हा भिडू सारखं सारखं क्रिकेटच्या मैदानात का घुसतो ?

हा एकदम गली क्रिकेटसारखा सिन झाला म्हणायचा, म्हणजे आपण आपले पोरं मिळून खेळत असतो आणि अचानक कोणतरी येतं आणि म्हणत कि भाई एक बॉल खेळू दे रे, प्लेड करतो. पण नंतर तेच टाईमपास करत बसत, खेळणारे आणि पाहणारे दोघेही वैतागतात. असाच एक सिन झालाय भारत आणि इंग्लंडच्या मॅचमध्ये. चालू मॅचमध्ये घूसून स्वतःच प्रमोशन करणारा एक भिडू आहे जार्वो.

या जार्वोने सगळ्या खेळाडूंचं, क्रिकेट कॉमेंटेटर लोकांचं आणि अंपायरचं डोकं उठवलंय. स्वतःला भारतीय संघाचा फॅन सांगणाऱ्या या जार्वोने सगळी मेहफिल लुटली आहे. ६९ नंबरची जर्सी घालून मैदानात एकदम थाटात हा जार्वो प्रवेश करतो आणि मग त्याला मैदानाची सेक्युरिटी बघणारे पोलीस उचलून नेतात. भारताचा फॅन म्हणून तो मैदानात घुसण्याचा फंडा अवगत करत आहे. 

ओव्हलमध्ये सुरु असलेल्या भारत इंग्लंड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जार्वो पुन्हा एकदा मैदानात घुसला. दिवसाच्या पहिल्या सेशनला तो मैदानात दाखल झाला. इंग्लंडच्या इनिंगच्या ३४ व्या ओव्हरला तो मैदानात घुसला. यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. जार्वो ६९ याअगोदरही लॉर्ड्स आणि लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये असाच अचानक शिरला होता.

लीड्समधल्या मॅचमध्ये तिसऱ्या दिवशी तो मैदानात घुसला. पॅड, हेल्मेट आणि ग्लव्ज घालून तो मैदानात थेट बॅटिंगला उतरला होता. रोहित शर्माची विकेट पडली आणि लगेचच जार्वो मैदानात दाखल झाला. तो पिचवर येईपर्यंत कोणाचंही लक्ष नव्हतं कि तो जार्वो आहे. त्यानंतर त्याला सुरक्षा रक्षकांनी उचलून बाहेर नेलं.

जार्वो हा स्वतः एक प्रॅन्कस्टार असल्याचं सांगतो. याअगोदर तो फुटबॉल मॅचेसमध्येही अचानक गेल्याच सांगण्यात येतं. आणि हे चाळे करण्यात एक थ्रिल आहे आणि त्यातच खरा आनंद असल्याचं जार्वो म्हणतो. भारताच्या रविचंद्रन अश्विनने यासंबंधी एक ट्विट केलं होतं आणि जार्वोला अशी कृत्ये करु नको म्हणून समजही दिली होती. पण त्याचा काही उपयोग झालेला नाही.

त्याच्या या अशा प्रकारच्या घुसखोरीवर हर्ष भोगले, सुनंदन लेले यांनी राग व्यक्त केला आहे. असाच प्रकार चालू राहिला तर उद्या खेळाडूंच्या जीवाला धोकाही होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर मनोरंजन म्हणून एकवेळ हे ठीक आहे पण त्याच्या अशा वागणुकीमुळे खेळात व्यत्यय येतो आणि खेळाडूंच्या रणनीतीवर पाणी फेरल जातं.

या प्रकरणामुळे जार्वोवर कारवाई करण्यात आलेली आहे. हेडींगले मैदानात प्रवेश करण्यापासून त्याला आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे. या शिक्षेबद्दल जार्वोला दंड देखील ठोठावण्यात आला आहे. यॉर्कशायर क्रिकेट कौंटी क्लबने याला नियमांचं उल्लंघन मानलेलं आहे आणि लीड्स गॅलरीमध्ये प्रवेश देण्याची परवानगी जार्वोची नाकारली आहे. 

असले स्टंट करणारा जार्वो त्याच्या या प्रॅन्क प्रकरणामुळे सोशल मीडियावर तुफ्फान चर्चेत आहे. पण त्याचे हे बळजबरीचे प्रॅन्क खेळाडूंच्या जीवावर बेतू नये म्हणजे मिळवलं.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.