वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर खरंच संघाचे आहेत का ? 

गेल्या चार दिवसात एका फोटोने धुमाकूळ घातला. झालं अस की लोकसभेसाठी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी जागा स्वाभिमानीकडे गेले. आत्ता स्वाभिमानीचा उमेदवार कोण? तर कॉंग्रेसचे विशाल पाटील. त्यापुर्वी संजयकाका पाटलांमार्फत भाजपकडून उमेदवारी घोषित होवून फार्म भरून प्रचारास सुरवात देखील करण्यात आली होती. वंचित आघाडीकडून प्रकाश शेंडगेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण झालं अस की कॉंग्रेसची उलाढाल पाहता वंचित आघाडीने आपला उमेदवार बदलला आणि गोपीचंद पडळकरांच्या गळ्यात माळ टाकली. 

गोपीचंद पडळकरांना वंचित आघाडीकडून उमेदवारी देण्याची घोषणा झाली आणि तात्काळ गोपीचंद पडळकरांचे फोटो व्हायरल झाले. अगोदरच भाजपची बी टिम म्हणून टिका होणाऱ्या वंचित आघाडीने कधीकाळी संघाच्या गणवेशात असणाऱ्या, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भिमाकोरेगाव घटनेसाठी जबाबदार ठरवण्यात आलेल्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीस थेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमार्फत उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

पण त्यापुर्वी हा फोटो खरा की खोटा हे पाहणं गरजेचं आहे ? 

तर हा फोटो खरा. स्वत: गोपीचंद पडळकर हे या फोटोंबाबत बोलताना म्हणाले, 

मी संघासाठी काम केलं, पण आता भाजपशी संबंध संपला आहे. मी यापूर्वी आरएसएसचं काम करत होतो, हे मी मान्य करतो. पण मी भाजपा सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधीत संघटनांशी माझा आता संबंध राहिलेला नाही. मात्र मला उमेदवारी मिळू नये यासाठी स्वाभिमानी आणि काँग्रेसवाले हे माझे जुने फोटो व्हायरल करत आहेत.

ही मात्र हे करत असताना त्यांनी जाणिवपुर्वक संभाजी भिडे आणि त्यांचे असणारे संबधांवर भाष्य करण्याचं टाळलं. 

फोटो कधीचा आहे ? 

हा फोटो जानेवारी २०१६ चा असल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात. पुणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत शिवशक्ती संगम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्यातील नव्यानेच निवडणुक आलेले भाजपचे आमदार, खासदार यांच्यासह पदाधिकारी देखील संघाच्या गणवेशात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे नव्याने भारतीय जनता पक्षात आलेले निवडक नेते देखील संघाच्या गणवेशात आले होते. या एकाच प्रसंगाचा हा फोटो असून, या एकमेव कार्यक्रमास गोपीचंद पडळकर यांनी संघाचा गणवेश घातला होता. 

संभाजी भिडे यांच्या सोबतचा फोटो नेमका कधीचा ? 

संभाजी भिडे यांच्या सोबतचा फोटो नेमका कधीचा याच उत्तर मिळत नाही मात्र हा फोटो संभाजी भिडे गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या “मोहिमे” मधील असल्याचं दिसतं, तसेच दूसऱ्या फोटोत ते संभाजी भिडे गुरूजी यांच्या सोबत चर्चा करताना दिसतात.

या फोटोंमुळे वंचित आघाडीचे उमेदवार हे संघाशी संबधित असल्याचं सांगण्यात आलं. तसेच ते संभाजी भिडे यांच्याशी संबधित असल्याच देखील सांगण्यात आलं. यापाठीमागे नेमकं काय आणि कोणतं राजकारण आहे हे पाहण्यासाठी सांगली जिल्हातील राजकारणात गोपीचंद पडळकर नेमके कुठे आहे? आणि सांगली जिल्ह्यातील राजकारणात त्यांच स्थान काय आहे हे पाहणं महत्वाच आहे. 

गोपीचंद पडळकर नेमके कोण ? 

एकच छंद गोपीचंद !

ही गोपीचंद पडळकरांची टॅगलाईन. गोपीचंद पडळकरांच राजकारण फोकसमध्ये आलं ते आर.आर. पाटील गृहमंत्री असताना. सुरवातीच्या काळात आटपाडी भागातल्या दुष्काळी पट्यातल्या मुलांना पोटापाण्याला लावणं, छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांच्या पाठीमागे उभा राहणं, हातगाडी सारख्या गोष्टी टाकायला मदत करणं या गोष्टी गोपीचंद पडळकर करत होते.

धनगर समाजाकडे तेव्हा आण्णा डांगे यांच नेतृत्व होतं. आण्णा डांगे राजकारणाच्या शेवटच्या टप्यात आल्याने आणि शेंगडे म्हणावे तितके सक्रिय नसल्याचा फायदा पडळकरांना मिळाला. तरुण असल्याने तरुणांच्या भावना त्यातही दुष्काळी पट्टा आणि धनगर समाज असा दुहेरी फायदा त्यांना ओळख मिळवून देवू लागला. त्यातही योग्य समस्या तरुणांच्या भाषेत मांडताना सत्ताधाऱ्यांना वाहण्यात येणारी शिव्यांची लाखोली देखील विद्रोहाची भाषा बोलू लागली.

मात्र आटपाडी परिसरात पडळकरांना म्हणावा तितका मोठा विरोधक नव्हता. पडळकरांनी आर.आर. आबांना विरोधक मानलं. आर. आर. आबांवरती ते सडकून टिका करत. बऱ्याचदा ही भाषा न ऐकण्यासारखी असायची. अशातच एक पोलीस केस झाली. त्यांना अटक करण्यात आलं. गोपीचंद सुटले तेव्हा सांगली ते आटपाडी मोठी मिरवणुक निघाली. आबा तेव्हा गृहमंत्रीच होते. संजय पाटील हे आर.आर. आबांचे विरोधक होते मात्र त्या काळात ते राष्ट्रवादी पक्षामार्फत देण्यात आलेल्या विधानपरिषदेत मश्गुल असायचे.

२०१४ साली मोदी लाट आली. आर.आर. आबांचे विरोधक संजय काका पाटील यांनी भाजपचा रस्ता पकडला आणि खासदारकीसाठी सज्ज झाले. शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त याप्रकारे कधीच नैसर्गिक नसणारी दोस्ती संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झाली. रासप मुळे गोपीचंद संजयकाकांसोबत प्रचारात सक्रिय झाले. प्रतिक पाटील हे फक्त एक औपचारिकता म्हणून उभा होते.

आर. आर. पाटील प्रतिक पाटलांसाठी दिवसाची रात्र करत होते. साहजिक विरोध हा आर.आर. आबांना करायचा होता. संजय काका पाटलांनी तो पेललाच आणि पडळकरांनी त्यामध्ये जान आणली. इतकी की मोदींच्या सांगलीत झालेल्या सभेत मोदी येईपर्यन्त पडळकरांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. 

निकाल लागला संजयकाका निवडून आले. काका भाजपमध्ये होते. नंतर विधानसभा लागल्या. संजयकाकांना आपलं वजन वाढवण्यासाठी आजपर्यन्त फक्त पदाची गरज होती. ती मिळाल्याने संजयकाका देखील फार्मात आले. पडळकर यांनी खानापूर आटपाडी मधून भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढली. खानापूर आटपाडी मधून सेनेच्या अनिल बाबर यांचा विजय झाला. 

आत्ता झालेलं अस की, सांगली जिल्ह्याचे भाजपचे मुख्य नेते म्हणून संजय पाटलांनी आपले हातपाय पसरवण्यास सुरवात केलेली. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप यांना मंत्रिपद न मिळण्यामागे काकांची भूमिका असल्याच्या भाजपमध्ये चर्चा चालू झाल्या होत्या. मुळचा कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पिंड असल्याने संजय काका भाजपमध्यले सत्ताधारी झाले होते. 

साल 2016 जानेवारी महिना. 

या वेळी सांगली जिल्ह्यातली परिस्थिती काय होती तर नेत्यांना लक्षात आलेलं आत्ता BJP पुढचे वीस वर्ष हालत नाही. या दरम्यान  पुण्यात शिवशक्ती संगम हा संघाचा कार्यक्रम होणार होता. संजय काका पाटील, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप अशा भाजप आमदारांची आणि नव्याने भाजपमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांची संघासोबत काही वैचारिक नाळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

वास्तविक सांगली जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीत क्रांन्तीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कॉंग्रेसी आणि तितक्याच कॉंग्रेसी, विद्रोही चळवळीमुळे सांगली जिल्ह्यात संघाचे अस्तित्व कमीच राहिलेलं आहे. त्यातही सांगली शहराचा काही भाग सोडता जिल्ह्यातल्या गावागावात संघ म्हणजे काय? याची माहिती देखील लोकांना नाही. 

साहजिक कालच पक्षांतर केलेल्या नेत्यांकडून संघाचे तत्वज्ञान पुढे घेवून जाण्यासाठी या कार्यक्रमाचे निमित्त पुढे करण्यात आले होते. या दरम्यानं इतर आमदार आणि खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे संघाचे कार्यकर्ते कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासोबतच संघाचा गणवेश देखील घेवून गेल्याची माहिती त्यांचे कार्यकर्ते रंगवून सांगत असतात.

मात्र सुधीर गाडगीळ यांच्याशिवाय इतर कोणताही आमदार, खासदार, नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले पदाधिकारी संघाशी संबधीत नसल्याने ते संघाच्या गणवेशात उपस्थित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता कमी होती. संजय काका पाटील यांनी साध्या पोशाखातच या कार्यक्रमाला उपस्थित राहल्याची माहिती मिळते. तर आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप यांनी संघाचा गणवेश परिधान केला नव्हता असे सांगण्यात येते. 

मात्र इथे मात्र आमदारकीची निवडणुक घालवलेले गोपीचंद पडळकर संघाच्या गणवेशात उपस्थित होते. त्या त्या परिस्थितीत राजकीय पोकळी साध्य करणारे पडळकर आत्ता भाजपसोबत अगदी पोशाखापासून जुळवण्याच धोरण आखत होते, हे सत्यच आहे. 

आत्ता राहिला प्रश्न शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सोबत असणाऱ्या संबंधांचा तर प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत संभाजी भिडे यांचे चांगले संबध आहेत, किंबहूना सांगली जिल्ह्यातील युवकांच संघटन पाहता प्रत्येक नेत्याने त्यांना कधीच नाराज न करण्याचे धोरण अंगीकारलं आहे. म्हणूनच जयंत पाटील, स्व.आर.आर.आबा, प्रतिक पाटील यांच्यासोबत संभाजी भिडे गुरूजी यांचे चांगले संबंध राहिले आहेत. त्यापद्धतीचे संबंध पडळकर आणि संभाजी भिडे यांचे आहेत.

इथे मुद्दा मात्र उपस्थित होतो की, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे संभाजी भिडे यांना विरोध करत असताना, त्यांना पडळकरांचे मैत्रीपुर्ण संबध तपासण्याची काळजी घेतली नसावी का? जरी त्यांनी घेतली असेल तर हे सांगली आहे, गावागावात चालत अस म्हणून त्यांनी हे सामंजस्य मान्य केलं असावं का? 

या सर्व राड्यात पडळकरांना नेमके कुणाचे म्हणून पहायचे झाले तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या राजकारणाच्या स्टाईलमध्ये. एक मोठा विरोधक पकडून त्यावर टिका करणे, प्रसंगी खालच्या भाषेचा उपयोग करणे हे त्यांच्याकडून होतंच शिवाय समाजातील एक “नाहीरे” वर्गाच्या भावनांना वाट देखील मोकळी करून देण्याच काम करण्यात येतं.

पडळकर संघाचे आहेत का याचं उत्तर आज ते जेवढे वंचित आघाडीचे आहेत तेवढेच ते संघाचे आहेत यात मिळून जातं, असो, तसही सोयीचे राजकारण करण्यात काहीही गैर नसतं.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.