ना चीन, ना अमेरिका… जगात सगळ्यात जास्त महिला पायलट आपल्या भारतात आहेत…

भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. राजपथावरचे चित्ररथ टीव्हीवरुन पाहणं हा सुद्धा एक सोहळाच असतोय. इतर राज्यांनी काय केलंय हे टंगळमंगळ करत बघितलं जातं, पण आपल्या राज्याचा चित्ररथ आला की, एकदम चिडीचूप शांततेत डोळ्यात तेल ओतून रथ बघितला जातो. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते, की आयुष्यात एकदा तरी राजपथावर जाऊन ही परेड बघायचीच.

यंदाची परेडही अगदी लौकिकाला साजेशी अशीच झाली. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं, ते भारतीय हवाई दलाच्या चित्ररथानं. तसा हा चित्ररथ काय झकपक नव्हता, अगदी साधा होता. मात्र तरीही तो खास ठरला तो त्यावर ताठ मानेनं, थाटात उभं राहून सॅल्यूट करणाऱ्या शिवांगी सिंग यांच्यामुळं. खरंतर, शिवांगी कोण आहेत हे आतापर्यंत तुम्हाला माहित झालं असेलच. पण तरीही पुन्हा एकदा सांगतो भिडू, भारतीय हवाई दलातल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग या राफेल हे लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक आहेत. अर्थातच ही आपली छाती गर्वानी फुगण्यासारखीच गोष्ट आहे.

पण हे असं पहिल्यांदाच होतंय का? तर अजिबात नाही, याआधीही सैन्यदलातल्या महिलांनी साऱ्या देशाला अभिमान वाटावा अशा गोष्टी अनेकदा केल्या आहेत. विशेष म्हणजे सगळ्या जगाचा विचार केला, तरी सर्वाधिक महिला पायलट आपल्या भारतात आहेत. जरा डिटेलमध्ये सांगतो…

मार्च २०२१ मध्ये देशाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री व्हीके सिंह यांना राज्यसभेत याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी माहिती दिली, की देशात एकूण १७ हजार ७२६ नोंदणीकृत वैमानिक आहेत. त्यात महिला वैमानिकांची संख्या १५ टक्के, म्हणजे एकूण २ हजार ७६४ आहे. त्यावेळी भारतीय विमान कंपन्यांमध्ये महिला वैमानिकांची संख्या १२.४ होती, मात्र त्यानंतर २०२१ हे वर्ष संपेपर्यंत ही संख्या तीन टक्क्यांनी वाढली.

जसं आपल्याकडे राज्यसभेत प्रश्न विचारला गेला, तसं सगळ्या जगाबद्दल माहिती देण्यासाठी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन पायलट्स नावाची संस्था आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जगातल्या एकूण सगळ्या वैमानिकांच्या संख्येपैकी फक्त पाच टक्के महिला वैमानिक आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सगळ्या पश्चिमी देशात जेवढ्या महिला वैमानिक आहेत, त्यापेक्षा भारतातल्या महिला वैमानिकांची संख्या दुप्पट आहे.

पण भारतातल्या सगळ्याच महिला वैमानिक हवाई दलात काम करतात का? तर उत्तर आहे नाही. देशांतर्गत विमानसेवांमध्ये १३.९ टक्के महिला काम करतात. मुख्य विमानसेवांमध्ये १२.३ टक्के महिला वैमानिक आहेत, तर कार्गो विमानसेवांमध्ये ८.५ टक्के महिला वैमानिक आहेत.

आता आकडेवारी वाचायला किचकट वाटत असली, तरी देशातल्या महिला सबल आहेत, हे यातून सहज कळतंय. कधी आपल्या डोक्यावरुन विमान उडत असेल, तर त्याची वैमानिकही महिला असू शकतेय भिडू.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.