कोरोना काळात हा अधिकारी ठामपणे उभा राहिला म्हणून मुंबई सुरक्षित राहू शकली
मागच्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोना पुन्हा नियंत्रणात येत असल्याचं आश्वासक चित्र बघायला मिळत आहे. पॉसिटीव्हच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एका बाजूला देशात उत्तरप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सातत्यानं रुग्णवाढीच्या आणि मृत्यूच्या बातम्या येत असताना मुंबईतील हे चित्र नक्कीच सकारात्मक आहे.
पहिल्या लाटेत देखील देशात संख्या वाढत असताना मुंबईत असच काहीस सकारात्मक चित्र बघायला मिळालं होतं. याच चित्राला त्यावेळी मुंबई पॅटर्न म्हणून देशभर ओळख मिळाली होती. तेव्हा तर देशातलं आणि राज्यातलं कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून मुंबईकडे बघितलं जात होत, मात्र अशा परिस्थितीमध्ये मुंबईने यश मिळवलं होतं.
तेव्हा देखील आणि आता देखील मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं त्यात जे काही हात राबत होते त्यामधील एक महत्वाचा हात होता,
मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचा.
साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून टीका होतं होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं चिंता व्यक्त केली होती. कारण आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी इथं होती. जर आकडेवारी सांगायची झाली तर ५ मे रोजी महाराष्ट्रात १४ हजार ५४१ रुग्ण होते, तर एकट्या मुंबईत ९ हजार ३१० रुग्ण होते. त्यामुळे चिंता, टीका या साहजिक होत्या.
त्यावेळी सरकारनं निर्णय घेत तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागी त्यावेळचे नगरविकास खात्याचे सचिव इकबालसिंग चहल यांना आणलं, आणि सुरु झाला मुंबई पॅटर्नचा प्रवास….
आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पदभार घेताच कोरोनाचा कल समजून घेत आक्रमकरित्या वेगवेगळ्या धोरणाची अंमलबजावणी सुरु केली. चेस द व्हायरस पॉलिसी, चेस द पेशंट पॉलिसी अशामधून त्यांनी सर्वात आधी मुंबईचा डब्लिंग रेट वाढवला. मुंबईतल्या दाटीवाटीच्या वस्त्या, उच्चचभ्रू परिसरातला कोरोनाचा फैलाव, रुग्ण, खाटांचं नियोजन, आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण असे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न झाले.
अनुभव घेत गेम चेंजर ठरणार २२ कलमी पॅटर्न तयार केला.
दररोज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कोरोनाबाधित पेशंटचा अहवाल महापालिकेला कळवणे खाजगी लॅबसाठी बंधनकारक केले. यामुळे खाजगी लॅबचे अहवाल वेगानं प्राप्त झाले. ३५ खाजगी हॉस्पिटलमधील सेवा शासकीय यंत्रणेनं ताब्यात घेऊन सरकारी हॉस्पिटलच्या दरात खाजगी हॉस्पिटलचे बेड उपलब्ध करुन दिले. सोबतच मोकळ्या मैदानांवर जम्बो फिल्ड हॉस्पिटल्सची उभारणी केली. हे दोन्ही उपक्रम राबवणारे देशातील पहिले शहर ठरले.
याच दरम्यान धारावी पॅटर्न देखील चांगलाच गाजला. आधी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघितल्यामुळे त्यांना धारावीची नस माहिती होती, याचा उपयोग झाल्यामुळे जिथं दररोज २०० रुग्ण सापडत होते, तिथं जुलै मध्ये हि संख्या ८ वर आली.
या सगळ्यामुळे जुलै अखेरीस मुंबईतील कोरोनाचा आलेख प्रचंड खाली आला, केंद्रीय आरोग्य मंत्रायलयानं कौतुक केलं. पुणे, पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांमध्ये हे पॅटर्न लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याच धारावी पॅटर्नची जागतिक आरोग्य संघटना, वॉशिंग्टन पोस्ट अशा संस्थांनी दखल घेतली, शिवाय फिलिपाइन्स सरकारनं हा पॅटर्न आपल्या देशात देखील लागू केला.
एकीकडे कोरोनाशी लढाई सुरु असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकले. त्यात देखील चहल यांनी मुंबईला अवघ्या ३ दिवसात तयार केलं. ओडिसा राज्याशी संपर्क साधून तिथल्या अधिकाऱ्यांच मार्गदर्शन मिळवलं.
तब्बल ४८ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. १८ हजार विविध इमारतींमध्ये या लोकांना ठेवलं. लाऊडस्पीकरवरुन माहिती दिली, लोकांना मार्गदर्शन करुन स्थलांतरासाठी आवाहन केलं. जिथे पाणी साचतं, लॅण्डस्लाईड किंवा दरड कोसळते, जमीन खचते, पाणी साचतं, धोकादायक झोपडपट्या अशा ठिकाणच्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवलं
या दरम्यान मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. खबरदारीसाठी मुंबई उपनगरं, नवी मुंबईत अनेक ठिकाणी वीज गायब झाली. पण मुंबई शहरातील वीज एक मिनिटभरही गेली नव्हती.
अलीकडे जानेवारीमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. मार्चमध्ये राज्यात दिवसभरात ६० हजार रुग्ण सापडत होते. त्याचवेळी मुंबईत ५ हजार पर्यंत हा आकडा पोहचला, मुंबईतील आकडा वाढत ४ एप्रिल पर्यंत २४ तासात ११ हजार १६३ इतका झाला होता.
प्रशासन जानेवारीपासूनच पुन्हा एक्शन मोड वर आलं होतं, एप्रिल पर्यंत प्रशासनानं १२ हजारापासून २२ हजार बेड वाढवले. महानगर पालिकेनं ऑनलाइन डॅशबोर्ड तयार केला, मोबाईलवरून बेडची माहिती मिळत होती, याच्यात गोरेगावच्या एका सेंटरमध्ये १५०० बेडची सुविधा करण्यात आली. आयसीयू बेड १५०० वरून २८०० पर्यंत नेले, महानगरपालिकेनं एका खाजगी कंपनी सोबत करार करून दररोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची सुविधा केली.
याशिवाय मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये ७०० डॉक्टर्सची टीम ३ शिफ्टमध्ये काम करत होती, सोबतच लक्षण असणाऱ्या रुग्णांच्या घरी पोहचण्यासाठी २४० मेडिकल टीम, २४० एम्ब्युलन्स तैनात केल्या. रुग्णाची कंडिशन बघून १७२ हॉस्पिटल्समध्ये कोणता बेड कोणत्या रुग्णाला द्यायचा हे ठरवलं जात होत. यामुळेच आता अलीकडे रुग्ण पॉसिटीव्ह पेक्षा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
मागच्या एका आठवड्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्या हि गोष्ट सहज लक्षात येऊ शकते.
- २३ एप्रिल – ७२२१ पॉसिटीव्ह तर ९५४१ बरे
- २४ एप्रिल – ५८८८ पॉसिटीव्ह तर ८५४९ बरे
- २५ एप्रिल – ५५४२ पॉसिटीव्ह तर ८४७८ बरे
- २६ एप्रिल – ३८७९ पॉसिटीव्ह तर ९१५० बरे
- २७ एप्रिल – ४०१४ पॉसिटीव्ह तर ८४२० बरे
- २८ एप्रिल – ४९६६ पॉसिटीव्ह तर ५३०० बरे
अलीकडेच एका माध्यमाशी बोलताना इकबालसिंग चहल यांनी सांगितलं आहे कि, ९ हजार बेडच्या जम्बो हॉस्पिटल्स शिवाय ५ हजार बेड आणि ८०० आयसीयू बेडच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी करत आहे.
हे हि वाच भिडू.
- अर्थसंकल्पात कोरोना लसीसाठी ३५ हजार कोटी रुपये जाहीर केले, तरी लस फुकट का नाही?
- वडिलांना पाकिस्तानने मंत्रिपदाची ऑफर दिली होती, पोरगा कोरोनामध्ये सर्वाधिक मदत करतोय
- पाकिस्तानला कोर्टात हरवलं पण दुर्दैवाने कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत..