भारतातील जगत सेठ घराणं इतकं श्रीमंत होतं की ते इंग्रजांना कर्ज द्यायचं….

जेव्हा जेव्हा इतिहास चाळवला जातो तेव्हा एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं ते म्हणजे भारतातून सोन्याचा धूर निघायचा. भारताला सोने की चिडीया असं सुद्धा म्हटलं जायचं. ब्रिटिशांनी राज्य करण्यापूर्वी सोन्या नाण्याने भारत संपन्न होता. राजे रजवाड्यांपासून ते मुघलांपासून सगळ्यांकडे तुफ्फान पैसा होता. दूरदूर पर्यंत भूकबळीची चिन्ह नव्हती.

1700 च्या शतकातील ही गोष्ट. भारतात एका अशा परिवाराचा उदय झाला ज्याने भारतामध्ये पैशांचा व्यवहार, टॅक्स वसुली या गोष्टींना सोपं करून एक नवा आयाम घालून दिला होता. या परिवाराकडून इतका पैसा होता की ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या परिवाराकडून लोन घ्यायची आणि आर्थिक व्यवहार हाताळायची. तर तो परिवार होता जगत सेठ घराणा.

जगत सेठ कोण होते ? तर जगत सेठ म्हणजे बँकर ऑफ द वर्ल्ड ही पदवी फतेह चंदला दिली होती मुघल बादशहा मोहम्मद शहाने 1723 साली. यानंतर या परिवाराला सगळीकडे जगत सेठ म्हणून ओळख मिळू लागली.

तुम्ही सेठ माणिकचंद हे नाव ऐकलच असेल तर ते सेठ माणिकचंद या सेठ घराण्याचे संस्थापक होते. हे घराणं त्या काळातील सगळ्यात श्रीमंत घराणं होतं.

17 व्या शतकात माणिकचंद यांचा राजस्थानमध्ये एका मारवाडी परिवारात हिरानंद साहू यांच्या पोटी जन्म झाला. काहीतरी नवीन करायचं या भावनेने हिरानंद बिहारला गेले. पटनामध्ये हिरानंद यांनी मिठाचा उद्योग सुरू केला. या उद्योगातून त्यांनी अफाट पैसा कमावला. इतका पैसा त्यांच्याकडे होता की ईस्ट इंडिया कंपनीला ते उधार देत असे.त्यांच्यासोबतच त्यांनी आर्थिक व्यवहाराचा घाट सुद्धा घातला.

माणिकचंद यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय सर्वदूर पसरवला आणि नव्या जगात पाऊल टाकलं. यात पैसे व्याजाने देणे हेसुद्धा एक प्रकरण होतं. लवकरच माणिकचंद यांची मैत्री बंगालचे दिवाण मुरशीद कुली खान यांच्यासोबत झाली. पुढे जाऊन ते बंगाल राजवटीचा आर्थिक व्यवहार सांभाळू लागले. यानंतर माणिकचंद यांचा सगळा परिवार बंगालमध्ये राहायला आला.

माणिकचंद यांच्यानंतर घराण्याची जबाबदारी ही फतेह चंद यांच्यावर आली. फतेह चंद यांनी घराण्याचं नाव भारतभर पोहोचवलं. ईस्ट इंडियासोबत व्याजाचा व्यवहार त्यांचा मोठ्या प्रमाणात चालायचा.

रॉबर्ट ओर्म लिहितो की मुघल राजवटीत एक हिंदू व्यापारी परिवार सगळ्यात श्रीमंत होता आणि त्याच्या प्रमुख माणसाचा बंगालमध्ये जबरदस्त दबदबा होता.

या घराण्याची तुलना बँक ऑफ इंग्लंड सोबत केली जायची. हे घराणं नवाबासाठी कोषाध्यक्ष म्हणून काम पाहयचं. नाण्यांची टाकसाळ होती आणि त्यातून ते चलन बनवायचे. सेठ माणिकचंद हे त्याकाळात 2 हजाराची सेना आपल्यासोबत बाळगायचे. बंगाल, बिहार आणि ओडिसामधून त्यांची मोठी आर्थिक उलाढाल व्हायची.

जगत सेठ घराण्याकडे किती पैसा होता याचा अंदाज कुणाला लावता यायचा नाही पण लोकं तेव्हा म्हणायची की जगत सेठ सोन्या चांदीच्या भिंती बनवून गंगा अडवू शकतात.

फतेह चंदच्या काळात 10 कोटी पौंड इतकी संपत्ती या घराण्याकडे होती. ब्रिटिश दस्तऐवजांमध्ये असं वर्णन आहे की जगत सेठ घराण्याकडे इतका पैसा होता की बँक ऑफ इंग्लंड त्यांच्यापुढे काहीच नाहीए.

पण मग हे घराणं गायब कसं झालं ? नवाब सिराजउद्दौला याने जगत सेठकडे 1750 साली 3 कोटी रुपये मागितले होते पण जगत सेठने नकार दिला आणि नवाबाने एक कडक त्यांच्या कानफटात हाणली.

जगत सेठ या अपमानाने पिसाळला आणि त्याला आपल्या धनाची काळजी वाटू लागली. सिराजउद्दौला गादीवरून हटवण्यासाठी प्लासीच्या लढाईत 1757 साली जगत सेठने इंग्रजांना आर्थिक पाठबळ दिलं आणि सिराजउद्दौलाचा पराभव झाला. पण 1764 मध्ये राजद्रोहाचा आरोप जगत सेठ घराण्यावर लागला आणि नवाब मीर कासीमने त्यावेळच्या जगत सेठ घराण्यातील मेहताब रॉय आणि स्वरूप चंदला गोळ्या घातल्या.

नंतर मात्र जगत सेठ घराणं गायब होत गेलं आणि ब्रिटिश साम्राज्य भारतात वाढत गेलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.