इम्रान खानचा काका भारताकडून खेळला आणि पहिल्या हॅट्रीकचा मानकरी ठरला….

क्रिकेटमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमध्ये टॉपला असतात भारत पाकिस्तान. दोन्ही देशांच्या खेळाडूंपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळेच मॅच इतकी ध्यान देऊन बघत असतात कि आपोआपच त्यातून देशप्रेमाच्या भावना जागृत होतात. आता आजच्या जमान्यात ऍशेज सीरिजपेक्षाही जास्त मार्केट भारत पाकिस्तान मॅचला असतं.

पण हे झालं आताच्या काळातलं पण बाका जिलानी नावाचे क्रिकेटपटू अगोदर भारताकडून खेळायचे, हे बाका जिलानी इम्रान खानचे काका होते. बाका जिलानी यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल त्यामुळे त्यांनी नोंदवलेला विक्रम लक्षात राहत नाही, तर आज आपण बाका जिलानी यांच्याबद्दल जाणून घेऊ. 

बाका जिलानी यांचं पूर्ण नाव होतं मोहम्मद बाका खान जिलानी. पंजाबच्या जालंधर मध्ये २० जुलै १९११ रोजी त्यांचा जन्म झाला. बाका जिलानी यांनी भारतीय संघाचं टेस्ट क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. बाका जिलानी हे मिडीयम पेसर बॉलर होते आणि लोवर मिडल ऑर्डरला बॅटिंग करायचे. रणजी क्रिकेट त्यावेळी आजच्या पेक्षा जास्त महत्वाचं मानलं जायचं. एकवेळ तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेला नाही तरी चालेल पण रणजी क्रिकेट खेळलेलं हवं.

बाका जिलानी यांनी रणजी क्रिकेट इतिहासात एक अनोखा विक्रम नोंदवलेला आहे.

रणजी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम बाका जिलानी यांच्या नावावर आहे.

१९३४-३५ सालच्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये उत्तर भारत आणि साऊथ पंजाब या दोन संघात सामना खेळवण्यात आला होता, साऊदर्न पंजाब तेव्हा फक्त २२ धावांवर ऑलआउट झाला होता, ७६ वर्षांपर्यंत हा रणजी क्रिकेटमधला सगळ्यात कमी स्कोर होता.

भारतीय संघाकडून फक्त एकच टेस्ट मॅच खेळण्याचं भाग्य बाका जिलानी यांना लाभलं. १९३६ साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. सी के नायडू तेव्हा भारताचे कर्णधार होते. या दौऱ्यावर जिलानी यांना विशेष चमक दाखवता आली नाही उलट इथे नायडूंबरोबर त्यांचं वाजलं. याला कारण होतं जिलानी यांना फक्त १६ धावा करता आल्या आणि १५ ओव्हर फेकून त्यांना एकही विकेट मिळवता आली नाही. 

पण या दौऱ्यावर बाका जिलानी यांना ब्लड प्रेशर, हाय टेम्पर, झोपेत चालण्याचा आजार असे प्रकार व्हायला लागले. अचानक त्यांना राग यायचा आणि अचानक ते गप्प बसायचे. यामुळे त्यांचं संघातील स्थान धोक्यात आलं होतं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३१ मॅच खेळून त्यांनी ८३ विकेट मिळवल्या होत्या. यात त्यांनी ३७ धावा देऊन ७ विकेट मिळवलेली मॅच त्यांच्या कारकिर्दीतली महत्वाची मॅच होती. बाका जिलानी यांचं आजारपणामुळे २ जुलै १९४१ रोजी निधन झालं.

जिलानी यांचं कुटुंब तेव्हा मोठं होतं. त्यांचा पुतण्या इम्रान खान आहे ज्याने पुढे पाकिस्तान क्रिकेटला चांगले दिवस आणले आणि तो पुढे पाकिस्तानचा पंतप्रधान झाला. पण जिलानी हे प्रामुख्याने ओळखले गेले ते रणजी ट्रॉफीच्या पहिल्या  हॅट्रिकसाठी…..!

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.