र सुरूच आहे. अश्यातचं आता इम्रान खान यांचं पिंकी प्रकरण चर्चेत आलंय.

आता पिंकी काही राजकारणाशी संबंधित नाव नाही. पण यावरून विरोधकांनीसुद्धा त्यांना चिडवायला सुरवात केलीये. या पिंकीला आयएसआय चीफ प्रमुखांच्या वादाशी सुद्धा जोडलं जातंय.

 विरोधकांचा आरोप आहे की, इम्रान खान पिंकीच्या इशाऱ्यावर नाचतात, पिंकीच्या परमिशनशिवाय पंतप्रधान कोणतंच काम करत नाहीत. ही चर्चा पार इथपर्यंत गेलीये कि, इम्रानवर पिंकीने जादूटोणा केल्याचं देखील बोललं जातंय. 

आता उत्सुकता तर आहेच कि एवढी चर्चेत असलेली पिंकी आहे तरी कोण? पंतप्रधान इम्रान यांच्याशी तिचे नाव का जोडलं जातंय? लष्करप्रमुखांशी इम्रानच्या वादात तिचा हात काय आहे?

तर आधी सांगितल्याप्रमाणं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख यांच्यात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांच्या नियुक्तीवरून युद्ध सुरू आहे. असे म्हटले जात आहे की,  इम्रानने आयएसआयच्या नियुक्तीवरून लष्करप्रमुखांशी गोंधळ घातला.  कारण पिंकी पीरनीने त्यांना जनरल फैज हमीद यांना पदावर ठेवण्यास सांगितले होते.

आता ही पिंकी पिरानी म्हणजे इम्रान खानची बायको बुशरा. ही पिंकी म्हणजेच बुशरा इम्रानची तिसरी बायको आहे. इम्रानने याआधी जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खानशी लग्न केले आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये इम्रान खानने बुशरासोबत तिसरे लग्न केले. ती पाकपट्टणमधील बाबा फरीद गंज शकर मधील एक चर्चित पीर आहे आणि तिला पिंकी बीबी किंवा पिंकी जादूगरनी म्हणूनही ओळखले जाते.

पिंकी नेहमी बुरखा घालते.  तिला पाच मुलं आहे. असं म्हंटल जात कि, ही पिंकी चेटूक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते आणि त्याचाच प्रभाव इम्रानवरही स्पष्टपणे दिसून येतो.

असा दावा करण्यात आला आहे की, इम्रानची पत्नी बुशराचे चेहरा आरशात दिसत नाही, तिच्याकडे आध्यात्मिक आणि करामती  शक्ती आहेत. लोक असेही म्हणतात की, बुशराला दोन जिन आहेत, जे ती वेगवेगळ्या कामांसाठी वापरते.

आता खरं काही असलं तरी बुशरा बेगमने इम्रान खानवर कब्जा केलाय, यात शंका नाही. कारण  इम्रान बुशरा म्हणजेचं पिंकीला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, अशी चर्चा पाकिस्तानच्या राजकीय कॉरिडॉरमध्येही आहे. विरोधक यासंदर्भात अनेक प्रकारचे तर्क देत आहेत. पाकिस्तानी माध्यमेही याला हवा देत आहेत. यासाठी तीन गोष्टीही कारणीभूत आहेत.

पहिली म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान लष्कराने इम्रानच्या बानी गाला इथल्या घरात गेलेल्या दोन लोकांना अटक केल्याची बातमी आली होती. असे म्हटले जात आहे की,  हे लोक तिथे जाऊन लष्करप्रमुखांसाठी चेटूक करायचे.

दुसरे म्हणजे, सोशल मीडियामध्ये बातम्या पसरल्या की पाकिस्तान लष्कराने जंगलातून सहा लोकांना अटक केली आहे. असे म्हटले जात आहे की ही सहा माणसे एका कापडी बाहुलीला एका पिनने टोचत होती. या घटनेकडे एक प्रकारचे जादूटोणा म्हणूनही पाहिले जात आहे. हे पिंकीच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

तिसरी घटना म्हणजे, पाकिस्तानच्या कथित अणुबॉम्बचे जनक डॉ.अब्दुल कादिर खान यांच्या मृत्यूनंतर इम्रान खान अंत्यविधीला उपस्थित राहिले नाहीत. या घटनेला जादूटोणा देखील जोडला जात आहे. यामध्ये पिंकीचे नावही समाविष्ट केले जात आहे. पिंकीच्या सांगण्यावरून इम्रान डॉ.अब्दुल कादिर खान यांच्या अंत्यविधीला गेले नव्हते,  असे बोलले जातेय.

पाकिस्तानमधील मुख्य विरोधी पक्षनेत्या  मरियम नवाज यांनी पिंकी पिरानी यांचे नाव न घेता माध्यमांसमोर सांगितले की, देशात हा कोणत्या प्रकारचा वजीर-ए-आलम आहे, जो देशात सामान्य नियुक्तीसाठी जादूटोणा आणि भुताटकीची मदत घेतो.

आता अशा परिस्थितीत जर पाकिस्तानचा  जगासामोर तमाशा बनत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जर जंतर मंतर, भततकी आणि जादूटोणा इतका पॉवरफुल असेल तर मग त्याचा उपयोग देशाच्या भल्यासाठी का करत नाहीत.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.