राजकारणात जसे मोदी-शहा तसे सिनेमात इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी..

एखादा व्यवसाय सुरू करायचा झाला तर आपण कोणत्यातरी माणसाला बरोबर घेऊन त्याला पार्टनर करतो. व्यवसाय सुरू होतो. जसजसे दिवस पुढे जातात तसं काहीतरी बिनसतं, मतभेद होतात आणि पार्टनरशीप तुटते. दोघांचे मग पुढे वेगळे मार्ग होतात.

अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहिली आहेत.

परंतु सिनेक्षेत्रातील एक पार्टनरशीप इतकी टिकली की दीर्घकाळ टिकणारी पार्टनरशीप म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

या दोन व्यक्ती म्हणजे,

इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी.

तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की या दोन माणसांमध्ये इतकं काय विशेष आहे.

तर या दोघांपैकी इस्माईल मर्चंट हे भारतीय आहेत. तसेच १९६०-७० मध्ये भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं मोठं श्रेय या दोघांना जातं. जगभरातील लोकांचा भारतीय सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोघांनी बदलला. जवळपास ४० वर्ष हे दोघे सिनेमा निर्मितीमध्ये सक्रिय होते.

सुरुवात कशी झाली ?

इस्माईल मर्चंट यांचं मुळ नाव इस्माईल नुर मुहम्मद अब्दुल रेहमान. कट्टर मुस्लिम घरात २५ डिसेंबर १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. मर्चंट ज्यावेळी जन्माला आले तेव्हा भारताचं वातावरण राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिर होतं.

अशा वातावरणात पाश्चात्त्य संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्राकडे मर्चंट यांचा अधिक ओढा होता. त्यावेळी निम्मी ही अभिनेत्री बॉलिवुड गाजवत होती. तिची आणि मर्चंट यांची ओळख झाली. निम्मीने पुढे मर्चंट यांना जागतिक सिनेमा आणि रंगभूमीशी ओळख करून दिली.

यामुळे वयाच्या २० व्या वर्षी मर्चंट यांना सिनेमा निर्मितीविषयी कुतूहल जास्त वाढले. याचदरम्यान बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. इथे आल्यावर त्यांनी स्वतःचं लांबलचक असं मुळ नाव बदलून इस्माईल मर्चंट हे नाव ठेवलं.

आणि इस्माईलला मिळाली जेम्स आयव्हरीची साथ

१९५९ साली ‘द स्वाॅर्ड अँड द फ्ल्यूट’ या नावाची डॉक्युमेंट्री जेम्स आयव्हरीने बनवली होती. ही डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी मर्चंट गेले असता त्यांची जेम्सशी ओळख झाली. दोघांनाही सिनेमाविषयी प्रचंड प्रेम होतं. यामुळे दोघांची मैत्री आणखी वाढली. सिनेमाच्या प्रेमाखातर १९६१ साली त्यांनी ‘मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन’ ची स्थापना केली.

मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एकत्र येणं सोप्पं असतं पण ते टिकवणं कठीण. परंतु मनोरंजन क्षेत्रातील या दोघांची पार्टनरशीप ४४ वर्ष टिकली. २००५ साली मर्चंट यांचं निधन झालं म्हणून दोघांची ही पार्टनरशीप आपसूक तुटली. ४४ वर्ष चालणाऱ्या या पार्टनरशीपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

• दोघांनी बनवलेले सिनेमे

‘मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन’ अंतर्गत दोघांनी जवळपास ५० सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या सिनेमांनी मिळून ३१ वेळा ऑस्कर मध्ये नामांकन मिळवले आणि ६ वेळा ऑस्कर पटकावला. त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे १९६३ साली आलेला ‘द हाऊसहोल्डर’. या सिनेमात शशी कपूर आणि लीला नायडू यांनी काम केलं होतं. हा सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षकांना प्रचंड आवडला.

या सिनेमामुळे या दोघांसोबत रुथ झाबवाला ही लेखिका जोडली गेली. या दोघांनी निर्मिती केलेल्या जवळपास १२ सिनेमांच्या पटकथा लेखनाची जबाबदारी रुथ झाबवाला यांनी सांभाळली. तसेच शशी कपूर आणि कपूर कुटुंब हे ‘मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन’चे जणू आधारस्तंभ होते.

‘मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन’ अंतर्गत १९८५ साली आलेल्या ‘अ रुम विथ अ व्ह्यू’ आणि १९९३ साली आलेल्या ‘हॉवर्डस् एंड’ या सिनेमांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची कथा आणि त्यांना येणाऱ्या समस्या हे या दोघांच्या सिनेमांचे विषय असायचे.

• मैत्रिपलिकडे असणारं दोघांचं नातं

एकमेकांसोबत काम करताना मर्चंट आणि जेम्स एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघांनी कधीही याची वाच्यता केली नाही. २००५ साली मर्चंट यांचं निधन झाल्यावर जेम्स आयव्हरी यांनी त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला.

ते एका मुलाखतीत म्हणाले,

“भारतीय मुस्लिम घरात वाढलेल्या मर्चंटला ही गोष्ट सांगणं अशक्य होतं. कारण मर्चंट अशा भारतीय मुस्लिम समाजातून येत होता जिथे अशा नात्याचा स्वीकार करणं, ही फार अवघड गोष्ट होती. त्यामुळे आम्ही जरी एकत्र राहिलो असलो तरीही आम्ही त्याचा कुठे गवगवा केला नाही.”

आपल्या पार्टनरला त्रास होऊ नये म्हणून तो हयात असताना दोघांनी एकमेकांच्या नात्याविषयी पाळलेलं मौन, या दोघांमध्ये असलेल्या समजूतदारपणाची आणि गहिऱ्या मैत्रीची साक्ष देतं.
तर ही होती, ४४ वर्ष पार्टनर म्हणून राहिलेल्या इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांची कहाणी.

दोघांमध्ये असलेले मैत्रीचे बंध इतके घट्ट असल्यानेच एकाच्या मृत्यूपर्यंत ही पार्टनरशीप चालली.

  • देवेंद्र जाधव 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.