ऐतिहासिक निकालाची ब्रेकिंग न्यूज पोहचवण्यासाठी पत्रकारांनी कोर्टाच्या छतावरून उडी मारली

१२जून १९७५, अलाहाबाद हाय कोर्ट

आजचा दिवस कोर्टाच्या इतिहासातील प्रचंड महत्वाचा होता. सकाळी १० च्या आधीच वरच्या मजल्यावरचा कोर्ट रूम नंबर 24 खचाखच भरलेला होता. कारण ही तसंच होत,

तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध केस सुरू होती.

झालं असं होतं की १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी इंदिरा गांधींनी अफरातफर केली असा आरोप त्यांच्या विरुद्ध लढलेले उमेदवार राज नारायण यांनी केला होता. यामुद्द्यावर केस सुरू होती. आज त्याचा निकाल लागणार होता.

या ऐतिहासिक निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागल होतं. इंदिरा गांधींविरुद्ध निकाल गेला तर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागणार होते.

अस म्हणतात की निकाल काय लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी इंदिराजींनी आधीच आपले गुप्तहेर सोडले होते.

आज आपल्या इथे जशी सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी मीडियाची मारामारी असते, तसाच प्रकार अलाहाबादमध्ये पाहायला मिळत होता.

कारण ही तसंच होत, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधानांवर केस चालली होती.

सगळ्यात महत्वाची स्पर्धा होती यूएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थेमध्ये. पीटीआयचे ऑफिस कोर्टाच्या खिडकीच्या समोरच होते पण युएनआयच ऑफिस थोड्या अंतरावर होतं.

न्यायाधीश होते, जगनमोहनलाल सिन्हा.

जस्टीस सिन्हा जेव्हा कोर्टात दाखल झाले तेव्हा तिथली गर्दी पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी खुर्चीत बसताच इशारा केला.

 निकाल वाचून दाखवताना कोणीही गोंधळ घालू नये अथवा टाळ्या वाजवू नये अशी सक्त सूचना देण्यात आली.

न्यायाधीशांनी चष्मा चढवला व २५५ पानांचा तो निकाल समोर धरला. ते म्हणाले,

“मैं इस केस से जुड़े सभी मुद्दों पर जिस निष्कर्ष पर पहुंचा हूं, उन्हें पढूंगा।”

काही सेकंदासाठी ते थांबले. तेवढा वेळ देखील अनेकांचे हृदय बंद पाडणारा होता. जस्टीस सिन्हा यांनी ते शब्द उच्चारले,

“याचिका स्वीकृत की जाती है।”

काही क्षण कोणालाही काही कळाल नाही. सगळ कोर्ट स्तब्ध झालं होतं. कोर्टाने पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरुद्ध निकाल दिला होता. न्यायाधीशांनी सूचना दिलेली असूनही टाळ्यांचा गडगडाट झाला.

इकडे मीडियावाल्यांची बातमी पोहचवण्यासाठी धावपळ उडाली.

युएनआयचे रिपोर्टर प्रकाश शुक्ला यांनी छतावरून उडी मारली आणि ही बातमी आपल्या ऑफिसमध्ये पोहचवली. टेलीप्रोपंटर वर मेसेज होता की,

MRS. GANDHI UNSEATED. 

इंदिरा गांधीना आपली लोकसभा खासदारकी सोडावी लागणार याचाच अर्थ त्यांचं पंतप्रधानपद देखील सोडावं लागणार.

इंदिरा गांधी यांना देखील टेलीप्रोपंटरवरून हा मेसेज पाठवण्यात आला. त्यांचे सचिव धावतपळत ही न्यूज घेऊन आले तेव्हा इंदिराजींचे थोरले सुपुत्र राजीव गांधी त्यांच्या खोलीबाहेर उभे होते.

इंदिरा गांधींच्या आयुष्यातली सर्वात धक्कादायक बातमी राजीव गांधींनी पोहचवली.

या निर्णयाविरुद्ध त्या सुप्रीम कोर्टात गेल्या. पण १२ जूनचा तो ऐतिहासिक निकाल त्यांच्या विरोधकांना व जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला बळ देऊन गेला.

याचीच परिणीती पुढच्या दोन आठवड्यात इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्यात झाली.

संदर्भ- satyahindi.com  जब जस्टिस सिन्हा ने प्रधानमंत्री इंदिरा गाँधी का चुनाव ख़ारिज कर दिया!
swrajyamedia 12 June 1975 जब पहले खबर देने के लिए रिपोर्टर हाईकोर्ट की छत से कूद गया

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.