कट्टर मुस्लिम असूनही हैद्राबादच्या निजामाने कुंथलगिरीला अहिंसा क्षेत्र जाहीर केलं होतं

उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी म्हणलं तर आपल्या पैकी प्रत्येकाला आठवतो तो मस्त खव्याचा सुमधुर पेढा. मराठवाड्याच्या रणरणत्या दुष्काळात कुंथलगिरीची हिरवाई, तिथला गोडवा एक दिलासा देऊन जाते.

पण कुंथलगिरी आणखी एका कारणासाठी भारतभरात फेमस आहे ते म्हणजे इथल्या टेकडीवर वसलेलं जैन मंदिर !

कुलभूषण व देशभूषण या नावाचे मगध देशाचे दोन जुळे राजकुमार होते. त्यांना काही कारणामुळे वैराग्य प्राप्त झालं आणि सगळा राजपाट सोडून कुंथलगिरीच्या टेकडीवर आले. जैन साधू बनले. पार्श्वनाथ भगवानांची भक्ती केली. याच भूमीवर ते मोक्षास गेले.

पुढे अनेक वर्षे ही क्षेत्र अज्ञातवासात गेले होते.

या कुंथलगिरीमध्ये जैनधर्मियांची संख्या देखील अत्यल्प असल्यामुळे कोणाला या देवस्थानाविषयी माहिती नव्हती. शेकडो वर्षांनी राजस्थानच्या तानाशाह हुंबड नावाच्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात हे तीर्थक्षेत्र आले.

त्यांनी टेकडीवर सर्वत्र फिरून जंगलात लपलेल्या कुलभूषण व देशभूषण महाराजांच्या पादुका शोधून काढल्या.

त्यांनीच इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देशभरातून जैन भाविक कुंथलगिरीच्या दर्शनासाठी येऊ लागले. या तिर्थस्थानाची कीर्ती हैद्राबादच्या निजामाच्या कानावर पडली.

तेव्हा निजाम होता मीर उस्मान अली

तेव्हा मराठवाडा निजामाच्या सत्तेखाली येत होता. हा दुष्काळी भाग पूर्वीपासून उपेक्षित होता. पण निजामाची ओळख जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून होती. भला मोठा हिरा पेपरवेट म्हणून वापरणाऱ्या मीर उस्मान अलीबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.

आपण इतिहासात मीर उस्मान अलीला मराठवाड्यावर अत्याचार करणारा शासक म्हणून ओळखतो. हैद्राबाद संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करण्याची स्वप्ने पाहणारा, रझाकार ही कट्टर मुस्लिम संघटना बनवून त्यांच्या हातून हिंदूंवर जुलूम करणारा निजाम आपल्याला ठाऊक आहे. पण ही नंतरची गोष्ट झाली.

हैदराबादचा निजाम आधी इतका कट्टर नव्हता.

त्याच्याच वडिलांच्या काळात सतीप्रथा बंद झाली होती. काशी हिंदू विद्यापीठापासून ते हिंदू मंदिरापर्यंत अनेक ठिकाणी त्याने दानधर्म केलं होतं. हैद्राबादमध्ये धार्मिक एकोपा रहावा म्हणून त्याने केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात.

आपल्या राज्यातील कुंथलगिरी या क्षेत्राची त्याला माहिती कळाली तेव्हा त्याने या मंदिराला २५० एकर जमीन दान तर दिलीच शिवाय या भागाला अहिंसा क्षेत्र म्हणून जाहीर केले.

ते वर्ष होते १९१५!

याचाच अर्थ कुंथलगिरीच्या आसपासच्या क्षेत्रात शिकार करण्यापासून ते साधी मुंगी मारण्यापर्यंत मनाई करण्यात आली होती. या भागात मांसाहार करण्यास देखील बंदी घातली होती.

कुंथलगिरीच्या शिलालेखात ही माहिती आढळते. जागोजागी निजाम सरकारने लावलेले चार फूट उंचीचे दगड आजही त्याची साक्ष देतात.

या दगडांवर उर्दू, मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्राण्यांची शिकार करता येणार नाही आणि हा कायदा मोडला तर हैदराबादच्या दरबारात शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशारा देणारा मजकूर नोंदविला आहे.

त्याकाळी असे हे अहिंसा क्षेत्र जाहीर करणारा हैद्राबादचा निजाम हा एकमेव राजा असेल.

अगदी राजस्थानमधल्या जैन राजांनी देखील इतकी मोठी घोषणा केली नव्हती. मात्र आपल्या हैद्राबाद संस्थांनमध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या जैनांची धार्मिक भावना जपणारा मीर उस्मान अली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळी संवेदनाहीनपणे का वागला हे गूढ आजही उलगडत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.