वर्ल्डवॉरच्या काळातला तो फोटो पुढे जपानमध्ये शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखला जाऊ लागला..

भारताचा सगळ्यात महत्वाचा फोटोग्राफर दानिश सिद्दीकी याचं निधन झालं, त्याच्या अनेक उत्तमोत्तम फोटोंमुळे तो चांगलाच लक्षात राहिला. असेच अनेक परिस्थितीचं गांभीर्य दाखवणारे दानिश सिद्दीकीचे फोटो जगभरात चर्चेचा विषय होते.

असाच एक फोटो जो ओ’डॉनेल काढला होता जो पुढे जपानमध्ये शक्तीचं प्रतीक म्हणून वापरला गेला. तर या फोटोमागे काय घटना घडली होती याबद्दल जाणून घेऊया. 

विश्वयुद्धाच्या काळात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेद्वारे बॉम्ब हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी झाली यात हिरोशिमा मध्ये १ लाख ४० हजार तर नागासाकीमध्ये ७४ हजार लोक मारले गेले. या काळात अनेक फोटो व्हायरल झाले होते मात्र एक फोटो जपानच्या शक्तीचा प्रतीक बनला.

या फोटोच महत्व विशेष होतं. या फोटोत १० वर्षाच्या जपानी मुलाने आपल्या लहान भावाचं प्रेत पाठीवर बांधलेलं होतं. या फोटोत तो मुलगा घट्टपणे आपले ओठ दाबून उभा आहे. तर हा फोटो पाहुन प्रश्न पडणे साहजिकच आहे कि हा मुलगा तिथे उभा राहून नक्की काय करतो आहे ? तो मुलगा आपल्या लहान भावाच्या अंत्यसंस्कारासाठी ओळीत उभा आहे.

हा ऐतिहासिक फोटो काढणारा फोटोग्राफर होता जो ओ’डॉनेल [ Joe O’Donnell ].

हा फोटो जेव्हा त्याने काढला तेव्हा त्याचं वय होतं २३ वर्ष. अमेरिकेने जपानवर केलेल्या हल्ल्याची बरीच छायाचित्र डॉनेलने काढली होती. जो ओ’डॉनेल हा मूळचा अमेरिकेचा फोटोग्राफर होता. त्याला हल्ल्यामध्ये किती नुकसान झालंय याची माहिती घेण्यासाठी अमेरिकी सैन्यासोबत जपानला पाठवण्यात आलं होतं.

डॉनेल तब्बल ७ महिने या हल्ल्याची माहिती एकत्र करत होता. याच वेळी त्याने तो ऐतिहासिक फोटोसुद्धा काढला होता. या हल्यात मारल्या गेलेल्या लोकांपासून ते जखमी झालेल्या लोकांची माहिती डॉनेल जमवत होता. या त्याने बेघर झालेल्या लोकांचा आणि अनाथ मुलांचा डाटाहि त्याने एकत्र केला. पण इतकी प्रचंड जीवितहानी बघून डॉनेल प्रचंड दुखी झाला.

त्याने काढलेल्या या फोटोबद्दल सांगताना तो म्हणतो कि,

या सगळ्या संग्रामात मी एका दहा वर्षाच्या मुलाला पाठीवर आपल्या लहान भावाचं प्रेत घेऊन उभं राहिलेलं पाहिलं, ज्या वयात मुलांना पाठीवर घेऊन खेळवायचं असत त्या वयात हा मुलगा पाठीवर प्रेत घेऊन उभा होता.

तो मुलगा शांतपणे उभा होता, त्याचा चेहरा निर्विकार होता. पाठीवर असलेल्या त्याच्या मृत भावाची मान खालच्या दिशेला झुकलेली होती. असं वाटत होतं ते बाळ गाढ झोपेत असावं.

नंतर तिथे एक सैनिक आला आणि त्या दहा वर्षाच्या मुलाला सांगितलं कि तुझ्या पाठीवर असलेलं ओझं माझ्याकडे दे. याला प्रत्युत्तर म्हणून तो मुलगा त्या सैनिकाला म्हणाला कि हे ओझं नाहीए हा माझा भाऊ आहे. नंतर त्याने ते प्रेत सैनिकाच्या ताब्यात दिलं. डॉलेनला सुद्धा तेव्हाच समजलं कि ते बाळ मेलेलं आहे. त्या सैनिकाने त्याला गुंडाळलं आणि पुढे त्याला अग्नी देण्यात आला.

डॉलेन याबद्दल सांगताना म्हणतो कि तो मुलगा डोळ्यातलं पाणी तसंच अडवून बराच वेळ उभा होता. दातांमध्ये त्याने ओठ दाबून धरलेले होते. त्याने ओठ इतके घट्टपणे दाबलेले होते कि त्याच्या ओठांमधून रक्त येत होतं. ज्यावेळी आग कमी होत गेली तेव्हा तो मुलगा काहीही न बोलता तिथून निघून गेला. 

डॉलेनने काढलेला तो फोटो पुढे ऐतिहासिक ठरला आणि जपानमध्ये शक्तीचं प्रतीक म्हणून मानला गेला. जपानमधल्या अनेक आंदोलन, मोर्च्यांमध्ये हा फोटो बरेचदा झळकला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.