वाजपेयींना हे दोन नकार ऐकून घ्यावे लागले, नाही तर आज भाजपची इमेज वेगळी असती..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारताच्या राजकीय गणितांनी प्रचंड वेगाने बदल घडवायला सुरवात केली होती. राम मंदिराच्या आंदोलनाने पेट घेतल्यापासून भाजपचा उदय होत होता. गांधी घराण्याच्या अनुपस्थितीत काँग्रेसची सद्दी संपली असं म्हटलं जात होतं. त्यांना पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या संयुक्त मोर्चाच्या आघाडीतून देवेगौडा, गुजराल असे पंतप्रधान देशाला लाभले होते.

पण तरीही सर्वात मोठा पक्ष बनला होता अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष. पण अजूनही सत्तेपासून ते दूर होते. १९९६ ला त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली होती मात्र इतरांनी पाठिंबा दिला नाही आणि अवघ्या १३ दिवसात त्यांचं सरकार कोसळलं.

याला मुख्य कारण म्हणजे भाजपची इमेज. 

भाजपला स्थापने पासून शेटजी, भटजीचा पक्ष म्हणूनचं ओळखले जायचं. लालकृष्ण अडवाणींच्या रथ यात्रेपासून भाजपला आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा मिळाला होता. यामुळे इतर पुरोगामी पक्ष त्यांच्यापासून फटकून असायचे. भाजप आपली इमेज सर्वसामावेशक बनवण्यासाठी अनेक प्रयोग करत होता. अटलजींकडे नेतृत्व यामुळेच सोपवण्यात आलं होतं.

यातूनच १९९७ साली उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत बसप- भाजपची आघाडी झाली. मायावती यांनी भाजपच्या पाठींब्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.

दलित आयडेंटिटी असलेला बहुजन समाज पक्ष भाजपच्या आघाडीत येणे हि मोठी घटना होती. मायावतींचे राजकीय गुरु बसपाचे सर्वेसर्वा कांशीराम या सगळ्याला कारणीभूत होते. जवळपास चाळीस वर्षे बहुजन व दलित चळवळीशी जोडले गेलेले कांशीराम हे महत्वाकांक्षी होते. मायावतींना त्यांनी राजकारणात आणलं आणि मुख्यमंत्री बनवलं. त्यांचे टार्गेट मोठे होते. यातूनच भाजप सोबत युती त्यांनी केली होती.

 साधारण याच काळात राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली.

केंद्रात संयुक्त मोर्चाचे सरकार होते. मात्र, त्यांना आपला उमेदवार निवडून आणणे सोपे नव्हते. त्यांना पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसकडून के. आर नारायण यांना उमेदवारी देण्यात आली होती.

यावेळी उत्तरप्रदेश मध्ये भाजप-बसपाच्या आघाडीच सरकार होत. दोन्ही पक्षाचे संबंधही चांगले होते. केंदात विरोधी पक्षात असणाऱ्या अटल बिहारी यांच्या डोक्यात आले कि, के. आर. नारायण दलित असून त्यांच्या विरोधी काशीराम यांना उमेदवारी दिली तर याचा फायदा होईल.

कांशीराम निवडून येण्याची शक्यता जास्त होती आणि याचा उपयोग भाजपला इतर मित्र पक्ष गोळा करण्यात होईल.

एक दिवस स्वतः अटल बिहारी वाजपेयी कांशीराम यांना भेटायला गेले. त्यांना आपल्या ऑफर बद्दल विचारणा केली. मात्र, काशीराम यांनी अटल बिहारी यांनी देवू केलेली राष्ट्रपतीची ऑफर धुडकावून लावली.

काशीराम यांना राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान व्हायचा होत

त्यांना माहीत होते भारतीय संसदीय प्रणालीत खरी सत्ता ही राष्ट्रपतीकडे नाही तर पंतप्रधान यांच्याकडे असते. काही अधिकार नसल्यामुळे फक्त आपल्याला शिक्क्याचा राष्ट्रपती करून शांत बसवण्यात येईल. म्हणून त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना ठणकावून सांगितले होते कि

मला राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान बनायचं आहे.

कांशीराम नेहमी एक नारा देत होते. ज्यांची जितकी संख्या जास्त. तेवढी त्यांची हिस्सेदार. त्यांचे लक्ष दलितांना सत्ता केंद्राचा केंद्रबिंदू बनवायचे होते. ते केवळ राष्ट्रपती बनून शांत बसणाऱ्यातील नव्हते. राजकीय विश्लेषकांच्या मते अटल बिहारी यांना काशीराम यांचा उद्देशचं कळाला नाही.

कांशीराम यांना देशातील दलित समाजाला उच्च स्थानावर न्यायचे स्वप्न होते.

राजकारणात येतांना काशीराम यांनी घरी एक चिट्ठी पाठवली होती. त्यात त्यांनी लिहिले होते, घरी परत कधीही येणार नाही. नवीन घर खरेदी करणार नाही. गरीब दलिताचे हेच माझे घर. नातेवाईकांपासून लांब राहीन. कोणाच्याही लग्नात, अंत्यसंस्कार आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील होणार नाही. कुठलीही नोकरी करणार नाही.

जो पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यत शांत बसणार नाही असे सांगून राजकारणात उतलेल्या कांशीरामांनी अटल बिहारी यांच्याकडून देण्यात आलेल्या राष्ट्रपती पदाची ऑफर धुडकावली होती.

भाजपची इमेज बदलण्याच्या नादात वाजपेयींना आणखी एक नकार ऐकून घ्यायला लागला.

ते होते मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम  

त्याकाळात इतर पक्ष भाजप अल्पसंख्याकांना सोबत घेवून जात नाही अशी ओरड करायचे. मुस्लिम विरोधी अशी त्यांची इमेज झाली होती. वर सांगितल्याप्रमाणे अटल बिहारी हे सर्वसमावेशक नेतृत्व करणारे होते. १९९८ साली त्यांचं सरकार निवडून देखील आलं मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करेल असा तगडा उमेदवार नव्हता.

अशातच वाजपेयींच्या डोळ्यासमोर एक नाव आलं ज्याला पक्षातून देखील विरोध झाला नसता आणि इतर मित्रपक्ष देखील खुश झाले असते. ते होते डॉ.अब्दुल कलाम.

आपल्या कामाच्या जोरावर अब्दुल कलाम जगभर मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण करत होते. आण्विक क्षेत्रात भारतातला ताकतवान करण्यासाठी ते झटत होते. नरसिंह राव यांच्याकाळापासून पंतप्रधानांचे विज्ञान विषयक सल्लागार म्हणून काम करत असलेल्या  डॉ.कलामांशी वाजपेयी यांचे चांगले संबंध होते.

१९९८ मध्ये अटल बिहारी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी कलामांना फोन करून सांगितले की,

मंत्री मंडळातील सामील होणाऱ्यांची लिस्ट करत असून तुम्ही त्यात सामील व्हावी अशी माझी इच्छा आहे.

यावेळी अब्दुल कलाम यांना तर आधी धक्काच बसला. ज्याप्रमाणे नरसिंह राव यांनी राजकारणाबाहेरच्या मनमोहन सिंग याना मंत्री करून देशाचं आर्थिक चित्र बदललं त्याप्रमाणे अब्दुल कलाम हे देशाचं वैज्ञानिक क्षेत्रातील चित्र बदलून दाखवतील असा विश्वास वाजपेयींना होता.

कलामांनी मात्र त्यांना मित्रांशी चर्चा करून निर्णयाबाबत कळवतो असे सांगितले होते. त्यानंतर रात्री तीन वाजे पर्यंत अटल बिहारी यांच्या मंत्रीमंडळात सामील व्हावे कि नाही याबाबत चर्चा केली होती. जर आपण अटल भिहारी यांच्या मंत्रिमंडळात सामील झालो तर राष्ट्रीय महत्वाचे दोन मोठे प्रकल्प मागे पडतील असे त्यांच्या लक्षात आले.

अखेर त्यांनी मंत्रीमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला.

यानंतर अब्दुल कलाम यांनी अटल बिहारी यांची भेट घेतली आणि माझी टीम अग्नी मिसाईल आणि आण्विक उर्जा यावर काम करत आहेत. या कामातून मी देशाला अधिक योगदान मिळवून देवू शकतो. त्यामुळे मी मंत्रिमंडळात सामील होऊ शकत नाही. असे अटल बिहारी यांना त्यांनी सांगितलं. वाजपेयींनी देखील त्यांच्या निर्णयाचा आदर केला.

पुढे अटलजींच्या काळात पोखरणची अणुचाचणी झाली ती अब्दुल कलामांच्या कर्तृत्वाखालीच झाली. पुढे कलाम अटलजींच्या आग्रहामुळे राष्ट्रपती देखील झाले.  मात्र देश एका उत्कृष्ट विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्याला मुकला.

वाजपेयींनी भाजपला सर्वसमावेशक बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते यशस्वी ठरले नाहीत. जर तेव्हा कांशीराम आणि अब्दुल कलाम यांनी त्यांना नकार दिला नसता तर काय माहित आज भाजपची इमेज वेगळी असती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.