काश्मीरमध्येसुद्धा निवडणूक लढवणारी शिवसेना आहे, पण आपल्याहून वेगळी…

आम्ही काश्मीरला गेल्यानंतर महाराष्ट्राचे आहोत हे कळलं की लोकं दोन गोष्टींविषयी विचारायची. एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे शिवसेना. मुंबईचं आपण समजून घेऊ शकतो, आर्थिक राजधानी वगैरे म्हणून. पण शिवसेना का म्हणून? शिवसेना बाहेरच्या राज्यांमध्ये आहे हे ऐकून होतो पण काश्मिरात ठाकरे यांच्या सेनेचा काय संबंध?

पण दिवसेंदिवस शिवसेनेच्या नावाची चर्चा वाढली. तेव्हा कुठं कळालं-

काश्मीरच्या मुसलमानांची स्वतःची वेगळी शिवसेना सुरु झाली होती. तिचं नाव होते शिवसेना हिंदुस्थान!

बुऱ्हाण वाणी या २१ वर्षीय कमांडरच्या मृत्यूनंतरची गोष्ट. संपूर्ण काश्मीर खोरे पेटून उठले होते. काश्मीरच्या राजकारणात मोठमोठ्या उलथापालथी घडल्या होत्या. बुऱ्हाणचे व्हिडीओ घराघरात पाहिले जायचे, त्याच्या नावाने गाणी लिहिली जायची. दर घरातलं कुणीतरी मेलं आहे असं वातावरण. त्या काळात काश्मीर जवळपास बंद पडलं होतं. सगळं ठप्प…

त्याच काळात उत्तर कश्मीर मधल्या नौगाममधल्या एका घरात सभा भरली. घरावर आणि इतरत्र भगवे झेंडे लावले गेले. झेंड्यावर भारताचा नकाशा होता. शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्र होतं. चर्चा वाढत चालली आणि उपस्थित लोकांमध्ये उत्साह आला. घोषणाबाजी सुरु झाली आणि गावातल्या लोकांनी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. जवळपास ३० लोकांनी एका नव्या हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश केला होता.

या पक्षाचे नाव होते शिवसेना. पण महाराष्ट्राची शिवसेना नाही. त्यापासून वेगळी निघालेली शिवसेना हिंदुस्तान!

कश्मीरमध्ये असलेली हि शिवसेना महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचेच एकेकाळचे अंग होते. या संघटनेनेही सुरुवात ठाकरे यांच्या सेनेतूनच झाली होती. मुळात पंजाबात काही कार्यकर्ते पेटले होते. २००५ चा हा काळ.

हिंदूंसाठी लढणाऱ्या पंजाबी शिवसैनिकांची इच्छा होती की ठाकरे परिवाराने देशाच्या इतर भागांमध्ये लक्ष द्यावे. पण तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे याचे बहुतांश लक्ष महाराष्ट्रावरच एकवटले होते. त्यामुळं हिंदूंसाठी लढणाऱ्या पंजाबी शिवसैनिकांची नाराजी झाली.

यात पवन गुप्ता नावाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्यांच्या मते मूळ सेनेचे बहुतांश लक्ष महाराष्ट्रावरच एकवटले होते. म्हणून देशाच्या इतर भागात पक्षाचा विस्तार होत नव्हता.

म्हणूनच त्यांनी नव्या शिवसेनेची स्थापना केली. याला आपल्या मातृसंस्थेचेच नाव जोडण्यात आले. हि संघटना शिवसेना हिंदुस्थान म्हणून ओळखली जाऊ लागली. नाराज कार्यकर्ते पवन गुप्ता हे तिचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.

पण अजूनही या पक्षाला आपल्या मूळ इतिहासाचा अभिमान आहे.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांनी नंतर काश्मीर आणि इतर भागातल्या लोकांसाठी काम करायला हवे होते. पण आता आम्ही ते काम पुढं नेत आहोत, असं त्यांचं मत आहे.

२००५ साली या पक्षाने पंजाबात धर्मयुद्ध अभियान सुरू केलं होतं. त्याकाळात पंजाब राज्य सरकार अनेक कुटुंबांना दहशतवादाचा सामना करावा लागला म्हणून भरपाई देत असे. शिवसेना हिंदुस्तान यांनी हि भरपाई शीख लोकांसोबत हिंदू लोकांनांहि मिळावी अशी मागणी केली.

आज रोजी शिवसेना हिंदुस्तान पक्ष देशाच्या 18 राज्यांमध्ये सक्रिय आहे. जम्मू भागात १० वर्षांपासून हा पक्ष मजबुतीने काम करत आहे. ४ वर्षांपासून त्यांनी काश्मीरच्या इतर भागातही आपले अभियान सुरु केले असून आजवर हजारपेक्षा जास्त सदस्य या संस्थेने जोडलेले आहेत.

अर्थात हि संस्था एक पक्ष म्हणून जास्त प्रबळ नसली तरी तिचे सदस्य अनेक आंदोलनांमध्ये सहभागी असतात. भारताच्या संविधानावर विश्वास ठेवून हा पक्ष काम करतो असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कश्मीरविभागाचे शिवसेनाप्रमुख अब्दुल ख़ालिक भट हे या संस्थेचे तेथील पदाधीकारी आहेत. त्यांच्यासोबत  बांदीपोरा जिल्यातील शाखेचे अध्यक्ष  श्री. यूसुफ शुगनू हे काश्मीरमध्ये प्रसिद्धीस पावत आहेत.

पिण्याच्या पाण्यापासून ते गावांमधील दवाखाने आणि इतर सोयी यावर हि शिवसेना आवाज उठवत आहे. पक्ष बाकीच्या समस्या आणि विकास यावर लक्ष देईल तसेच स्थानिक लोकांना सामावून घेऊन काम करेल असं धोरण असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात.

स्थानिक मुस्लिम नेत्यांमध्येही यासंदर्भात उत्सुकता आहे. या पक्षाला तेथील बरेचसे मुस्लिम लोक हे त्यांच्या धर्माच्या विरोधी मानतात. त्यामुळे ते यशस्वी होतील याची शक्यता फार नगण्य आहे.

पक्षाचे सदस्य गुलाम मोहम्मद डार यांच्या मते “काश्मिरी लोकांवर अन्याय होत आहे. जर हा नवा पक्ष आमच्या मागण्या पूर्ण करू शकला त उत्तम. जर त्यांच्याकडूनही काही झाले नाही तर आम्ही हा पक्ष सुद्धा सोडून देऊ.”

उत्तर काश्मीर भागात दक्षिण काश्मीरच्या तुलनेत मिलिटन्ट बनणाऱ्या पोरांची संख्या तुलनेने नगण्य आहे. त्यामुळे उत्तरेत या संघटनेचा चांगला प्रसार होत आहे. अर्थात अशा हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांना स्थानिक दहशतवादी गटांपासून मोठा धोका असतो.

तरीही शिवसेना हिंदुस्थान भाजपपासून अंतर राखून आहे. त्यांच्या मते भाजप आणि त्यांच्या विचारसरणीत मूलभूत फरक आहे. ते भाजपप्रमाणे फक्त हिंदूंना घेत नाहीत तर त्यांची संघटना हिंदूंप्रमाणे मुस्लिम लोकांसाठीही खुली आहे. 

२०१९ साली काश्मीरमध्ये तीन जागी निवडणुका झाल्या होत्या. यातील एका लोकसभा मतदारसंघात या शिवसेनेचे काश्मिरातील प्रमुख अब्दुल खलीक भट हे देखील उभे होते. त्यांच्यासमोर तागडे आव्हान होते ते नॅशनल कॉन्फरन्सचे मातब्बर नेते फारुख अब्दुल्ला यांचं. पण तरीही त्यांनी अब्दुल्ला याना चांगली लढत दिली होती.

“काश्मीरमध्ये शिवसेना आहे तोपर्यंत येथील पोलीस आणि इतर लोकांना भिण्याची गरज नाही. पंडित आणि इतर हिंदू नागरिकांचे रक्षण करणे हि आमची जबादारी आहे” असे भट सांगतात.

या पक्षाने अजून कोणत्याही इतर निवडणुका लढवलेल्या नाहीत. पण येत्या काळात फक्त विकासाच्या मुद्द्यावर काश्मिरी जनतेत जाण्याचा त्यांचा मानस आहे. अर्थात यात ते किती यशस्वी होतात ते येणार काळच ठरवेल.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.