ममता कुलकर्णीचा नवरा ड्रग्सच्या धंद्यात दाऊदचा देखील बाप होता
मुंबई अंडरवर्ल्डच्या फाऊंडर मेम्बर्सपैकी एक म्हणजे करीम लाला. याच करीम लालानं बॉलिवूडचं कनेक्शन ड्रग्सशी जोडलं. आता बॉलिवूड आणि ड्रग्स ही काय छोटी क्षेत्रं नाहीत. त्यामुळे एका माणसाच्या ताकदीवर हे सगळं होण्याचा विषयच नाही. बॉलिवूडभोवती ड्रग्सचं जाळं टप्प्याटप्यानं विणलं गेलं. लालानंतर धंदा वाढवला तो हाजी मस्ताननं. पण लाला आणि मस्तानच्या काळात ड्रग्सला फार मोठं मार्केट नव्हतं.
ड्रग्सची खरी नशा भिनली आणि धंद्याला मार्केट मिळालं ते दाऊदच्या काळात. दाऊदनं चंदेरी दुनियेला ड्रग्सचा शो दाखवला तो तीन हुकमी एक्क्यांच्या जीवावर. खालिद पेहेलवान, मावद खान आणि विकी गोस्वामी…
पण ड्रग्सच्या धंद्यात विक्की गोस्वामीच सगळ्यांचा बाप होता असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने एकदा दाऊद सोबत सुद्धा पंगा घेतला होता.
विक्की गोस्वामी सुरुवातीच्या काळात छोटा राजनसाठी काम करायचा. पुढं पुढं जसा त्याचा धंद्यात जम बसायला लागला तसं तसं त्याचा संबंध दाऊदशी येऊ लागला. पण १९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये दाऊदच नाव आल्यावर छोटा राजनने दाऊदची साथ सोडली होती. त्यावेळेपर्यंत तरी विक्की गोस्वामी दाऊदच्या सोबत होता. पण राजन जसा का गेला, तस विक्की ही आपला तंबू गोळा करून राजनच्या पंखाखाली गेला.
विक्कीने दाऊदची साथ सोडली तेव्हा दाऊद पार चवताळला होता. नाराज झालेल्या दाऊदने विक्कीला धडा शिकवायचा असं ठरवलं. हेच म्हणून कि काय असं म्हंटल जात की, दाऊदने विक्कीच्या अहमदाबाद मधल्या पाल्दी इथल्या घरावर फायरिंग केली होती. त्यापुढं जाऊन असं ही म्हंटल जातं की, काही वर्षांपूर्वी जेव्हा केनियाच्या पोलिसांनी विक्कीला आणि त्याची बायको ममता कुलकर्णीला अटक केली होती, ती सुद्धा दाऊदच्या टीपवरूनच.
ह्या सगळ्या प्रकाराला विक्की घाबरला आणि परत दाऊदच्या तंबूत परतला.
दाऊदने विक्कीला घाबरवायचं कारण म्हणजे, दाऊदला माहित होत की विक्की ड्रग्समधला पक्का खिलाडी आहे. तो आणि तोच ड्रग्सचा कारभार वाढवू शकेल. आणि आज विक्कीच्या कृपेमुळे
दाऊदच ड्रग्स नेटवर्क आशिया आणि आफ्रिकेत पसरलयं. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भारत, बांगलादेश, थायलंड आणि लाओसमध्ये हे ड्रग्ज तयार केले जातात. साठवली जातात. दुबईला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका येथून समुद्री मार्गाने नेले जाते. दुबई हा फक्त एक ट्रान्झिस्ट पॉईंट आहे आणि कडक कायद्यांमुळे तिथे ड्रग्स घेतलं जात नाही. दुबईहून ड्रग्ज केनिया, टांझानिया, मोझांबिक, नायजेरियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पाठवली जातात.
या विक्कीला असंच ड्रग्सची तस्करी करताना दुबईच्या ट्रान्झिस्ट पॉईंटवर पकडण्यात आलं होत. त्याला दुबईच्या कोर्टाने शिक्षा दिली होती. शिक्षा पूर्ण करून २०१३ साली जेव्हा विक्की सुटला तेव्हा त्याने केनियातून आपला ड्रग्सचा कारभार पुन्हा सुरु केला. कारण पठ्ठ्याची मस्ती अजूनपर्यंत जिरलीच नव्हती.
केनियात विक्कीचा संबंध अली पंजानी सोबत आला. हा अली पंजानी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माचा पती होता. या अली पंजानी आणि विक्कीने एक औषधांची कंपनी सुरु केली होती. विक्कीने ड्रग्स तयार करण्यासाठी एक भारतीय डॉ. बिपिन पांचाल याच्याशी संपर्क केला होता.
केनियाच्या मोम्बासा मध्ये डॉ. पांचाल आणि विक्की गोस्वामी यांच्यात एक मीटिंग झाली होती. ज्यात डॉ. पांचालने विक्कीला मदत करायचं आश्वासन दिल होत. या आश्वासनाप्रमाणे, पांचाल भारतात एक फार्मास्यूटिकल कंपनी काढून त्यात एफेड्रिन तयार करायचा बंदोबस्त करणार होता. त्यानंतर ते एफेड्रिन युगांडाला पाठवण्यात येणार होतं. युगांडात या एफेड्रिन वर प्रोसेस करून त्याला मेथेमफेटामाइन कन्व्हर्ट करण्याचा प्लॅन होता. पण त्यांचं भांड फुटलं आणि ही कंपनी बंद पाडण्यात आली.
ड्रग्ससाठी कायपण असं म्हणत, या विक्की गोस्वामीने कसे कारनामे केले ते तुम्ही वाचलंच. पण ड्रग्सपेक्षा ही, हा विक्की आपल्या लक्षात राहतो ते म्हणजे, ममता कुलकर्णीमुळे.
२०१३ साली ममताने बॉयफ्रेंड विकी गोस्वामी बरोबर लग्न केलं होत. लग्न करण्यासाठी ममताने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर आहे हे माहिती असून सुद्धा ममताने त्याची साथ सोडली नाही. एवढंच काय तर ममताने विक्कीच्या प्रेमाखातर जेलची पायरी सुद्धा चढली होती.
हे ही वाच भिडू
- एकाच झाडापासून बनणाऱ्या गांजा, भांग आणि चरस मध्ये फरक तो काय ?
- जगप्रसिद्ध गांजा पिकवणाऱ्या मलाणा गावात भारताचा कायदा चालत नाही.
- राजीव गांधींना फसवुन अमेरिकेनं भारतात गांजाबंद केला.