बेबी पावडरची कंपनी ते कोरोना लस, असा आहे जॉन्सन अँड जॉन्सनचा १३२ वर्षांचा प्रवास

आजकाल ब्रॅण्डचा जमाना आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, गाड्या, मोठमोठ्या वस्तू घेताना प्रत्येकजण ब्रॅण्डच पाहतो. पणं कोणत्याही प्रकारात ब्रॅण्ड बननं इतकं सोपं नसतं, तो ब्रॅण्ड बनण्यामागं मेहनत असते, अनेक प्रोत्साहीत करणारी किस्से असतात.

दरम्यान, कोणत्याही उत्पादनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात टिकून राहणं. जितकी जास्त वर्ष तूम्ही चालता, तसा विश्वास तुमच्याबद्दल वाढत जातो. कारण एकच प्रकारची उत्पादन खूप असतात. त्यात ब्रॅण्ड तर ढिगाणं पडलीत. पण या स्पर्धेत जे आपल्या ध्येयावरुन मागे हटत नाही, आणि टिकून राहतात. त्याच ब्रॅण्ड्सना मेडल मिळतं.

असाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेला ब्रॅण्ड म्हणजे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन. जो तब्बल १३२ वर्ष जुना आहे. ज्यांनी बॅण्ड एड, जॉन्सन बेबी, क्लीन अ‍ॅण्ड क्लीअर या उत्पादनांच्या माध्यामातून घराघरात प्रवेश केलाय.

अशी आहे या ब्रॅण्डच्या सक्सेसची कहाणी..

१८८० च्या दरम्यान अमेरिकेतल्या न्यू जर्सीत रॉबर्ट वुड जॉन्सन, जेम्स वुड जॉन्सन आणि एडवर्ड मिड जॉन्सन हे तीन भाऊ मिळून सिबरी अ‍ॅण्ड जॉन्सन अशी कंपनी चालवत होते. या कंपनीत या भावंडाबरोबर अन्य व्यावसायिकांची देखील भागीदारी होती.

१८८५ मध्ये या तिन्ही भावांनी जोसेफ लिस्टर यांचं जंतुनाशक उपचारांबद्दलचं भाषणं ऐकलं. ज्यानं प्रभावित होऊन या तिघांनी वैद्यकीय व्यवसायासाठी तयार सर्जिकल ड्रेसिंगचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. सिबरी अ‍ॅण्ड जॉन्सनमधून बाहेर पडून त्यांनी ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनी स्थापन झाली. जुन्या व्यवसायातील काही करारांमुळे रॉबर्ट जॉन्सन उशिरा दोन्ही भावांना येऊन मिळाले.

जेम्स आणि एडवर्ड या दोघांनी कंपनीसाठी जागा शोधायला सुरुवात केली. त्या वेळी बून्सविक या छोट्या शहरातली एक रिकामी फॅक्टरी त्यांना मिळाली. तिथंच सुरुवात झाली जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या उद्योगाची.

या कंपनीत सुरुवातीला ८ स्त्रिया आणि ६ पुरुष अशी केवळ १४ कर्मचारी होते . त्या काळाचा विचार करता महिलांना नोकरीत प्राधान्य देण्याचा कंपनीचा निर्णय अर्थातच गौरवास्पद वाटतो. त्यामागची त्यांची भूमिका अशी होती की, हेल्थकेअर उत्पादनांच्या कंपनीत सगळ्या घराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्त्रियांचा समावेश जास्तीत जास्त असलाच पाहिजे.

१८८६ मध्ये कंपनीचं सर्जिकल ड्रेसिंगचं पहिलं उत्पादन बाहेर आलं. त्यानंतर बदलता काळ आणि मागणी पाहता कंपनीने एकापेक्षा एक उत्पादनं बाजारात आणली. तो काळ असा होता, जेव्हा स्त्रियांची बाळंतपणं घरीच व्हायचं. त्यात स्वच्छता नसल्यामूळं अनेक जणींचा बाळंतपणात मृत्यू व्हायचा . हेच डोक्यात ठेवून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचं मॅटर्निटी किट बाजारात आलं. त्याचबरोबर यूजर अँड थ्रोची डायपर्स आली.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या उत्पादनांत बेबी प्रोडक्टला जास्तच लोकप्रियता मिळाली.

१८९२ ची घटना आहे, एक दिवस जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनमधील उत्पादन तज्ज्ञ डॉ. फेड्रिक किल्म यांना ओळखीच्या एका डॉक्टरांचं पत्र आलं. छोटय़ा बाळांच्या नाजूक त्वचेवर उठणाऱ्या पुरळ वा चट्ट्या विषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. डॉ. किल्म यांनी त्यावर टॅल्कम पावडर वापरण्याचा तात्पुरता सल्ला दिला. पण त्यातून नवजात शिशूसाठी खास एखादी पावडर तयार करता येईल, असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि १८९३ मध्ये जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनची सुप्रसिद्ध जॉन्सन बेबी पावडर समोर आली.

सुरुवातीला ही जॉन्सन बेबी पावडर पिवळ्या आणि लाल डब्यात मिळायची. नंतर कंपनीने पांढरा, गुलाबी रंग निवडला. त्यानंतर बेबी लोशन, साबण, तेल अशी उत्पादनं येत गेली. १९५४ मध्ये जॉन्सन बेबीच्या बेबी शाम्पूला खूप लोकप्रियता मिळाली.

कंपनीच्या जाहिरातीतली पहिली जॉन्सन बेबी होती रॉबर्ट जॉन्सन यांची नात मेरी ली जॉन्सन-रिचर्ड. त्यानंतर वेगवेगळ्या उत्पादनांसाठी अनेक जाहिरात काढल्या गेल्या. त्यात बदलही करण्यात आले,पहिल्यांदा जाहिरातीत दाखवणारी ‘जॉन्सन कान्ट बर्न आईज’ ही टॅग लाइन बदलून ‘नो मोअर टीअर्स’ अशी करण्यात आली.

१९२० मध्ये कंपनीने नवजात मुलांसोबतच धावत्या-पळत्या वयोगटातील मुलांचा विचार करता सर्वात यशस्वी उत्पादन आणलं ते म्हणजे बॅण्ड एड. त्यामागचा किस्साही गमतीशीर आहे.

अल्रे डिक्सन हा कंपनीचाच एक कर्मचारी. रोजच्या कामात त्याच्या बायकोचा हात कापायचा तरी नाहीतर भाजायचा तरी. त्यामुळं डिक्सनने विचार केला की, अशी एखादी तयार मलमपट्टी करावी, जेणेकरून सतत होणाऱ्या या त्रासापासून सुटका होईल. तीच कल्पना त्याने जॉन्सन बंधूंना सांगितली. त्यानंतर सतत धडपडणारा छोटय़ा मुलांचा वर्ग समोर ठेवत जॉन्सन बॅण्ड एड आलं.

सुरुवातीला बॅण्ड एड हाताने बनवले जाई. १९२४ पासून ते यंत्रावर बनू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जॉन्सन बॅण्ड एड मोठ्या प्रमाणावर खपलं. पट्टीवर कार्टूनचा वापर करत हक्काचा बालवर्ग कंपनीने मिळवलाय.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन सर्वात जुन्या आणि विस्तारलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या २५० सबसिडी कंपन्या ६० देशांत कारभार करतात आणि या कंपन्यांची उत्पादनं जगभरातील १७५ देशांत पोहोचतात.

कंपनीची टॅग लाइन प्रत्येक उत्पादनानुसार बदलते. मात्र त्यांचा लोगो मात्र कायम तोच आहे. या लोगोचं वैशिष्ट्य म्हणजे जॉन्सन बंधूंपैकी जेम्स वुड जॉन्सन यांच्या सहीशी हा लोगो मिळताजुळता आहे.

ब्रॅण्ड म्हंटल की, काही ना काही चर्चा उटतेचं. मध्यंतरी अशीच अटकळं समोर आली होती. पण या सगळ्यावर मात करत हा ब्रॅण्ड ठामपणे उभा आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या अनेक उत्पादनांसारखी उत्पादनं बाजारात आली, पण जॉन्सन सारखी पकडं कोणीच बसवू शकलं नाही. आजही नवजात शिशूला पहिल्यांदा पाहायला जाताना जॉन्सनचा गिफ्ट बॉक्सच नेला जातो.

एवढंच नव्हे तर सध्याच्या कोरोना विरूध्दच्या लढाईत सुध्दा कंपनी लस घेऊन समोर आलीये. युके सरकारनं नुकताच जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सिंगल शॉट कोरोना लसीला परवानगी दिलीये. त्यामुळे युकेत आताही लस दिली जाणार आहे. अमेरिकेत झालेल्या लसीच्या ट्रायल्समध्ये लस 72 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं गेलंय.

ग्राहकाच्या अगदी लहान सहान गरजांचा विचार केल्यामुळं तब्बल १३२ वर्षानंतरही हा ब्रॅण्ड टिकून आहे. अनं सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतयं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.