या ठाकरेंना भाजपचा पितृपुरुष म्हणून ओळखलं जातं..

सध्याच्या राजकारणात ठाकरे नाव आणि भाजप म्हणजे दोन ध्रुवांचे टोक बनले आहेत. हिंदुत्व वाद हा समान जोडणारा धागा असला तरी एकेकाळी सख्खे भाऊ म्हणून ओळखले जाणारे शिवसेना भाजप हे पक्ष अनेक वर्षांची युती मोडून सध्या सख्खे शत्रू बनले आहेत.

पण गोष्ट या ठाकरेंची नाही. गोष्ट आहे कुशाभाऊ ठाकरे यांची. भाजपचे पितृपुरुष.

१५ ऑगस्ट १९२२ रोजी मध्यप्रदेशच्या धार या संस्थानमध्ये एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील डॉ.सुंदरराव श्रीपतीराव ठाकरे आणि आई शांताबाई. त्यांचं शिक्षण ग्वाल्हेर येथे झालं. महाविद्यालयात असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांकडे आकर्षित झाले. १९४२ साली त्यांनी संघप्रचाराचं कार्य सुरु केलं.

एक कुशल संघटक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मध्यप्रदेश , राजस्थान, गुजरात या तिन्ही राज्यात कधी सायकल तर कधी परिवहनच्या बस मध्ये फिरून त्यांनी रतलाम , उज्जैन, मंदसौर, चित्तौर,कोटा,दाहोद अशा कानाकोपऱ्यातल्या गावात फिरून संघाचा विचार पोहचवला.

पुढे स्वातंत्र्यानंतर संघाच्या राजकीय विंगची म्हणजेच जनसंघची स्थापना झाली. कुशाभाऊ ठाकरेंची जनसंघाच्या मध्यप्रदेश राज्याचे सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. संघाप्रमाणेच जनसंघ मध्यप्रदेश मध्ये रुजवण्यात त्यांचे महत्व मानले जाते. पुढच्या दहा वर्षात त्यांना राष्ट्रीय राजकारणात महामंत्री म्हणून घेण्यात आले.

आणीबाणीच्या काळात १९ महिने कारावास सहन केला. तिथून बाहेर आले ते हिंदुत्ववादी विचारांचा महानायक बनूनच. आणीबाणी हटली तेव्हा इंदिरा गांधींना नमवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचा प्रयोग करण्यात आला.  जनसंघापासून अनेक विरोधी विचारांचे पक्ष या पक्षात विलीन करण्यात आले. जनता पक्षाचे मोरारजी देशाचे पंतप्रधान बनले.

कुशाभाऊ ठाकरे देखील खांडवा मधून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार बनले. 

पण हा जनता प्रयोग फार काळ टिकला नाही. १९८० साली सत्ताखोरीमुळे सगळे नेते अलग झाले. या नादात जनता लाट ओसरली. इंदिरा गांधी यांनी जोरदार धडक दिली. त्यावर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसने दिमाखात पुनरागमन केलं. अनेक हरलेल्या जागा पुन्हा जिंकल्या, इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या.

पण या सगळ्या घडामोडीत एका मतदारसंघात मात्र काँग्रेसला प्रचंड घाम फोडावा लागला. तो मतदारसंघ म्हणजे खांडवा.

कुशाभाऊ ठाकरे यांची लोकप्रियता तेव्हा शिखरावर होती. त्यांना खांडवा मध्ये हरवणे जवळजवळ अशक्यप्राय होते. पण फक्त या दिग्गज नेत्याला हरवायचे म्हणून खुद्द इंदिरा गांधी तब्बल तीन दिवस स्वतः खांडवा मतदारसंघात फिरल्या. त्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे कुशाभाऊ ठाकरेंचा पराभव शक्य झाला. काँग्रेसच्या उमेदवाराने अगदी थोडक्या फरकाने हि सीट कुशाभाऊंकडून काढून घेतली.

या पराभवानंतर जनसंघाच्या नेत्यांनी जनता प्रयोगातून बाहेर पडत आपला नवीन पक्ष स्थापन करायचे ठरवले. विजयाराजे शिंदे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सिकंदर बख्त, कुशाभाऊ ठाकरे या मुख्य नेत्यांनी मिळून संघ विचारांचे पुरुज्जीवन करणारा पक्ष स्थापन केला.

याच पक्षाचे नवीन नाव देण्यात आले “भारतीय जनता पक्ष”

भाजपच्या निर्मितीमध्ये कुशाभाऊ ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांच्या संघटन कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला. 

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधींबद्दल आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत भाजप उडाली. पक्ष नव्याने बांधायचं ठरवलं. कुशाभाऊ ठाकरे यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवण्यात आलं. अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी कार्यकर्ते जोडले. एकदा भेटलेल्या कार्यकर्त्यालाही ते नावानिशी ओळखत असत. त्यांचे साधे गुरुतुल्य व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत असे.

भाजपचा सामाजिक पाया विस्तारण्यासाठी अतोनात परिश्रम केले. अनुसूचित जाती-जनजातींच्या अनेक तरुणांना हाताशी धरून त्यांच्यातला कार्यकर्ता जागविला. अनुसूचित जाती-जमातींच्या बरोबरीने अन्य मागासवर्गीय, भटके-विमुक्त आणि ग्रामीण तसेच शहरी गरीब आज भाजपाच्या जनाधाराचा मुख्य घटक बनले.

आधी पक्ष संघटनेचा आणि नंतर सरकारचा चेहरामोहरा पालटून लागोपाठ तीन वेळा जनादेश मिळविणारे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान या परिवर्तनाचे एक नायक म्हणून पुढे आले, ते कुशाभाऊंसारख्यांच्या प्रयत्नातूनच!

फक्त शिवराजसिंग चौहान नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कुशाभाऊ ठाकरे यांनी घडवले.

भाजपच्या ११, अशोका रस्त्यावरील केंद्रीय कार्यालयातील एका लहानशा खोलीत कुशाभाऊ ठाकरे राहत असत. तेथूनच ते देशभरातील भाजपचा गाडा हाकत. नरेंद्र मोदी दिल्लीत असताना त्यांचा मुक्काम याच खोलीत असे. कुशाभाऊ यांनी त्यांना राजकारणाचे धडे याच खोलीत शिकवले.

नरेंद्र मोदींना राष्ट्रीय महामंत्री बनवलं. अनेकांचा विरोध डावलून त्यांना मध्यप्रदेशचा प्रभारी बनवलं. ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते बनले ते कुशाभाऊ ठाकरे यांच्या मुळेच.

भाजपचा पितृपुरुष म्हणून कुशाभाऊंना ओळखलं जाऊ लागलं. मध्यप्रदेश, गुजरात,राजस्थान हे भाजपचे गड म्हणून ओळखले जातात त्याच्या बांधणीचे श्रेय कुशाभाऊ ठाकरे यांना दिलं जातं.

पुढे कुशाभाऊ ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. या पदावर पोचणारा पहिलाच मराठी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं गेलं. तेव्हा केंद्रात भाजपची सत्ता होती. अटलबिहारी वाजपेयी अल्पमतातल्या सरकारचे पंतप्रधान होते. अशावेळी युती आघाडीचे राजकारण सांभाळण्यासाठी कुशाभाऊ यांच्या चारित्र्यवान नेतृत्वाचा त्यांना प्रचंड फायदा झाला.

कुशाभाऊंनी वाजपेयी यांच्या प्रत्येक निर्णयाला खंबीर पणे पाठींबा देऊन त्यांचे सरकार मजबूत बनवलं. जेव्हा अणुचाचणी वरून वाजपेयींवर टीका झाली तेव्हा एका कार्यक्रमात कुशाभाऊ म्हणाले,

“हमारी सरकार ने तय किया है कि सामने वाले के पास परमाणु बम है, तो हमारा सिपाही तमंचे से नहीं लड़ेगा। हमने अपनी सेना को आधुनिक और आणविक क्षमता से लैस करना जरूरी समझा। हमें पता था कि ऐसा करने पर हमें कमजोर करने का प्रयास किया जाएगा, आर्थिक प्रतिबंध लगाए जाएंगे। उनको लगता है कि ऐसा करने से भारत डूब जाएगा, पर भारत हमेशा ही अपने पैरों पर खड़ा था, खड़ा है और हमेशा खड़ा रहेगा। देश के विकास में लगे 80 प्रतिशत साधन स्वदेशी हैं। विदेशी मदद तो मात्र 15-20 प्रतिशत है। हम सूखी रोटी खा लेंगे, पर पश्चिमी देशों के सामने हाथ नहीं फैलाएंगे।” 

छोटा कार्यकर्ता असो किंवा पंतप्रधान कुशाभाऊंची भाजप कार्यालयातली छोटी खोली प्रत्येकासाठी सताड उघडी होती. कितीही मोठ्या पदावर पोहचल्यावर त्यांचा साधेपणा अगदी तसाच राहिला. आदर्श पक्षाध्यक्ष कसा असावा याचे उदाहरण कुशाभाऊंकडे बोट दाखवून दिले जाऊ लागले.

२८ डिसेंबर २००३ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांनी घडवलेले नेते देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचले आहेत. एकेकाळी शेठजी व भटजींचा म्हणून ओळखला जाणारा भाजप ओबीसी व इतर मागासवर्गीय  जातींच्या तळागाळात पोहचलाय. हे सगळे अच्छे दिन या भाजपच्या पितृपुरुष ठाकरेंमुळे घडलं आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.