कोर्डाने जेव्हा हे फोटो घेतले तेव्हा त्याला माहीतही नव्हते, त्याने एक नवीन इतिहास रचलाय.

५ मार्च १९६०..

हवानामध्ये हत्यारे घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला झाला. १३६ लोक मेली. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फिडेल, चे आणि क्युबाचे जवळ जवळ सर्व महत्वाचे क्रांतिकारी नेते उपस्थित होते. ‘

चे’ बोलण्यासाठी पुढे सरसावला..

त्याच वेळी अल्बर्टो कोर्डा याने २ फोटो घेतले. अल्बर्टो फॅशन फोटोग्राफर होता पण चे गव्हेरा सोबत जिव्हाळ्याची मैत्री झाल्यावर त्याने फॅशन फोटोग्राफी सोडली आणि ‘Revolucion’ या वृत्तपत्रात क्युबाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी काम चालू केले.

कोर्डाने जेव्हा हे फोटो घेतले तेव्हा त्याला माहीतही नव्हते, त्याने एक नवीन इतिहास रचलाय.

६ मार्चच्या वृत्तपत्राला बातमी लावण्यासाठी त्याने फोटो थोडासा edit केला पण संपादकाने फोटो छापलाच नाही. हा फोटो जवळ जवळ ७ वर्षे कार्डोच्या ऑफिसमध्येच भिंतीवर लटकत होता.

मे १९६७ मध्ये एक इतिहासकार, Giangiacomo Feltrinelli कार्डोकडे आला. कार्डोने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता चे चा ‘हा’ फोटो देऊन टाकला. आश्चर्यकारक रित्या फोटो पॅरिसच्या Match मॅगझीनमध्ये छापून आला.

त्याच वेळेस आयरिश आर्टिस्ट Jim Fitzpatrick याने गव्हेराचा हाच फोटो मॉडेल म्हणून आपल्या कलर पोस्टरवर छापला. (जो एका डच अराजकतावादी ग्रुप ‘The Provos’ यांनी जिम ला दिला होता.)

ऑक्टोबर १९६७ मध्ये चे गव्हेराचा मृत्यू झाला.

जगभरात चे विषयी उत्सुकता, सहानुभूतीची लाट एकाच वेळेस पसरली. Feltrinelli याने हजारो पत्रके छापून आंदोलकांच्या हाती दिले आणि हा फोटो आगीसारखा पसरत गेला. तेव्हापासून ह्या फोटोला जे जागतिक वलय निर्माण झाले आहे, ते आजपर्यंत कायम आहे.

हा फोटो जगात आज ‘Guerrillero Heroico’ म्हणजे ‘गोरिला फायटरचा हिरो’ म्हणून प्रसिद्ध आहे.

कार्डोने जेव्हा हा फोटो काढला तेव्हा त्याला स्वप्नातही वाटले नव्हते, की त्याचा एक फोटो इतिहास निर्माण करेल.

WhatsApp Image 2021 03 06 at 12.31.53 PM

2008 या एकाच वर्षात हा फोटो तब्बल 50 लाख वेळेस छापण्यात आला. टीशर्ट, मोबाईल कव्हर, पॅड, वह्या, पेन इतकेच काय तर शूज, दारूच्या बाटल्या, पत्ते, डायपर पासून प्रत्येक गोष्टीवर आपल्याला चे चा हाच फोटो दिसतो.

कार्डोने हा फोटो काढला Leica M2 या कॅमेऱ्यातून.. त्याला लेन्स वापरली होती 90 mm Leica telephoto lens आणि फिल्म होती plus-x.. याच कॅमेरा आणि plus x negative मध्ये चे चा जगप्रसिद्ध फोटो काढण्यात आला..

या एका फोटो ने 50 हजार डॉलर्स क्युबाच्या हेल्थकेअर सिस्टीमला मिळवून दिले. त्याच झालं असं.. Smirnoff या दारूच्या कंपनीने 2000-01 साली हा फोटो आपल्या दारूच्या बाटल्यांवर छापला. कार्डोला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने कोर्टात केस चालू केली. एकप्रकारे चे गव्हेराच्या विचारांचा हा अपमान आहे, असे त्याचे मत होते. फिडेल कॅस्ट्रो यानेही या प्रकरणात जातीने लक्ष घातले. कोर्टाने कार्डोच्या बाजूने निकाल दिला आणि नुकसानभरपाई म्हणून 50 हजार डॉलर्स दिले.

WhatsApp Image 2021 03 06 at 12.31.52 PM

इथून पुढे कधीही चे चा फोटो पाहाल.. तेव्हा नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा.. जगात सर्वात जास्त छापण्यात आलेला, विक्री झालेला हा फोटो.. एका ‘चे गव्हेरा’ या नावामुळे इतिहासात आपले अढळस्थान प्राप्त करून गेला.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.