एकेकाळी भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व करणारा खानदेशी नेता सर्वांच्याच विस्मृतीत गेलाय

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात माणसं देखील झणझणीत. तोंडावर खरं बोलण्याचा स्पष्टवक्तेपणा असलेल्या खानदेशी माणसांना राजकारणात हांजी हांजी करणे कधी जमलेच नाही.

म्हणूनच की काय मुख्यमंत्रीपदाने या भागाला कायमच हुलकावणी दिली.

सध्या नाथाभाऊंची झालेली फरफट उभ्या महाराष्ट्राने पहिली. असाच एक नेता खानदेशात होऊन गेला ज्याने भाजप रुजवली, राज्यभरात वाढवली, भाजपचा तो सर्वोच्च नेता बनला, वर्षा बंगल्यात राहिला पण योग्यता असूनही मुख्यमंत्रीपद लाभलं नाही.

स्व.उत्तमराव उर्फ नानासाहेब पाटील.

खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या वाघळी येथे नानासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रावेर येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाच्या साहाय्याने बडोदा येथे झाले.

वकीलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने नानासाहेब पुण्याला आले. तिथल्या विधी महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर, खेर , श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भाषणे व्हायची. येथेच त्यांची ओळख सावरकरवादी हिंदुत्वाच्या विचारांशी झाली.

तिथूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षिले गेले.

शिक्षण संपल्यावर धुळ्यात फौजदारी वकील म्हणून नाव कमावलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या जनसंघ या पक्षात त्यांनी प्रवेश केला. आज आपण पाहतो त्या भाजपची पहिली आवृत्ती म्हणजे जनसंघ.

या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सुरू केलं.

दत्तोपंत ठेंगडी व इतर मोठ्या नेत्यांनी उत्तमराव पाटलांचे वक्तृत्व, त्यांच्यातील चाणाक्षपणा, नेतृत्वगुण ओळखून त्यांना थेट जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष बनवले.

काँग्रेसची लाट असणारा तो काळ. त्याकाळात जनसंघ हा फक्त उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. नानासाहेब पाटलांनी राज्यभर मोहीम काढून तळागाळातले कार्यकर्ते संघाशी जोडले. पक्ष रुजवला.

१९५४ साली पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. जनसंघाचा पहिला आमदार म्हणून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. पण एकटे असल्यामुळे ते मागे हटले नाहीत तर आपल्या भाषणांनी त्यांनी सभागृह गाजत ठेवलं.

त्याच काळात संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न तीव्र झाला असता या प्रश्नावर नानासाहेबांनी आमदारकीचा त्याग करत राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्राम यात स्वतःला वाहून घेतलं.

नानासाहेबांनी केलेल्या त्यागाची जाण जनतेने ठेवली. १९५७ साली ते लोकसभेला खासदारकीसाठी उभे राहिले, त्यांचा प्रचार एकही रुपया न घेता लोकांनी स्वतःचा निधी उभा करून केला.

तेव्हा भारतीय जनसंघ आणि प्रजा समाजवादी पक्ष यांची युती होती. प्रजा समाजवादी पक्षाची निवडणूक निशाणी होती ’झोपडी’ आणि भारतीय जनसंघाची निवडणूक निशाणी होती ’पणती’ (दिवा). दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात रान उठवत होते.

झोपडी अन् दिवा ध्यानमां ठिवा! अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून जात होता. 

नानासाहेब भरघोस मतांनी निवडून आले. या विजयाबरोबरच जनसंघाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं.

त्याकाळी जनसंघाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खासदार निवडून यायचे. यात वाजपेयींचा समावेश होता. नानासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांची संसदेच्या बाकावर मैत्री जमली. दोघे खासदार निवासात एकाच खोलीत राहायचे. पुढे अखेरच्या श्वासापर्यंत ही मैत्री टिकली.

नेहरूंच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध नानासाहेब आणि वाजपेयींनी लोकसभेत जोरदार निदर्शने केली होती. त्यांनी संसद गाजवलीच शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

१९६६ साली नानासाहेब पाटील पुन्हा पदवीधर मतदारसंघातुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर निवडून आले. तिथल्या विरोधीपक्षनेते पदी त्यांची निवड करण्यात आली. वसंतराव नाईक यांच्या काळातील रोजगार हमी योजना यामध्ये नानासाहेबांचा देखील वाटा राहिलेला आहे.

नानासाहेब पाटील १९७८ पर्यंत विरोधीपक्ष नेते राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील व राज्यातील सरकारला धारेवर धरण्याचे काम केले.

याच सुमारास जनसंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या सर्वोच्च पदावर त्यांची निवड झाली होती.

१९७८ साली महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्यावर तिथले विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे चालून आले.

याच काळात वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून शरद पवार बाहेर पडले आणि काँग्रेसचे सरकार कोसळले. तेव्हा सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधून पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार स्थापनेत नानासाहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली.

या आघाडीत सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या जनसंघाचे नेते म्हणून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून नानासाहेब पाटलांचे नाव पुढे आले होते.

पण मध्यंतरी घडामोडी घडल्या आणि शरद पवार हेच मुख्यमंत्री बनले.

पुलोद सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खालोखाल असलेले जेष्ठत्वाचे स्थान नानासाहेबांना देण्यात आले. त्यांच्याकडे महसूल व पुनर्वसन मंत्रालय देण्यात आले होते.

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पवारांनी राहण्यास नकार दिल्यावर तो बंगला नानासाहेब पाटलांना देण्यात आला होता.

पुढे इंदिरा गांधी सत्तेत परतल्यावर त्यांनी पुलोद सरकार विसर्जित करून टाकले.

१९८० साली जनसंघ विसर्जित करून भारतीय जनता पक्षाची निर्मिती करण्यात आली.या पक्षाच्या प्रमुख संस्थापकांमध्ये नानासाहेब पाटलांचा देखोल समावेश होता. वाजपेयींनी महाराष्ट्र भाजपचे पहिले अध्यक्ष म्हणूनही नानासाहेबांचीच निवड केली.

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे असे बहुजन समाजातील अनेक नेते नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडले.

१९८९ साला मध्ये जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल लोकसभा मतदारसंघातून त्यांनी खासदारकीची शेवटची निवडणूक जिंकली. त्यांनंतर १९९१ साली भाजप च्या नेतृत्वाची धुरा या तरुण नेत्यांकडे देत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

नुकतीच त्यांची १९ वि पुण्यतिथी झाली. आज अनेकांना त्यांच्या नावाचा विसर जरी पडला असला तरी आज भाजपचे देशपातळीवर अच्छे दिन आले आहेत त्यात नानासाहेब पाटलांच्या सारख्या नेत्यांनी आयुष्यभर केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.