कोल्हापूरकर म्हणाले, “इंदिराजी वो काळम्मावाडी का धोंडा बिठाया है उसका क्या हुवा ?”

कोल्हापूर म्हणजे रांगडी माती आणि अघळपघळ आपलेपणा. तांबडापांढरा रस्स्याचा भुरका मारत   तोंडावर शिवी हासडून प्रेम व्यक्त करणे फक्त कोल्हापूरकरांनाच जमतं. इथलं राजकारण देखील असंच. कधी आजवर कोल्हापूरचा नेता मुख्यमंत्री झाला नाही पण इथल्या जनतेचा विकास मात्र कधी थांबला नाही.

अशाच रांगड्या कोल्हापूरकरांचा एक किस्सा

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. आणिबाणीनंतरच्या जनता लाटेत सत्तेतून बाहेर गेलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी पुनरागमन केलं होतं. पंजाबचा खलिस्तानवाद्यांचा प्रश्न , आसाममधील फुटीरतावाद्यांची चळवळ असे अंतर्गत प्रश्नांनी डोके वर काढले होते. या प्रश्नांशी लढण्यात इंदिरा गांधी सरकार गुरफटून गेले होते. संजय गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी राजकारणात आले होते, त्यांची जम बसवण्यासाठी धडपड सुरु होती.

अशातच एकदा कोल्हापूरच्या गोकुळ डेअरीतून काही मंडळी स्वीडन,डेन्मार्क या देशातल्या दुग्धव्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी निघाली होती.

गेली पन्नास वर्षे गोकुळ सहकारी क्षेत्रातील असूनही हा भारतातला अग्रगण्य डेअरी उद्योगसमूह समजला जातो. याच्या उभारणी मध्ये सिंहाचा वाटा असणारे आनंदराव पाटील चुयेकर हे युरोपला शिष्टमंडळाचा भाग होते आणि सोबत बाळराजे नणदीकर, नानासाहेब कोरे व इतर काही मंडळी देखील होती.

त्यांची युरोपची फ्लाईट दिल्लीहून निघणार होती. जाण्यापूर्वी काही काळ ते दिल्लीदर्शनासाठी थांबले. कोल्हापूरचे तेव्हाचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्याशी त्यांची मैत्री होती. एकेदिवशी अगदी सकाळी हे तिघे गायकवाड यांच्या बंगल्यावर गेले. त्यांनी खासदारांच्या कडे हट्ट धरला कि आम्हाला पंतप्रधानांना भेटायचे आहे.

गायकवाड यांनी त्यांना समजावून सांगितले कि

पंतप्रधानांना भेटणे एवढे सोपे नसते. त्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात आणि त्यात सहसा बदल होत नाही. 

पण तरीही त्यांचा ठेका कायम होता. अखेर उदयसिंह गायकवाड यांनी इंदिराजींचे सल्लागार आर.के.धवन यांना फोन केला. त्यांना काहीही करून थोडा वेळ काढता येईल का याची विनंती केली. गायकवाड यांचे श्रेष्ठीच्या वर्तुळात चांगलेच वजन होते. अखेर धवन म्हणाले

एक परदेशी शिष्टमंडळ त्यांना भेटायला येणार आहे, त्यावेळी जमल्यास तुमचीही गाठ घालता येईल. तुम्ही त्या मंडळीना घेऊन ताबडतोब या.

उदयसिंह गायकवाड यांच्या सोबत आनंदराव चुयेकर, कोरे आणि नणदी कर हे इंदिराजींना भेटायला गेले. योगायोगाने त्यांची भेट देखील झाली. आपल्या कोल्हापूरकर मंडळींना इंग्रजी येत नव्हते पण त्यांचं हिंदी देखील यथातथाच होतं. इंदिराजी विचारपूस करत होत्या आणि हि मंडळी हो नाहीची उत्तरे देत होती.

तरीही आनंदराव चुयेकर यांना हुक्की आली. त्यांनी धाडस करून इंदिराजींना प्रश्न विचारला,

“माताजी, ओ काळम्मावाडी धरण है ना उधरका धोंडा आपने बिठाया लेकिन अभितक उधर कुछ नही हुआ. जरा जल्दी किजीये.”

आनंदराव यांनी मोडक्यातोडक्या हिंदीत विचारलेला प्रश्न ऐकून बाकीचे शांतच झाले. इंदिराजींना हा प्रश्न कळाला नसल्यामुळे त्यांनी खासदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. गायकवाड यांनी त्यांना काय म्हणायचे आहे ते समजावून सांगितले.

झालं असं होत कि सात आठ वर्षांपूर्वी १९७६ साली इंदिरा गांधी कोल्हापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांच्या हस्ते दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणाची पायाभरणी झाली होती. पुढे सरकारे बदलली, राज्यात व केंद्रात अस्थिरतेचं  वातावरण यामध्ये धरणाचे काम रखडले. राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आलेले हे धरण संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरणार होते. आणि आनंदराव चुयेकर यांनी हाच मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित केला होता.

इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या,

“महाराष्ट्र के सी.एम.बाबासाब भोसले आज आनेवाले है. उन से मै बात करती हुं .”

भेट इथेच संपली. इंदिराजींसोबत या नेत्यांनी फोटो काढला आणि त्यांच्या ऑफिसमधून ते बाहेर पडले. तिथून आल्यावर या मंडळींनी राजीव गांधी यांची देखील भेट घेतली. राजीव गांधी तेव्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. आनंदराव चुयेकर यांनी व इतरांनी काळम्मावाडीचा प्रश्न त्यांच्याही कानावर घातला. इंदिरा गांधींचे आणि राजीव गांधींचे याविषयावर यापूर्वी बोलणे झाले असावे.

योगायोगाने राजीव गांधींशी त्यांचं बोलणं सुरूच होत इतक्यात महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले तिथे आले. राजीव गांधींनी गायकवाड,चुयेकर,कोरे त्यांच्यासमोरच काळम्मावाडी धरणाविषयी विचारलं आणि युद्धपातळीवर धरण पूर्ण करण्याची आवश्यकता बोलून दाखवली.

वेगाने यावर कारवाई झाली आणि लगेचच काळम्मावाडी धरणाच्या कामास सुरवात झाली.

इंदिरा गांधी यांनी जनतेची नस कशी पकडली होती ते या एका प्रसंगावरून कळते. पण याबरोबरच आनंदराव पाटील चुयेकरांसारखे नेते कार्यकर्ते आपल्या प्रश्नांसाठी थेट पंतप्रधानांपर्यंत जाण्याएवढे आग्रही होते म्हणूनच कोल्हापूर भागाचा विकास कधी अडखळला नाही हे हि तितकेच खरे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.