भारतात आयफोन तयार करण्यात येतोय, पण त्याचा आपल्याला काय फायदा होणार ?

अ‍ॅप्पल १४ हा फोन ७ सप्टेंबर रोजी लॉन्च झाला. तेव्हा पासून या फोनची चर्चा सुरु आहे. मागच्या आठवड्यात अ‍ॅपल कंपनीच्या वतीने घोषणा करण्यात आली की, आयफोन १४ भारतात तयार करण्यात येणार आहे .

मेड इन इंडिया आयफोन भारतासाठी का महत्वाचा आहे ? हा फोन फक्त भारतातच विकला जाणार आहे का ? तसेच भारतीयांना स्वस्त मिळेल का? 

सगळ्यात अगोदर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, अ‍ॅपल ‘मेड इन इंडिया’ आयफोन जरी म्हणत असेल तर हे फोन भारतात फक्त असेम्बल करण्यात येतात. इतर देशातून त्याला आयफोन बनवण्यासाठी लागणारे सुट्टे भाग मागवले जातात आणि ते भारतातील कंपन्यांमध्ये असेम्बल करण्यात येतात. 

अ‍ॅपलचा ग्लोबल पार्टनर असणारी फॉक्सकॉन कंपनी भारतात आयफोन १४ तयार करणार आहे. चेन्नई जवळील श्रीपेरुमबुदुर येथील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत तयार करण्यात आलेला आयफोन भारताबरोबरच इतर देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे. 

२०२५ पर्यंत ४ पैकी १ आयफोन भारतात तयार करण्याची तयारी अ‍ॅपलनं सुरु केली आहे

२०१७ पासून अ‍ॅपल कंपनी भारतात आयफोन तयार करते. आयफोन SE हा पहिला फोन भारतात तयार करण्यात आला. त्यानंतर Iphone XR, Iphone 12, Iphone 13 हे सगळे फोन भारतात तयार करण्यात आले आलेत. मात्र हे फोन लॉन्च झाल्यानंतर काही महिन्यांनी, वर्षांनी तयार केले जात होते. मात्र आयफोन 14 हा असा फोन आहे जो लॉन्च झाल्याबरोबर भारतात तयार करण्यात येत आहे.  

भारतात आयफोनचे उत्पादन वाढल्यानंतर जगभरात कसे पाठवण्यात येतील याची तयारी पुरवठादार कंपन्यांकडून अ‍ॅपलनं करून घेतली आहे. 

तज्ज्ञांच्या मते अ‍ॅपल २०२५ पर्यंत भारताला जागतिक आयफोन उत्पादन केंद्र बनवण्याच्या तयारीत आहे. आयफोनचे चीन मधील उत्पादन कमी करण्याची कंपनीची इच्छा आहे. मागच्या १० वर्षांपासून अ‍ॅपल कंपनी आपले अनेक प्रोडक्ट भारतात तयार करत आहे. 

अ‍ॅपल कंपनी भारतात फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन या कंपन्यांच्या माध्यमातून आयफोनचे उत्पादन करत आहे. तसेच २०२२ च्या पहिल्या तिमाहीत या दोन कंपन्यांनी १० लाख फोन तयार केले आहेत.  एका अहवालानुसार २०२१ पासून अ‍ॅपल कंपनीने भारतात उत्पादन वाढवले आहे. भारतात विक्री होण्याऱ्या आयफोनपैकी २३ टक्केच फोन आयात करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये हेच प्रमाण ६४ टक्के होते. 

तसेच जे पी मॉर्गनच्या अहवाला नुसार, २०२२ च्या शेवटपर्यंत आयफोन १४ च्या एकूण उत्पादनापैकी ५ टक्के उत्पादन भारतातुन केलं जाईल. तर २०२५ पर्यंत अ‍ॅपलच्या एकूण आयफोन उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन एकट्या भारतातून करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

भारतात आपल्या फोनचं उत्पादन करणारी अ‍ॅपल ही एकमेव कंपनी नाही 

अ‍ॅपल बरोबरच सॅमसंग कंपनीने सुद्धा फोनच्या उत्पादन करण्यासाठी सगळ्यात मोठा कारखाना भारतात सुरु केला आहे. याच बरोबर झायोमी, ओप्पो, व्हिओ आणि वन प्लस सारख्या कंपन्यांचे फोन भारतातच असेम्बल होत आहे. गुगलचा पिक्सल हा फोन सुद्धा भारतात तयार करण्यात येत आहे. 

मेड इन इंडिया आयफोन १४ भारतात स्वस्त मिळेल का ? 

अ‍ॅपल कंपनी गेली अनेक वर्ष आपले प्रोडक्ट चीन मध्ये उत्पादित करत होती. मात्र मागच्या काही दिवसात चीन आणि अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. यामुळे अ‍ॅपल आपल्या प्रोडक्टच्या उत्पादनासाठी दुसरा पर्याय शोधत आहे. 

भारतात आयफोन स्वस्त मिळणार नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे, हे फोन भारतात असेम्बल करण्यात येत आहेत. त्याला लागणारे सुट्टे भाग इतर देशातून आयात करावे लागणार करावे लागणार आहेत. त्यासाठी कंपनीला २० टक्के आयातकर भरावा लागणार आहे. 

याच बरोबर १८ टक्के जीएसटी, आयातशुल्क भरावं लागणार यामुळे जरी आयफोन भारतात तयार होणार असतील ते महागच असणार आहेत. याच मुळे आयफोन ११, १२ ही स्वस्त झाले नाहीत.       

भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे. आयफोन १४ भारतात असेम्बल करण्यात येत असल्याने मेक इन इंडियाला त्याचा फायदा होईल. 

सध्याचा श्रीपेरुमबुदुर येथील फॉक्सकॉनच्या कंपनीत १८ हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यातील ११ हजार महिला कर्मचारी आहे. तर विस्ट्रोन्स कंपनीत ९ हजार कर्मचारी काम करत आहेत. फोन स्वस्त होणार नसले तरी, भारतात अ‍ॅपल कंपनीने आपले उत्पादन वाढवले तर त्याचा फायदा रोजगार वाढीसाठी होणार आहे, हे निश्चित.  

हे ही वाच भिडू   

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.