म्हणून जगोबादादा तालमी मंडळात पहिल्या आरतीचा मान इमामभाईं यांना असतो…

स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिशांना या देशातून घालवून देऊन देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणणे हे सर्व भारतीयांचे ध्येय होते. प्रत्येक जण निरनिराळ्या मार्गाने हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील होते. भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाचा मार्ग अवलंबला. या उत्सवातून भारतीय जनता ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास एक होऊ शकते, असा आत्मविश्वास हा गणेशोत्सव सुरु करण्याचा मागचा हेतू होता. पुणे शहर यामध्ये अग्रेसर होते.

त्यात पुणे आणि पुण्यातील तालीमी हे एक वेगळेच समीकरण आहे. पुण्याची संस्कृती, स्वातंत्र्यकाळातील लढा, सामाजिक आणि जातीय सलोखा आणि पुण्याचा गणपती उत्सव यामध्ये तालमींचा सहभाग वाखाण्याजोगा आहे. विविध गणेशोत्सव मंडळांना,गणपतीला तालमीची व पहिलवानांची नावे आहेत. उदा. दगडूशेठ हलवाई गणपती, गुरुवर्य शिवराम दादा तालीम मंडळ, लोखंडे तालीम मंडळ, फणी आळी तालीम मंडळ, इत्यादी. अश्याच एका तालमीतल्या गणेशोत्सवास भेट देऊया.

गुरुवर्य जगोबादादा तालीम ही पुण्यातील अगदी जुन्या तालमींपैकी एक तालीम. १८३४ मध्ये या तालमीची स्थापना झाली होती. जगोबादादा हे जुन्या काळातील पुण्यातले प्रसिद्ध मल्ल. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेले जगोबादादा हे पुण्यातली आघाडीचे मल्ल होते. वस्ताद जगोबादादांनी आपल्या हयातीत अनेक मल्ल तयार केले होते. दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या नावाने ओळखला जातो ते पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती पहिलवान दगडूशेठ हलवाई हे जगोबादादा यांचेच शिष्य.

वस्ताद जगोबादादा हे शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. त्यांनी आयुष्यभर लाल मातीची सेवा केली. त्यांनी तयार केलेल्या कित्येक मल्लांपैकी स्वातंत्र्यसैनिक तयार झाले.

शिवाजी महाराज रस्त्यावर श्रीनाथ टॉकीजच्या बाहेर या तालमीचा गणपती बाप्पा आहे. १९४४ साली या तालमीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. गणेशोत्सवामार्फत सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यक्रमात सहभाग म्हणून हा गणेशोत्सव सुरू करण्यात आला.

या मंडळाची गणपतीची मूर्ती दशभुजा अवतारातील आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती करणारे प्रसिद्ध मूर्तिकार नागेश शिल्पी यांनी घडविलेल्या काही मूर्ती पैकी ही एक मूर्ती आहे. तब्बल दोन वर्ष ही मूर्ती बनविण्याचे काम चालू होते. चंद्रग्रहणात दीड फूट लांबी रुंदीचे पंचधातूचे यंत्र मूर्तीच्या पोटात बसविण्यात आलेले आहे. या मूर्तीचे डोळे काचेचे आहेत व ते डोळे बसविण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला होता.

आणि या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे इमामभाई मोहसीन खान हे ४२ वर्षे या मंडळाचे अध्यक्ष होते.

इमामभाई हे याच भागातील एक कापड व्यावसायिक. त्यांच्यावर प्रभाकरशेठ वाघुलकर यांनी अध्यक्ष हो म्हणुन जबाबदारी टाकली. नाव इमाम असल्यामुळे सुरवातीला ते घाबरले पण नंतर त्यांनी हा धनुष्य तब्बल ४२ वर्षे पेलला. ते नियमित गुलाब पाण्याने गणपतीस अंघोळ घालत असे. इमामभाईं गणपतीची स्वतः आरती करत व म्हणत. उत्सवात ते दहा दिवस रात्रभर गणपतीपाशी बसत.

इमामभाई आणि अनेक कार्यकर्त्यांनी मिळून गणपतीसाठी सोन्याचा एक किलोचा हार केलेला आहे. सर्वजण प्रेमाने त्यांना ‘डॅडी’ म्हणत. आज इमामभाई ९० वर्षाचे आहेत. अजूनही मंडळात पाहिल्या आरतीचा मान इमामभाईं यांना असतो.

हे मंडळ वर्षभर विविध समाजप्रबोधन उपक्रम राबवत असते. खासकरुन बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी कोरोना काळात अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिर, प्लाझमादान असे विविध कार्यक्रम राबवले होते.

  • कपिल जाधव

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.