मिलिटरीकडे कुत्रे असतात हे माहितेय पण रशियाची नेव्ही डॉल्फिनचा वापर युद्धात करतीये

पोलीस असो की आर्मी एखादी गोष्ट शोधायची असेल की प्रशिक्षित कुत्र्यांच पथक बोलावला जातो. हे प्रशिक्षित कुत्रे वासाचा पाठलाग करून भल्याभल्या गोष्टींचा शोध घेतात. सर्वत्र जर्मन शेफर्ड कुत्र्यांच्या मदतीने देशात येणाऱ्या गाड्यांमध्ये बॉम्ब आहे की नाही हे सुद्धा शोधलं जातं.

पण कुत्र्यांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. कारण जमिनीवर उत्तम काम करणारे कुत्रे पाण्यात निरुपयोगी ठरतात. मग पाण्यात शत्रूंचा शोध कसा घ्यायचा, काय करायचं? तर पाण्यामध्ये कुत्र्यांच्या जागी डॉल्फिन्सचा वापर करायचा… ही शक्कल लढवली आहे ती या दोन देशाने.  

दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या आर्मीने रशिया आणि क्रिमियाला जोडणारा पूर बॉम्ब टाकून उडवला. या घटनेनंतर रशियाच्या मिलिटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिलिटरी डॉल्फीन्सची चर्चा होतेय. या मिलिटरी डॉल्फिन्स समुद्राच्या आत खाणी शोधण्यापासून शत्रूची हेरगिरी करण्यापर्यंत बरीच कामं करतात.

पण छुप्या पद्धतीने डॉल्फीन्सचा मिलिटरीमध्ये वापर करण्यावरून अनेकदा रशियावर आरोप सुद्धा झालेले आहेत.

रशियाकडून सीरिया आणि युक्रेनच्या सीमेवर डॉल्फिन्सचा वापर केला जातोय. गुप्तपणे या डॉल्फीन्सची मदत  रशियन नेव्हीत करत असल्याचा आरोप रशियावर होतोय. व्लादिमिर पुतीन हे स्वतः गुप्तहेर असतांना त्यांचा डॉल्फीन्सच्या वापरावर खास मत होतं. त्यामुळेच २०१४ पासून रशियात मिलिटरी डॉल्फिनसचं पुनरुज्जीवन करण्यात आलंय. 

वेळोवेळी घेतलेले सॅटेलाईट फोटो आणि हेरगिरी करणाऱ्या यंत्रणांनी रशियाकडून डॉल्फीन्सचा वापर होतोय हे सिद्ध केलेय. रशिया आर्क्टिक महासागर, भूमध्य समुद्र आणि काळ्या समुद्रात असलेल्या नाविक तळांवरून डॉल्फिन आणि ब्लुगा व्हेलचा वापर करतोय. डॉल्फिन्ससाठी बनवण्यात आलेल्या विशिष्ठ प्रकारच्या कॅप्सुलच्या फोटोंमधून हे समोर आले आहे.

पण आरोप होत असतांना सुद्धा रशिया स्वतःच्या नेव्हीमध्ये डॉल्फिनसचा वापर करतोय. कारण सर्व समुद्री प्राण्यांमध्ये डॉल्फिन ही सगळ्यात जास्त बुद्धिमान जलचर आहे.

यात डॉल्फीन्सचे काही वैशिष्टय आहेत त्यामुळे अवघड कामं सुद्धा अगदी सहजतेने पूर्ण होतात. 

१) समुद्रात दडलेल्या खनिजांच्या खाणी शोधण्यासाठी डॉल्फीन्सचा वापर केला जातो. 

डॉल्फीन्सला प्रामुख्याने समुद्रातील खाणींचा शोध घेण्यासाठीच ट्रेन करण्यात येते. यामुळे समुद्राच्या तळाशी असलेली दुर्मिळ खनिजं यांच्या जवळ गेल्यानंतर जेव्हा याची माहिती डॉल्फिनला मिळते. तेव्हा डॉल्फिन स्वतःच्या ट्रेनरजवळ परत येते आणि त्याच्या जवळ असलेल्या विशिष्ट बॉल्सला स्पर्श करते. तेव्हा ट्रेनर डॉल्फिनला एक साऊंड ट्रान्सपाउंडर किंवा टॅग करण्याची वस्तू देतो.

ती वस्तू घेऊन डॉल्फिन शोधलेल्या जागेवर खून करते आणि परत येते. या खुणेच्या आधारावरच त्या जागेचा शोध घेतला जातो आणि त्यावर संशोधन केलं जातं.

२) डॉल्फिन्स या समुद्रात लक्ष ठेऊन हेरगिरी करू शकतात. 

पाणबुड्यांना शत्रूराष्ट्राच्या सीमेत जाण्याची परवानगी नसते. मात्र डॉल्फिन्स कोणत्याही पाण्यात जाऊ शकतात. शत्रू राष्ट्राच्या पाणबुड्या आणि जहाज कुठे आहेत याचा शोध घेणे, गुप्तपणे त्याची माहिती गोळा करणे हे काम डॉल्फिन अगदी सहजतेने पूर्ण करते. यासाठी डॉल्फिनच्या पंखांवर विशेष प्रकारचे कॅमेरे लावले जातात. 

३) समुद्रात हरवलेल्या महत्वाच्या वस्तू शोधण्यासाठी डॉल्फीन्सचा वापर होतो. 

जेव्हा मिलिटरीचे किंवा सिविल जहाजाच्या महत्वपूण वस्तू समुद्रात पडून हरवतात तेव्हा त्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी डॉल्फीन्सचा वापर केला जातो. वेगवगेळ्या पद्धतीचे उपकरण शोधण्याचं आणि त्या वस्तू कुठे आहेत हे सांगण्याचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.

४) डॉल्फिन्स शत्रू राष्ट्राच्या घुसखोरांचा शोध घेतात. 

डॉल्फिन्स रात्रीच्या अंधारात आणि कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत शत्रू राष्ट्राच्या घुसखोरांना बघू शकतात. एखादा अनोळखी व्यक्ती समुद्री सिमेत घुसलेला आहे अशी माहिती डॉल्फिनला कळते. तेव्हा डॉल्फिन ती सगळी माहिती खुणांच्या आधारे तिच्या हॅन्डलरला देत असते. याच माहितीवरून नेव्ही घुसखोरांना पकडण्याचं काम करते. 

५) सगळ्यात महतवाची गोष्ट म्हणजे डॉल्फिनचं वैशिष्ठ्य.

आजपर्यंत जेवढ्या समुद्री जीवांवर संशोधन झालंय त्यात सगळ्यात जास्त संशोधन एकट्या डॉल्फिनवर झालंय. डॉल्फिनचं आयुष्य साधारणपणे ५० वर्षांचं असतं त्यामुळे तिला एकदा ट्रेन केलं की दीर्घ काळासाठी तिचा वापर केला जाऊ शकतो. डॉल्फिनमध्ये व्यक्तींना ओळखण्याची क्षमता असते म्हणून डॉल्फिन स्वतःच्या देशाच्या सैनिकांमध्ये आणि शत्रू राष्ट्राच्या सैनिकांमध्ये फरक ओळखू शकते.

डॉल्फिन अगदी खोलवर आणि गढूळ पाण्यात सुद्धा बघू शकते. डॉल्फिनकडे वस्तूंना वासाच्या आधारावर ओळखण्याची क्षमता असते. शत्रूला पाणबुड्यांप्रमाणे डॉल्फिनचा शोध घेता येत नाही त्यामुळे डॉल्फिनचा वापर नेव्हीमध्ये केला जातो. या गुणवैशिष्ठ्यांमुळे रशियन नेव्हीत डॉल्फिनचा वापर केला जातो. 

रशियावर आक्षेप असले तरी मिलिटरीमध्ये डॉल्फीन्सचा वापर रशियाने नाही तर अमेरिकेने सुरु केलाय.

जेव्हा अमेरिका आणि सोव्हियत युनियनमध्ये शीतयुद्धाची सुरुवात झाली, तेव्हा १०६० च्या दशकात सर्वप्रथम अमेरिकन नेव्हीने डॉल्फीन्सचा मिलिटरीच्या वापर सुरु केला. अमेरिकन सैन्याने सुरुवातीला समुद्रातील खाणी आणि डुबणाऱ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी या डॉल्फीन्सचा वापर करायला सुरुवात केली. मात्र हळूहळू या डॉल्फिनसचा वापर युद्धात सुद्धा करण्यात आलाय.

१९५५ ते १९७० दरम्यान चाललेलं अमेरिका व्हिएतनाम युद्ध, १९९१-९२ दरम्यान चाललेलं खाडीचं पहिलं युद्ध तसेच २००३ ते २०११ दरम्यान ८ वर्ष चालेल्या खाडीच्या दुसऱ्या युद्धात सुद्धा अमेरिकेने डॉल्फीन्सचा वापर केला होता. यात हेरगिरी करणे, पाणबुड्यांची माहिती देणे आणि तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यात डॉल्फीन्सचा वापर करण्यात आला होता. 

अमेरिकन नेव्हीत असणाऱ्या डॉल्फीन्स प्रामुख्याने मेक्सिकोच्या आखातातून घेतल्या जातात. त्यांना सॅन डिॲगोमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. बिग थिंकच्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला अमेरिकन नेव्हीत ७० डॉल्फिन्स आहेत. एवढचं नाही तर जगातील सगळ्यात मोठा डॉल्फीन्सचा ताफा हा अमेरिकेकडे आहे. यावर अमेरिकेकडून दरवर्षी लाखो डॉलर खर्च केले जातात.

पण अमेरिका असो की रशिया या दोन्हीकडून नेव्हीत डॉल्फिनचा वापर करण्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत.

अमेरिकेने १९६० च्या दशकात डॉल्फीन्सचा वापर सुरु केला होता. मात्र १०९० च्या दशकापासून सोव्हियत युनियनने सुद्धा डॉल्फिनसचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ इराण आणि उत्तर कोरिया सुद्धा नेव्हीत डॉल्फीन्सचा वापर करतेय असे आरोप केले जातात.

पण नेव्हीत वापरल्या जाणाऱ्या या डॉल्फिन्स समुद्रातून आणल्या जातात आणि नेव्हीच्या वापरात लावल्या जातात. यामुळे या बुद्धिमान प्राण्याचा गैरवापर केला जातो आणि डॉल्फिनला तिच्या नैसर्गिक अधिवासाऐवजी कृत्रिम आणि धोकादायक ठिकाणी ठेवण्यात येते यामुळे यावर आक्षेप घेतले जातात. पण अमेरिकेकडून उघडपणे वापरल्या जाणाऱ्या डॉल्फिन्स रशियाकडून लपून वापरल्या जातात त्यामुळे रशियावर याबाबत जास्त आरोप होतात.

२०१४ साली रशियन सरकारने सिव्हिल युनियनच्या धर्तीवर पुन्हा एकदा डॉल्फीन्सचं नेव्हीत पुनरुज्जीवन करत असल्याची माहिती दिली होती. त्यासाठी रशियन नेव्हीने ५ डॉल्फिन्स खरेदी करण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडला होता. यात ३ ते ५ वर्षाच्या दरम्यान वय असलेल्या आणि दात पूर्ण झालेल्या २ मादी डॉल्फिन्स आणि ३ नर डॉल्फिन्स खरेदी कारण्यासंबंधी पत्रक वेबसाईटवर प्रकाशित केलं होतं.

डॉल्फीन्सबरोबरच सी लायन आणि ब्लुगा व्हेल यांचा सुद्धा वापर केला जातो.

अमेरिकन नेव्ही डॉल्फिनसोबत सी लायनला सुद्धा ट्रेन करून त्यांचा वापर नेव्हीत करते. तर २०१७ मध्ये उत्तर ध्रुवाच्या समुद्रात रशिया हेरगिरीसाठी डॉल्फिनच्या परिवारातील ब्लुगा व्हेलचा वापर करत असल्याचे आरोप झाले होते. मात्र रशियाने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. 

अमेरिकन नेव्ही डॉल्फिनच्या जागी सागरी ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र डॉल्फिनकडे नैसर्गिकरित्या ज्या क्षमता आहेत. त्या क्षमतांच्या जवळपास सुद्धा हे ड्रोन पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात सुद्धा डॉल्फिनाचा वापर नेव्हीत थांबणार नाही असं पर्यावरणप्रेमी सांगतात. पण आरोप कोणत्याही प्रकारचे असोत डॉल्फिनाचा वापर नेव्हीत अजूनतरी कायम राहील अशीच चिन्ह आहेत.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.