नॉर्थ ईस्टचे “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचित बोडफुकन यांची आज जयंती

ज्याप्रकारे औरंगजेबाला हरवण्याचा इतिहास मराठ्यांना लाभला आहे, तसाच इतिहास आसामी लोकांना सुद्धा लाभला आहे. आसामच्या ओहोम साम्राज्याचे सेनापती लाचित बोडफुकन यांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याला हरवून गुवाहाटी शहर परत ओहोमांच्या ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याच ४०० व्या जयंतीचा तीन दिवसीय समारोह दिल्लीच्या विज्ञान भवनात साजरा केला जातोय.  

उद्याच्या समारोपीय कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत

यंदाचे वर्ष हे बोडफुकन यांच्या ४०० व्या जयंतीचे वर्ष होते त्यामुळे यंदा भाजपकडून त्यांचे पुतळे उभारणे, वेगवेगळ्या योजना सुरु करणे आणि कार्यक्रम साजरे कारण्यावर विशेष भर देण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लाचित बोडफुकन यांच्या ४०० व्या जयंती वर्षाची सुरुवात केली आणि आसामच्या होलोंगापर येथे उभारण्यात येणाऱ्या १५० फूट उंच कांस्य पुतळ्याची पायाभरणी  केली होती. 

तर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी सुद्धा लाचित बोडफुकन यांच्या नावाने वेगवेगळ्या योजनांची घोषणा केलीय. पण सरकारकडून  बोडफुकन यांच्या जयंतीला एवढं महत्व देण्याचं कारण काय आहे? 

तर लाचित बोडफुकन हे काही साधेसुधे व्यक्ती नव्हते, त्यांना नॉर्थ ईस्टचे छत्रपती  शिवाजी म्हणून ओळखले जातात. 

१३ व्या ते १९ व्या शतकाच्या काळात आसाममध्ये ओहोम साम्राज्याची सत्ता होती. ओहोमांचं साम्राज्य हे नॉर्थ ईस्टमधील सगळ्यात महत्वाचं आणि गौरवशाली साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. याच साम्राज्याचे सगळ्यात शूरवीर सेनापती होते लाचित बोडफुकन.

१७ व्या शतकात आसामवर ओहोम राजा सिंगा यांचं राज्य असतांना २४ नोव्हेंबर १६२२ रोजी लाचित बोडफुकन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोमाई तामुली बोडफुकन हे ओहोम सैन्याचे सेनापती होते. त्यांच्या वडिलांच्या नंतर राजा सिंगा यांनी १६६७ मध्ये लाचित बोडफुकन यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली. जेव्हा लाचित हे सेनापती झाले तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. 

परंतु लाचित बोडफुकन आणि त्यांच्या वडिलांचा कला हा ओहोम साम्राज्यासाठी अतिशय बिकट कालखंड होता. 

१६१५ ते १६८२ या काळात मुघलांनी ओहोम साम्राज्यावर अनेकदा आक्रमण केलं आणि साम्राज्याचा बराचसा भाग जिंकून घेतला होता. सुरुवातीला जहांगीर, त्यानंतर शाहजहान आणि नंतर औरंगजेब अशा तिघांनी ओहोम साम्राज्यावर विजय मिळवण्याचे प्रयत्न सोडले नव्हते. ते वारंवार ओहोमांवर आक्रमण करत होते आणि ओहोम सुद्धा त्यांना तितकाच निकराचा लढा देत होते.

यातच लाचित बोडफुकन यांचे वडील गेले आणि त्यांच्या हातात ओहोम साम्राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी आली. सेनापती नसतांना सुद्धा लाचित यांनी मुघलांसोबत बरेचसे युद्ध जिंकले होते. १६६७ ते १६७२ या ५ वर्षाच्या काळात त्यांनी मुघलांवर आक्रमण करून बरेचसे भाग पुन्हा जिंकून घेतले होते. 

यामुळेच लाचित बोडफुकन यांना राज्याकडून वेगवगेळ्या पदव्यांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 

त्यांना ‘सोलधरा बरुआ’ म्हणजेच राजाचे वस्त्र धारण करणारा ही सर्वात बहुमानाची पदवी देण्यात आली होती. सोबतच ‘घोरा बरुआ’ म्हणजेच राज्यकारभारातील प्रमुख आणि ‘डोलकक्षरिया बरुआ’ म्हणजेच राजघराण्यातील लोकांचं संरक्षण करणाऱ्या तुकडीचा प्रमुख अशी महत्वाची पदं देण्यात आली होती. तर सिमुलगड किल्ल्याची किल्लेदारी सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आली होती. 

लाचित बोडफुकन हे जितके शस्त्र विद्येत पारंगत होते तितकेच शास्त्रांचे सुद्धा जाणकार होते. त्यांना अनेक धर्मग्रंथांचं गाढं ज्ञान होतं तसेच मानवतेवर त्यांचा मोठा विश्वास होता.त्यांनी आयुष्यात दोन सगळ्यात महत्वाचे युद्ध लढले होते.

यात पहिलं युद्ध होतं अलाबोईचं

ओहोम जेव्हा मुघलांकडून स्वतःचा प्रदेश जिंकून घेत होते तेव्हा औरंगजेबाने राजा रामसिंगच्या नेतृत्वात आहोमांवर आक्रमण कारण्यासासाठी सेना पाठवली. १६६९ मध्ये ओहोम आणि मुघलांमध्ये उत्तर गुवाहाटीमधील दादराजवळ असलेल्या अलाबोई टेकडीवर मोठं युद्ध झालं. या युद्धात १० हजार ओहोमांनी स्वतःचा जीव गमावला, पण मुघलांना हरवलं होतं. 

तर दुसरं युद्ध होतं ते सराईघाटचं. 

अलाबोईच्या युद्धात हरल्यानंतर औरंगजेबाने आणखी मोठी सेने पाठवून ओहोम साम्राज्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यात ३० हजार पायदळ, १५ हजार धनुर्धारी, १८ हजार तुर्की घोड्यांचं घोडदळ, ५००० बंदुका आणि १००० तोफांचा समावेश होता.  

सुरुवातीला मुघल सेनापती रामसिंगने ओहोम सैन्याला हरवलं आणि ढाक्याकडून गुवाहाटीकडे कूच केली. लछितला एक लाख रुपये दिले गेले आहेत त्यामुळे तो मुघलांवर आक्रमण करणार नाही असं पात्र रामसिंगने राजाला पाठवलं आणि गुवाहाटी खाली करण्याचे आदेश दिले.

परंतु ही माहिती जेव्हा लाचितला कळली तेव्हा तो आजारी होता, पण राज्यावर आलेल्या संकटापुढे त्याने आजारपण विसरलं आणि मुघलांवर तुटून पडला. ओहोम सैन्याने ब्रह्मपुत्रा नदीत नौकांच्या आधारे मुघलांशी लढाई केली. तर जमिनीवर थेट प्रतिकार केला. या तुंबळ युद्धात अखेर ओहोमांनी मुघलांना हरवलं आणि गुवाहाटी शहर ताब्यात घेतलं.

या लढाईमुळे लाचित बोडफुकन इतिहासात अजरामर झाले. 

या युद्धात ओहोमांना विजय मिळाला परंतु लाचितचं आजारपण आणखीनच वाढत गेलं. याच आजारपणामुळे अवघ्या वर्षभराच्या आत एप्रिल १६७२ मध्ये लाचित बोडफुकन यांचं निधन झालं. मुघलांपासून ओहोम साम्राज्यच रक्षण करणे आणि आसामी लोकांना अस्मिता देणाऱ्या लाचित बोडफुकन यांच्यावर आसामी लोकांची प्रचंड श्रद्धा आहे.  

आगामी निवडणूक आणि आसाममध्ये पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून लाचित बोडफुकन यांची जयंती आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केलं जात आहे असं विश्लेषक सांगतात. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.